राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरला आल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी खडसे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. भाजपामध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपतच राहिलो असतो तर मी राजकीय विजनवासात गेलो असतो. परंतू शरद पवारांमुळे मी पुन्हा राजकारणात आलो, असे खडसे म्हणाले.
अडवाणी, अटलजींच्या बाबतीत जे झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते. पण मी गप्प बसणारा नव्हतो. मी सन्यास घ्यावा अशी चंद्रकांत पाटील यांची इच्छा होती. मार्गदर्शन करावे असं ते म्हणत होते. मी पक्षांतराचा निर्णय घेतला. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले. मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपात आपल्याला अपमानाची वागणूक मिळाली. तेव्हा कार्यकर्ते चिडायचे, संताप व्यक्त करायचे. गेली चार वर्षे मी हा अन्याय सहन केला. माझे मंत्रिपद का काढले? हे आजही अनुत्तरित आहे. कदाचित पुन्हा मिळेल, पण जो अपमान झाला तो कसा भरून निघणार, असा सवालही खडसेंनी विचारला.
मी घरी बसलो असतो, मात्र शरद पवार यांनी पुन्हा मला राजकारणात आणले. येणारा काळ ठरवेल पुढे काय होईल. विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपच्या काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करून त्यांना पाडले. याचे पुरावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना दिले होते. तरीही कुणावरही पक्षाकडून कारवाई झाली नाही. रोहिणी खडसेंच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपच्या लोकांचे फोटो, व्हिडिओ मी दिले होते. या साऱ्या घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होते.
परंतु काल दसरा असल्याने ते आनंदी होते. त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार याचे संकेत त्यांच्याकडूनच मिळाले आहेत. राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांच्या मनावरील ओझं हलकं झालं आहे असं काहीसं दिसत होतं. ते मोकळेपणाने बोलत होते. एकनाथ खडसेंनी जेव्हा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते बाहेर पडले. हा अपवाद म्हणायचा की भाजपाला गळती लागली अशी चर्चा लगेचच सुरु झाली. त्याचं कारणंही सरळ आहे. केवळ खडसेच नाही, तर भाजपात अस्वस्थ असलेल्या, अन्याय्य वागणूक मिळाली अशी भावना असणा-या नेत्यांची संख्या बरीच आहे. या चर्चेत पहिलं नाव लगेचच आलं ते पंकजा मुंडेंचं. पंकजा मुंडे आता काय करणार?
हा प्रश्न खडसेंच्या बातमीनंतर सगळ्यांच्याच मनात आल्यावर पंकजा मुंडेंनाही प्रश्न विचारले गेले. त्यांच्या अतिवृष्टी दौऱ्याच्या वेळेस पत्रकारांनी खडसे आणि त्यासंबंधानं प्रश्न विचारल्यावर मुंडे यांनी सांभाळूनच प्रतिक्रिया दिली. अधिक काही बोलायचं टाळलं. इकडे शिवसेनेनं पंकजा यांना त्यांच्या पक्षात येण्याचं आमंत्रण देऊनही टाकलं. अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील या सेनेच्या नेत्यांनी आता पंकजांनी शिवसेनेत यावं असं जाहीर आमंत्रण दिलं. अर्थात त्याला पंकजा आणि त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
पंकजा मुंडेंची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. कालच्या दसरा मेळाव्यातही हे दिसून आले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि पंकजा मुंडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्या आहेत. भाजपमधील इतर नेते सरकारवर टीका करत असताना पंकजा मुंडेंनी उद्धव ठाकरेंचा ‘भाऊ’ म्हणून उल्लेख केला. त्यांची स्तुती केली, त्यांचं अभिनंदन केलं. गरज पडल्यास आंदोलन करू, असं त्या म्हणाल्या आहेत. पण एकंदरीतच त्यांचा सूर उद्ध ठाकरेंचं अभिनंदन करण्याचा होता. त्यामुळे यातून पंकजांनी एकप्रकारे राजकीय संदेश दिला आहे. हा भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वाला म्हणजेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना त्या नाराज आहेत, असं सुचविणारं आहे.
एकनाथ खडसे राजीनामा देऊन बाहेर पडताच पंकजा यांच्याबद्दल चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे त्यांची भाजपामधली अस्वस्थता आणि घुसमट कायम जाणवत राहिली आहे. त्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री असतानाही असमाधान व्यक्त करत राहिल्या.
त्यांच्या ‘मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री’ या आशयाच्या वक्तव्यानंतर त्यांचं महत्त्व कसं पक्षांतर्गत आणि मंत्रिमंडळात कमी होत गेलं याची चर्चा झाली. चिक्की घोटाळ्याचे आरोप सभागृहामध्ये झाल्यावर आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याची त्यांची भावना झाली. ‘बीबीसी मराठी’च्या एका कार्यक्रमात ‘या सरकारच्या काळात जे समुद्रमंथनातून विष निघालं ते सगळं माझ्या वाट्याला आलं’ अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती.
पण त्याहीपेक्षा परीक्षेचा काळ त्यांच्या वाट्याला २०१९ च्या निवडणुकीपासून आला. त्यांच्याच परळी मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. धनंजय मुंडे यांच्याकडून झालेला हा पराभव होता. या पराभवाबद्दल अनेक शंका पंकजा समर्थकांनी बोलून दाखवल्या.
त्यांना विधान परिषदेत भाजपा संधी देईल असा अनेकांचा कयास होता. पण त्यांना परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली. असं म्हटलं गेलं की जे जे पक्षामध्ये फडणवीसांचे स्पर्धक मानले गेले त्यांना विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये धक्का बसला. एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना दोन्ही सभागृहाची उमेदवारी मिळाली नव्हती.
पंकजांची ही अस्वस्थता दबून राहू शकली नाही. त्यांचंही एक विस्तारित नाराजीनाट्य महाराष्ट्रात घडलं. त्या आता पक्षाला सोड्चिठ्ठी देणार असं बोललं गेलं. त्यांनी परळीत गोपीनाथगडावर त्यांच्या समर्थकांची मोठी सभाही घेतली. तेव्हा त्या हा निर्णय घेतील असे कयास केले गेले.
पण भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाला त्यांची समजूत तेव्हा काढण्यात यश आलं. पंकजांनी आपण पक्षातून बाहेर पडणार नसल्याचं जाहीर केलं. ‘हा माझ्या बापाचा पक्ष आहे, मी कशाला बंड करू’ असा प्रश्नही त्यांनी विचारला. याच सभेत मात्र एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर तोफ डागली होती.
सभागृहात पंकजा मुंडे नसल्या तरीही नुकतीच पक्षानं त्यांना नवी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. त्यांची नुकतीच केंद्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणात रस असला आणि केंद्रात रस नसला, तरीही त्यांच्याकडे ही जबाबदारी देऊन पक्षाने त्यांच्या नाराजीवर मलम नक्कीच लावलं आहे.
गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजातले मोठा जनाधार असलेले नेते होते आणि भाजपला त्याचा फायदाही झाला. त्यांच्यानंतर पंकजा आणि खडसे हे भाजपाचे चेहरे बनले. आता खडसें पश्चात पंकजा या भाजपचा एक महत्त्वाचा बहुजन चेहरा आहेत. अशा स्थितीत त्या पक्ष सोडतील का?
खडसे राष्ट्रवादीत गेले. पण मग पंकजांसाठी, त्यांनी विचार करायचाच ठरवल्यावर, कोणता पर्याय असेल?भाजप सोडल्यावर महाराष्ट्रातले तीन महत्त्वाचे पक्ष आहेत ते तीनही आता एकत्र ‘महाविकास’ आघाडी सरकारमध्ये आहेत. त्याच सरकारमध्ये पंकजा यांचे बंधू आणि राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे मंत्री आहेत? तिथं त्या जातील का? धनंजय हे ‘राष्ट्रवादी’चे महत्वाचे नेते आहेत. मुख्य म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा वारसा त्या चालवतात. त्यांचं नाराजीनाट्यही जेव्हा महाराष्ट्रात घडलं होतं तेव्हाही ते पक्ष सोडून गेले नव्हते.
जी शिवसेना त्यांना आमंत्रण देते आहे त्या सेनेचे मराठवाड्यात अनेक नेते आहेत. तिथं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी पंकजांना बरीच मेहनत घ्यावी लागेल. ‘उद्धव ठाकरे हे मला भावासारखे आहेत’ असं पंकजा पूर्वी म्हणाल्या आहेत, पण ते उद्धव पंकजा यांना राजकीयदृष्ट्या काय देऊ शकतील, हाही प्रश्न उरतोच. शिवसेनेतली एक आणि दोन नंबरची जागा उद्धव आणि आदित्य यांच्यासाठी राखीव आहे. पंकजा मुंडेंना तिसऱ्या स्थानासाठीच संघर्ष करावा लागेल.
दुसरीकडे, भाजपाच्या नजरेतून बघताना, पंकजा मुंडेंसारखा जनाधार असलेला ओबीसी नेता गमावणं हे परवडण्यासारखं आहे का? सत्ता हातातून गेलेली असतांना पंकजा यांना पक्षापासून लांब जाणं हे त्यांच्यासाठी योग्य ठरेल का? म्हणूनच जेव्हा जेव्हा त्या नाराज होतात तेव्हा तेव्हा त्यांची समजूत घातली जाते.
त्या केवळ ओबीसी चेहराच नाही, तर भाजपच्या राज्यभर ठाऊक असलेल्या एकमेव महिला नेत्या आहेत. त्या गेल्या तर पक्षाचं नुकसान करू शकतील, याची जाणीव झाल्यामुळेच कदाचित पक्षानं त्यांना आता नवी जबाबदारीही दिली आहे. खडसे यांच्याबाबतीत जे धोरण पक्षानं अवलंबलं त्यापेक्षा पंकजांना वेगळी वागणूक दिली जाते आहे.
कोणत्याही जनाधार असलेल्या राजकीय नेत्याकडे अशा स्थितीत तीन पर्याय असतात. एक म्हणजे स्वत:च्याच पक्षात स्वत:च स्थान पुन्हा हवं आहे तसं निर्माण करणं. जसं गोपीनाथ मुंडेंनी केलं. दुसरा म्हणजे पक्षांतर करणं, जे खडसे वा राणे यांनी केलं. आणि तिसरा म्हणजे नवा पक्ष स्थापन करणं जो पर्याय राज ठाकरे यांनी निवडला होता.
पंकजा भाजपातच राहतील आणि खडसेंच्या वाटेवर काही जाणार नाहीत असं सद्यातरी वाटतं. मुंडेंचं भाजपातलं स्थान वेगळं आहे त्यामुळे त्या आहे तिथंच राहतील. शिवाय भाजपालाही त्या हव्या आहेत. म्हणूनच त्यांना केंद्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळं तुम्हाला सामावून घेतलं जाईल हा मेसेज त्यांना गेला आहे. दुसरं म्हणजे धनंजय मुंडे ‘महाविकास’आघाडीमध्ये असतांना त्या तिथं जाणार नाहीत. शिवसेनेला त्या येणं पथ्यावर पडेल पण ते सेना-राष्ट्रवादी यांच्या संबंधांवर अवलंबून असणार आहे.
पंकजा जाणारच नाहीत कारण त्या आणि खडसे आपापल्या राजकीय करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभे आहेत. खडसे रिस्क घेऊ शकतात, पण पंकजा घेऊ शकत नाहीत. शिवाय, जशी वागणूक खडसेंना मिळाली तशी पंकजांना मिळाली नाही. खडसेंचं तिकीटच कापलं होतं. त्यामुळं असं टोकाचं पाऊल पंकजा घेणार नाहीत. एक नक्की, की या घटनेमुळं भाजपातला फडणवीस-विरोधी गट जो आहे, त्यांना बोलायला मुद्दे मिळतील, अशी शक्यता आहे. अर्थात, पंकजा मुंडेंबद्द्लही ही चर्चा एकनाथ खडसे बाहेर पडले या निमित्तानं होते आहे. गेला बराच काळ त्या शांत आहेत. पण राजकारणात शांततेचा अर्थ सारं आलबेल आहे असा होत नाही.
महाराष्ट्रात भाजपनं सर्वाधिक जागा मिळवूनही पक्षाला सत्ता स्थापन करता आलेली नाही. शिवसेनेसोबतच्या वादाचा भाजपला फटका बसला. भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करता आली नसल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर पक्षातूनच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. याची सुरुवात भाजपचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापासूनच झाली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचं जनमानसात चित्र आहे. सगळ्यांचं सहकार्य लागतं. सर्वांनी एकत्र काम केल्यास पक्षाला बळ मिळतं. पण दुर्दैवानं या निवडणुकीत अनेक वर्षे काम करणाऱ्यांना तिकीट दिलं गेलं नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जनमानसावर झाला.
एकनाथ खडसे यांची नाराजी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून वारंवार दिसून आली आहे. त्यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे भाजपच्या राज्य नेतृत्त्वावर म्हणजेच देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केल.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना तिकीटही देण्यात आलं नाही. खडसेंप्रमाणे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाही तिकीट नाकारलं गेलं.
गेल्या काही महिन्यांमधील या घडामोडी आणि त्यात राज्यातील सत्ता राखण्यातही भाजपला आलेलं अपयश पाहता, देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक पुन्हा तोंड वर काढतील का, हा प्रश्न चर्चेत आला आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेच्या बाहेर गेल्यानं पक्षांतर्गत म्हणजेच राज्य भाजपमधील विरोधकांनी डोकं वर काढण्यास सुरूवात झाली आहे. एकनाथ खडसे यांनी फडणवीसांविरोधात आवाज उठवलेला आहे. हे लक्षात घेता फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत विरोध सुरू होईल. एकनाथ खडसे यांनी तोफ डागली आहे. त्यानंतर हळूहळू चंद्रशेखर बावनकुळे असतील, विनोद तावडे असतील किंवा इतर मंत्रिपदं उपभोगलेले लोक फडणवीसांमुळं कसं सरकार गेलं, ते सांगायला सुरुवात करतील. असा अंदाज आहे.
भाजपचा कारभार आणि सरकारचा कारभार संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांनी हातात घेतला होता. त्यामुळं मंत्री, स्थानिक पदाधिकारी यांच्यामध्ये कुठंतरी राग धुमसत होता. फडणवीसांच्या वर्तुळात पक्षाच्या बाहेरून आलेली मंडळी होती. तसेच, “पक्षाचे मूळ निष्ठावंत, आरएसएसच्या केडरमध्ये या सर्व गोष्टींचा राग होता. एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलं. प्रकाश मेहतांचंही तसेच झालं. मुक्ताईनगरमधून खडसेंना तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या मुलीचं म्हणजेच रोहिणी खडसेंचा झालेला पराभव आहे. पंकजा मुंडेंचा झालेला पराभव आहे. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना तिकीट नाकरलं गेलं. यात लक्षणीय गोष्ट म्हणजे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात. त्यामुळं यशाचे अनेक बाप असतात, अपयश बेवारस असतं, या न्यायानं पराभवाचं खापर फडणवीसांच्या पदरात पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
फडणवीसांवर अपयशाचं खापर फोडून पक्षांतर्गत विरोध होऊ शकेल का, याबाबत कट्टा न्यूजचे संपादक सुधीर सूर्यवंशी म्हणतात, “ज्या यश येतं, तेव्हा सगळे सांगत असतात की हे मी काम केलंय. पण अपयश येतं तेव्हा त्या संघटनेच्या प्रमुखावर खापर फोडलं जातं. ते फडणवीसांवर फोडण्याचा प्रयत्न होईलच.” तसेच, फडणवीसांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षांतर्गत जी चीड साचताना दिसली, त्याचा स्फोट महाराष्ट्र भाजपमध्ये झाल्यास नवल नाही.
एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास महाविकास आघाडीत अडचणी निर्माण होतील. माझा खडसेंसोबत असलेला संघर्ष कायम राहणार आहे. माझे अधिकार अबाधित राहतील याची मला खात्री द्या अशी चर्चा काही दिवसांपूर्वीच मी आमचे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याशी केली आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थानिक आमदार यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली आहे. महाविकास आघाडीने आधीच ठरवलेल्या बाबींमध्ये एकनाथ खडसेंनी ढवळाढवळ केली अथवा माझ्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला तर संघर्ष अटळ आहे. या सर्व बाबी स्पष्ट न होताच त्यांचा प्रवेश झाला तर मी माझा निर्णय घेईन, असा इशाराही स्थानिक आमदाराने दिला आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसे विरुद्ध शिवसेना हा जुना संघर्ष आहे. हा संघर्ष २०१४ मध्ये टोकाला गेला. शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा करण्यासाठी एकनाथ खडसेंनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुढाकार घेतला होता. आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी जोरदार चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेससोबतच शिवसेनेच्या स्थानिक आमदार आणि नेत्यांचाही विरोध असल्याची माहिती होती.
शिवसेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने आणि स्थानिक आमदाराने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की आमचे पाच आमदार आहेत. आमच्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्याच स्थानिक नेत्यांना अडचण आहे. आम्हाला तर कायम खडसेंनी त्रास दिला आहे. यापुढेही देतील हे आम्ही गृहीत धरले आहे. त्यामुळे आतापर्यंत नडलो तसेच पुढेही नडू.”
“एकनाथ खडसेंची एवढीच ताकद असती तर त्यांच्या मुलीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असता का? त्यांची काही आता ताकद राहिलेली नाही. मग त्यांना मोठं करण्याचे काम का केले जात आहे?” असाही प्रश्न शिवसेनेच्या आमदाराकडून उपस्थित करण्यात आला.
खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या एकच आमदार आहे. साधारण २००९ पर्यंत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ पैकी ५ आमदार होते. पण कालांतराने ही संख्या घटत गेली. शिवसेनेने मात्र आपले पाच आमदार कायम राखण्यात यश मिळवलं. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे सहकारी पक्ष आहेत.
भाजपमध्ये चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्यास दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या संबंधावरही याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आता महाविकास आघाडीत एकत्र असल्याने खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेच्याही स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ सालच्या घटस्थापनेच्या काही दिवस आधी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप-शिवसेना युती तुटल्याची घोषणा केली होती. पत्रकार परिषदेत २५ वर्षांची भाजप आणि शिवसेनेची मैत्री संपुष्टात आल्याचे खडसेंनीच जाहीर केले होते. २०१४ विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या घटस्फोटाचे कारण शिवसेनेच्या अवास्तव मागण्या असल्याचे सांगितले. शिवसेना आणि एकनाथ खडसेंमधले अंतर यामुळे आणखी वाढत गेले. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे प्रबळ नेते म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख आहे. पण शिवसेना आणि भाजपची युती असूनही स्थानिक पातळीवर मात्र खडसे आणि सेनेच्या नेत्यांमध्ये उघड वैर आहे.
युतीच्या उमेदवारांना संपूर्ण जिल्ह्यात मदत करू पण खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघात मदत करणार नाही, अशी उघड भूमिका यापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व आणि खडसे एकमेकांचे कायम विरोधक राहिले आहेत. शिवसेनेचे जळगावचे नेते माजी आमदार सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात.पण ते सद्या घरकुल घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत.
शिवसेना आणि भाजप दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. एकनाथ खडसे साधारण चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. एक लोकनेता आणि भाजपचा बहुजन चेहरा अशी खडसेंची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्रात युतीच्या काळातही एकनाथ खडसेंनी शिवसेनेला सहकार्य केले नाही, अशी तिथल्या स्थानिक नेत्यांची भावना आहे.
जळगावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेना आणि एकनाथ खडसे आमने-सामने राहिले आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र सत्तेत आहेत. तर जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून शिवसेना विरोधकाच्या भूमिकेत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी युती असूनही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुक्ताईनगरमध्ये प्रचारासाठी मदत करणार नसल्याची जाहीर भूमिका घेतली होती.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनीही भाजपला अनेकदा उघड आव्हान दिले आहे. शिवसेनेला मदत करण्याची वेळ येते तेव्हा एकनाथ खडसे फारकत घेतात असा आरोपही त्यांनी केला होता. उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडसेंच्या प्रवेशावरून अस्वस्थता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा संघर्ष उभा राहू शकतो.
“आतापर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत काम करत होतो. आमच्यात कधीही टोकाचा संघर्ष नव्हता. पण एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास संघर्ष अटळ आहे,” अशी प्रतिक्रिया एका शिवसेनेच्या आमदाराने दिली आहे. जळगावमध्ये शिवसेना आणि खडसे यांच्यात कायम वाद होतात. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये प्रचारसभा घेतली होती.”
एका बाजूला सत्ता टिकवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांची नाराजी वेळीच दूर करण्याचे आव्हान अशा दोन्ही पातळ्यांवर शिवसेनेला संघटनात्मक काम करावे लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष वर्चस्वाच्या लढाईत समोरासमोर येत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी काहीतरी मिळवताना दिसत आहे. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यानिमित्त ही स्थानिक खदखद बाहेर पडतानाही दिसू शकते. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेत. पण हे तीन पक्ष एकत्र येणं राज्यात विविध ठिकाणी स्थानिक राजकारणाला धरून नाही. तेव्हा स्थानिक नाराजी बाहेर येण्याची ही सुरुवात असू शकते.”
महाविकास आघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पक्षांनी स्वतंत्र वाढीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. पारनेरमध्ये जेव्हा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला असला तरी खडसेंच्या बाबतीत असे काही होण्याची शक्यता कमी आहे. एकनाथ खडसेंसारखा बडा नेता जर राष्ट्रवादीत प्रवेश करत असेल तर ते शिवसेनेचे ऐकतील असे वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा संघटनात्मक निर्णय असला तरी त्याचा फटका महाविकास आघाडीला इतर ठिकाणीही बसू शकतो. सहकारी पक्षाला डावलून असे प्रवेश होऊ लागले तर महाविकास आघाडीसाठी घातक ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण यामुळे स्थानिक अस्वस्थता वाढू शकते.
खडसेंसारख्या जनाधार असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेत्याला मंत्री केले जाणार यात शंका नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या जात आहेत. राष्ट्रवादीने आपल्याकडील मंत्रीपदाच्या सगळ्या जागा भरल्या आहेत.खडसेंना मंत्री करण्याकरिता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड किंवा कामगार मंत्री दिलीप वळसे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा होती. वळसे यांना तब्येतीमुळे फारसे सक्रीय राहता येत नसल्याची कुजबूज त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करत असतात. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यातील करमुसे या इंजिनीअरने केलेली अपहरण व मारहाणीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात न्यायालयाने आव्हाड यांच्यावर ताशेरे वगैरे मारल्यास ते राजकीयदृष्ट्या अधिक अडचणीचे ठरू शकते, असे राष्ट्रवादीत बोलले जात आहे. सध्या आव्हाड हे पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जात असल्याने त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात येऊ शकते आणि त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असले तरी पक्षातील मंत्र्यांचे चेहरे मात्र चिंताग्रस्त दिसू लागले आहेत.
सध्याच्या घडीला एकनाथ खडसे यांना मंत्रिपद देणं शक्य नसलं तरी नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्ष पद एकनाथ खडसेंना दिलं जाऊ शकतं, या पदाला कॅबिनेट दर्जा आहे. नियोजन मंडळाचं पद देऊन एकनाथ खडसेंना ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. एकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे.
जर शिवसेनेने कृषी खातं सोडलं नाही तर गृहनिर्माण खाते एकनाथ खडसेंना दिले जाईल असंही सांगितलं जात आहे. परंतु जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खाते सोडण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे तुर्तास एकनाथ खडसेंना ताकदीचं पद देण्याबाबत प्रतिक्षा केली जाईल, विरोधी पक्ष भाजपाला रोखण्यासाठी एकनाथ खडसेंचा वापर राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार शिवसेनेला खातेबदल करण्यास तयार करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गंगाधर ढवळे ,नांदेड
संपादकीय २६.१०.२०२०