धर्मांतर नव्हे मूल्यांतर!

आज दसरा. तसेच आजच अशोक विजयादशमीसुद्धा आहे. सीमोल्लंघनाचा पारंपरिक सण साजरा होत असतांना काळाच्या उदरातून क्रांतिकारक ज्वालामुखी उसळला आणि त्यांने सीमोल्लंघन केले.‌ ही घटना म्हणजे ६४ वर्षांपूर्वीचा धम्मदीक्षेचा सोहळा….

१४ ऑक्टोंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लाखो अस्पृश्य लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. इथूनच देशात एका नव्या सांस्कृतिक क्रांतीला सुरुवात झाली. ही जगाच्या इतिहासात धम्मक्रांती म्हणून ओळखली जाते. या घटनेला ६४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सामाजिक क्षेत्रात एका नव्या समाजरचनेच्या निर्मितीसाठी एक भक्कम मूल्याधार देणारी ही घटना आहे. बाबासाहेबांनी आणि त्यांच्या लाखो अनुयायांनी नागपूर मुक्कामी बौद्ध धम्म स्विकारला म्हणजे काय केले? हे धर्मांतर नव्हते हा एका धर्मातून दुसर्‍या धर्मात जाणे असा प्रवास नव्हता तर ते मूल्यांतर होते. या मूल्यांतराने धर्माचा आणि धर्मप्रवृत्तीचा त्यागही केला होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतुःसूत्रीचा अंतर्भाव असलेली धम्म नावाची एक आचारपद्धती, जीवनप्रणाली स्विकारण्यात आली होती. त्याचबरोबर धर्म म्हणून आजपर्यंत जगत आलेल्या मानसिकतेचाही संपूर्णपणे त्याग करणे हेही या धम्मस्विकृतीच्या मागील एक महत्त्वपूर्ण भूमिका होती. म्हणूनच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समताधिष्ठीत समाजनिर्मितीची नैतिक ताकद म्हणूनही या घटनेची नोंद घेणे आवश्यक आहे.

सिद्धार्थ गौतमाला मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेले होते, म्हणून त्यांना गौतम बुद्ध असे म्हटले गेले. मानवी जीवनात प्रचंड दुःख भरलेले आहे, हे त्यांनी जाणले आणि खर्‍या सुखाच्या शोधार्थ ते घराबाहेर पडले. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना संबोधी प्राप्त झाली. संबोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. इथेच सिद्धार्थ सम्यक सम्बुद्ध झाला. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता ‘बोधीवृक्ष’ असे म्हणतात. तसेच ‘उरुवेला’ या ठिकाणाला बोधगया असे म्हणतात. त्यानंतर बुद्धाने त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला, तो उपदेश म्हणजेच धम्म होय. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्मचक्र कार्यान्वित केले म्हणून या घटनेला ‘धम्मचकपवत्तन’ असे पाली भाषेत म्हटले गेले. संस्कृतमध्ये ‘धर्मचक्रप्रवर्तन’ असे म्हणतात. सम्राट अशोकानंतर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला जगात तोड नाही. या धम्मचक्रप्रवर्तन दिनाला अशोक विजयादशमीचाही संदर्भ आहे.

धम्मचक्र प्रवर्तन ही मानवी जीवनातील धार्मिक, सांस्कृतिक तथा राजकीय परिवर्तनवादी प्रक्रियेचीच सुरुवात होती. त्यामुळे इथल्या बौद्धांचे जीवन आमुलाग्र बदलून गेले. बौद्धांमध्ये झालेला हा क्रांतीकारी बदल जगाच्या औत्सुक्याचा विषय ठरला. बाबासाहेबांनी भारताच्या भूमीत रुजलेला आणि इथल्याच मातीत वाढलेला बौद्ध धम्म इथल्या अस्पृश्य गणल्या गेलेल्या अन् पिढ्यान् पिढ्या जातीव्यवस्थेने पिचल्या गेलेल्या समूहाला दिला. म्हणून अस्पृश्यांना एक नवा चेहरा मिळाला. मानवतेचे हक्क आणि माणसाच्या अस्तित्वाचीच जाणीव यामुळे लोकांना झाली. हे एक जसे सामाजिक तथा सांस्कृतिक प्रवर्तन होते याची दखल जगाने घेतली. कारण ही दास्यमुक्तीची क्रांती होती. माणसाने माणसांकडे जनावरांसारखे नव्हे तर माणसासारखेच बघण्याची ही नवी दृष्टी होती. आणि आज हे सारे घडलेले आहे. त्यामुळे ६४ वर्षांपूर्वीची बाबासाहेबांची दूरदृष्टी धम्म स्वीकारण्यामागचा व्यापक अर्थ स्पष्ट करते.

या मूल्यव्यवहारांमुळे समाजाचा बौद्ध स्त्रीकडे बघण्याचाही दृष्टीकोन बदलला. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेने स्त्रियांना जे गुलामीचे जीणे बहाल केलेले होते, ते तिने झुगारुन दिले. स्त्रिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा पुरस्कार करण्यात आला. स्त्रीला समानतेचे अधिकार देणारा, तिला माणूस म्हणूनच जीवन जगण्याचा, मानवतेचा हक्कही देणारा हाच खरा धम्म आहे ही जाणीव जनमाणसांत रुजायला मदत झाली. धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करणे म्हणजेच स्त्रियांवरील बंधनांचा धिक्कार करणे, स्त्रियांना प्रतिष्ठा देणे, त्यांच्या स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाचा स्वीकार करणे ही मूल्य तत्त्वे अंगीकारणे होय. हे स्त्रियांच्याच बाबतीत आहे असे नव्हे तर या नवबौद्ध धम्माचा प्रवास म्हणजे दास्यमुक्तीचा अविरत लढा देणारा आणि स्त्रियांसह इतर जातसमूहांनाही सोबत घेऊन जाण्याच्या सहप्रवासाचा मार्ग आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी १५ ऑक्टोंबरच्या भाषणात बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होईल असे म्हटले. कारण जगाला आता बुद्धाच्या शांती, अहिंसेची गरज आहे. युद्धाची आणि विनाशाची नाही. चौदा ऑक्टोंबरचे धम्मचक्र प्रवर्तन हा संदेश घेऊन घरोघर जाते.

धम्म स्विकारला म्हणजे तिथेच ही प्रक्रिया थांबली असे नाही. ती एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. माझा नवा जन्म होत आहे अशी ती प्रक्रिया आहे. ती एक नवा उजेड प्रस्थापित करते. सतत पुनर्रचनाशीलतेच्या मार्गाने मार्गक्रमण करीत असते. दरेकाने दरेकाला दीक्षा देण्याबरोबरच बौद्धतरांचेही सांस्कृतिक मूल्यांतर घडवून आणणे गरजेचे आहे. ‘दरेक’ याचा अर्थ आपल्याच जातसमूहापुरता मर्यादित घेतला जातो ते चुकीचे आहे. धम्मप्रवाही झालेली व्यक्ती तार्किक विचार करु लागते, ती विवेकनिष्ठ बनते. एवढेच नव्हे तर तो सत्य, प्रामाणिक, विज्ञानवादी, अहिंसक, विषमतेचा धिक्कार करणारा अशा नव्या वर्तणूकीचा नवा जन्म झालेला माणूस आपल्याला घडवून आणता येतो. शिक्षणानं माणसाच्या विचाराच्या कक्षा रुंदावतात. तो चिकित्सा करु लागतो. खर्‍या अर्थान त्याला मानवी स्वातंत्र्याचा खरा आवाज प्राप्त होतो. त्यामुळे ही धम्मचळवळ अधिकाधिक गतिमान करण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब म्हणतात, ‘मी मेल्यावर काय होईल हे सांगता येत नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल.’

आज जातीय अस्मिता टोकदार होत आहेत. प्रत्येकजण आपल्या धर्माचा झेंडा नाचवित रस्त्यावर उतरत आहे. बाबासाहेबांनी चालविले जातीअंताचे लढे दुबळे ठरु पाहत आहेत. जाती नष्ट करुन जातीविहीन समाज निर्माण करण्याची खरी जबाबदारी आंबेडकरी अनुयायांवरच आहे. आंबेडकरी चळवळ ही बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या लढ्यातूनच जन्माला आली आणि शेवटी धम्मचळवळीकडे परावर्तीत झाली. या धम्मचळवळीला प्रथम कवी, गायक, शाहीर, जलसेकार मिळाले आणि भीमगीत गायन पार्ट्यांनी बाबासाहेबांचे विचार, बुद्धाचे तत्त्वज्ञान गावागावात सर्वसामान्य माणसापर्यंत नेले. त्यातून समाज परिवर्तनवादी मानसिकतेचा उदय झाला. भीमजयंतीनंही धम्मचळवळ भाषणांच्या, चर्चेच्या माध्यमातून माध्यमातून लोकांपर्यंत नेली. आज सर्वत्र भरणार्‍या धम्म परिषदा काही अंशांनी धम्म चळवळ गतीमान करण्याचेच काम करीत आहेत. या धम्म परिषदा बुद्धाच्या धम्म तत्त्वज्ञानावरच भरल्या गेल्या पाहिजेत. त्यांना जत्रेचे, मेळाव्याचे किंवा सोयरीकीचे स्वरुप प्राप्त न होणे हे अपेक्षित आहे.

धम्म चळवळीसमोर अनेक आव्हाने आहेत. अजूनही जुन्या रुढी, परंपरेच्या मानसिकतेत जगणे हेच खरे आणि मोठे आव्हान आहे. पोटजाती, २२ प्रतिज्ञा खोट्या करणे, एकूणच धम्म विसंगत वर्तन करणे असे जळते प्रश्‍न समोर आ वासून उभे आहेत. वैयक्तिक राजकीय लाभासाठी चळवळीला जेंव्हा स्वार्थीपणाचं ग्रहण लागतं तेंव्हा चळवळीच्या अस्तित्वालाच पोखरणं सुरु होतं. बौद्धांना राजकीय मर्यादा असतात हे मान्य केलं तरी ज्या सवलती व राजकीय हक्क मिळवून देण्याची भाषा बाबासाहेब करीत होते, त्या मिळाल्यावरही आम्ही राजकीयदृष्ट्या गुलामच झालो आहोत. आमच्या राजकारणातील स्वातंत्र्याला मेंढराचा आवाज प्राप्त झाला आहे. याचा परिणामही धम्म चळवळीचे नुकसान करणाराच ठरत आहे. जर आज हे राजकीय सवलतीच बंद करण्याची भाषा कुणी करीत असेल आणि ती योग्यच मानली गेली तर आपणच आपल्या राजकीय मर्यादा वाढवून घेतल्यासारखे होईल. बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे जगातील सर्वच संस्कृतींना नाकारुन पर्यायी संस्कृती या देशाला दिली आहे त्याचप्रमाणे विविध पक्षाच्या राजकीय गुलामगिरीची संस्कृती मोडीत काढणे हेही धम्म चळवळीचेच कार्य आहे.

आज इतर जातीतील लोकांनी धम्मदीक्षा घेण्याची प्रक्रिया थंडावली असे म्हणणे रास्त नाही. ज्या दीक्षाभूमीवर लाखो लोक आजही विजयादशमीच्या दिवशी जमा होतात, ही साधी आणि सहज घेण्याची बाब नाही. क्रांती कशी असते हे समजून घ्यायचे असेल तर दीक्षाभूमीकडे पहावे लागेल. आजचा काळ खडतर आहे. याची जाणीव सर्वांनाच आहे. परंतु संपूर्ण जगासाठी ती प्रेरणाभूमी आहे. तिकडे देशातले इतर दीन दलित वळताहेत. हाथरस येथील ५० कुटुंबानी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, हे ताजे उदाहरण आपल्याला देता येईल.
ह्या समाजव्यवस्थेने छळलेले, अत्याचार केलेले, उघडेनागडे करुन नागवलेले, ठेचून ठेचून मारलेले अनेक जातसमूह मोठ्या संख्येने बौद्ध धम्माकडे वळत आहेत. त्यांना व्यापकपणे आपल्यात सामावून घेणे आपले कर्तव्यच नाहीतर तो चळवळीचाच एक भाग आहे. त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार, त्यांचा मानसिकदृष्ट्या स्वीकार, त्यांच्याशी करुणा, मैत्री आणि बंधुत्वाची भावना प्रस्थापित करणे गरजेचे आहे. इतर जातीतील बौद्ध धम्म स्विकारलेल्या व्यक्ती नव्या प्रवाहात बहिष्कृत राहणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं हे आपण समजून घेतलं पाहिजे.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
२५.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *