मनाच्या तसबीरीत कोरून ठेवावा असा गजल काव्य संग्रह…तसबीर

तसबीर (गजल काव्य संग्रह).
सदानंद डबीर (कवी, गजलकार, गीतकार).
ग्रंथाली प्रकाशन.
ऑक्टोबर २०२० (प्रथम आवृत्ती).
किंमत ₹ १५०/-
पृष्ठ संख्या – १११
समाविष्ठ रचना – ७५

कवी, गजलकार, गीतकार मा.श्री.सदानंद डबीर यांचा नुकताच प्रकाशित झालेला एकदम ताजा कोरा “तसबीर” हा गजल काव्य संग्रह माझ्या हाती आला. सदानंद डबीर हे गजल क्षेत्रातलं आणि साहित्यातलं एक प्रतिष्ठीत नाव, त्यामुळे मला यासंग्रहाबद्दल खूप उत्सुकता होतीच. वाचायला सुरवात केल्यावर जाणवलं की एका दमात वाचण्याचा हा संग्रह नाहीच. या संग्रहातील समाविष्ठ ७५ वृत्तबद्ध रचनांचा मी टप्प्याटप्प्याने अभ्यासपूर्ण आस्वाद घेतला. आणि शब्द, लय, वृत्त, आशय सौंदर्याने नटलेल्या एका सर्वांगसुंदर संग्रहाचा आनंद घेता आला याबद्दल डबीर सरांचे सर्वप्रथम मनापासून आभार आणि अभिनंदन…

तू विचारावी खुशाली, मी म्हणावे – ‘छान आहे’!
हाच माझ्या आसवांचा केवढा सन्मान आहे!
दुःख गझलेतून माझ्या, मी खुबीने गात जातो-

घेतली माझ्या व्यथेने, बघ, सुरीली तान आहे!

माझ्या सभोवताली ‘सजले’ शराबखाने
माझी न प्यास मिटली, हे मद्य प्यायल्याने!
त्या मैफिली न आता, ना लोकही दिवाणे

माहोल तो, न, आदब!… गेले दिवाणखाणे!

अशा उत्तमोत्तम शेरांनी सजलेल्या गझलांचा आस्वाद घेत असतानाच या संग्रहात आपल्याला इतर काही वृत्तबद्ध कविता आणि मुक्तके वाचायला मिळतात…

मुक्तक-
अता चर्चा पुरे झाली – ‘असे झाले! तसे झाले’!
जसे झाले, तसे झाले… म्हणू या की ‘बरे झाले’!
स्वतःशी भांडलो आधी… जगाशी भांडलो नंतर –

अता ती खुमखुमी नाही, अता जगणे जूने झाले!

कविता (भैरवी)-
शब्द माझेही अखेरी जायचे सारे लयाला
गीत एखादेच माझे, राहू दे येथे दयाळा!!
गीत गाताना तुझे मी, प्राणही लागो पणाला
तोच येवो सूर ओठी, जीवनाच्या भैरवीला

गीत एखादेच माझे, राहू दे येथे दयाळा!!

अशा सहज सुंदर ओळी कविता आपल्याला या संग्रहात दिसून येतात. कुठेही क्लिष्टता नाही की शब्दांचे अवडंबर नाही, जे सांगायचं ते साध्या सरळ सोप्या शब्दात आणि थेट मनाला भिडणारा आशय. त्यामुळे या संग्रहातील रचना सुरवातीपासूनच आपल्या मनाची पकड घेतात आणि उत्सुकता मनात ठेवून आपण पुढच्या रचनेकडे वळत जातो.
गजल, मुक्तक, कविता अशा विविध स्वरूपाच्या वृत्तबद्ध ७५ रचनांचा समावेश डबीर सरांच्या या “तसबीर” संग्रहात समावीष्ठ आहे.

एकाच बहरमधल्या कमी जास्त आवर्तने असलेल्या ओळी एकाच गझलेत वापरण्याची सूट घेतलेली “आजाद गजल” या वेगळ्या प्रकारची सुंदर रचनाही यात वाचायला मिळाली.

संग्रहाच्या सुरवातीलाच १९ पानांचे डबीर सरांचे प्रस्तावनापर मनोगत आपल्याला त्यांच्या आजवरच्या काव्यप्रवासाची ओळख करून देते.
तर शेवटच्या पृष्ठांवर डबीर सरांची विस्तृत साहित्यिक ओळख आपल्याला मिळते. गझल, कविता, गीत, संगीत नाटक, मराठी मालिका, मराठी चित्रपट यांसाठी गीत लेखन, गजल मुशायरे आणि आकाशवाणी अशा विविध क्षेत्रातल्या त्यांच्या साहित्यिक कार्याचा ठसा आपल्याला ठळकपणे दिसून येतो.
या शिवाय नवोदितांना उपयुक्त असे गजल संबंधी अभ्यासपूर्ण मार्गदर्शक विचार डबीर सरांनी त्यांच्या मनोगतात शेवटच्या भागात दिले आहेत.

अशी ही सर्वांग सुंदर वृत्तबद्ध गजल काव्य नजराणा असलेली तसबीर डबीर सरांनी वांचकांसमोर ठेवली आहे. मला खात्री आहे या तसबीरीचे साहित्यिक, वाचक आणि रसिकांकडून भरभरून स्वागत होईल.
आपण सर्वांनी हा संग्रह विकत घेऊन संग्रही ठेवावा असे मनोमन वाटते…

तसबीर हा गजल काव्य संग्रह ग्रंथाली, बुकगंगा आणि Amazon वरती उपलब्ध आहे.

◆◆◆◆◆
@ विजय जोशी
डोंबिवली
९८९२७५२२४२
२६/१०/२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *