◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – गोविंदाग्रज
कविता – एखाद्याचे नशीब
राम गणेश गडकरी
(टोपण नाव – गोविंदाग्रज, बाळकराम).
जन्म – २६/०५/१८८५ (नवसारी, गुजरात).
मृत्यू – २३/०१/१९१९ (सावनेर, नागपूर) (३४ वर्षे).
गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) हे कवी, नाटककार, लेखक असे साहित्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.
गोविंदाग्रज या नवाने त्यांनी कविता लेखन केले. त्यांनी अल्पायुषी जीवनात सुमारे १५० कविता लिहिल्या.
“वाग्वैजयंती” हा त्यांचा एकमेव काव्यसंग्रह प्रकाशित झाला. यामध्ये मुक्तछंद ते छंदबद्ध आणि चारोळी ते दीर्घ कविता अशा विविध प्रकारचे कविता लेखन केले आहे.
कवितेची पार्श्वभूमी एखाद्या परिच्छेदात सांगून कविता सादरीकरणाची त्यांची पद्धती होती.
एखाद्याचे नशीब,
फूल ना फुलाची पाकळी,
एकच मागणे,
सांग कसे बसलो?
पहिले चुंबन
अशा अनेक त्यांच्या गाजलेल्या कविता आहेत.
बाळकराम या टोपण नावाने त्यांनी विनोदी लेखन केले.
इसापनिती मुलांसाठी हे लहान मुलांसाठी लेखन केले.
शिवाय स्फुट लेखनही त्यांनी केलेले आढळते.
त्याच सोबत मुख्यत्वाने अनेक उत्तमोत्तम नाटके लिहिली. आणि अल्पावधीतच एक उत्तम नाटककार असा लौकीक मिळविला.
एकच प्याला, प्रेमसन्यास, पुण्यभाव, भावबंधन ही अविस्मरणीय नाटके लिहिली. तर राजसन्यास आणि वेड्यांचा बाजार ही त्यांची नाटके अपूर्ण राहिली.
गोविंदाग्रज यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या उत्तमोत्तम नाटकांच्या कलाकृतीमुळेच.
चिमुकली इसापनिती,
समाज नटाची जागा आणि इतर दोन निबंध,
नाट्यकलेची उत्पत्ती,
गुरू श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांना पत्र,
अशा गडकरी यांच्या अन्य साहित्यकृती आहेत.
गडकरी यांच्या जीवनावर व त्यांच्या साहित्यावरही अनेक पुस्तके लिहिली गेली.
राम गणेश गडकरी यांच्या कारकिर्दीवर श्रीराम रानडे यांनी लिहिलेले आणि विजय गोविंद यांनी सादरीकरण केलेले हा श्राव्य कार्यक्रम होता.
गडकरी यांच्या नावाने अनेक स्पर्धा घेतल्या जातात आणि अनेक पुरस्कारही दिले जातात.
गडकरींच्या नावाने नागपूर येथे एक साखर कारखानाही आहे.
असे हे आगळे वेगळे अष्टपैलू साहित्यिक व्यक्तिमत्व अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अशी प्रतिभावंत व्यक्ती अजून २०/२५ वर्षे लाभली असती तर अजून कितीतरी नाटके, कविता आणि इतर साहित्यिक लेखनाचा ठेवा आपल्याला मिळाला असता…
गोविंदाग्रज यांच्या अनेक गाजलेल्या कवितांपैकी “एखाद्याचे नशीब” ही शार्दूलविक्रीडीत वृत्तातील एक छान रचना आहे.
प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळे असते, आणि या नशीबामुळे प्रत्येकाचे जीवन हे सुद्धा विविधतेने नटलेले असते.
जशी, काही फुले ही झाडावर स्वच्छंदी फुलतात, डोलतात. तर काही देवाच्या पायावर अर्पित केली जातात. तर काही आभागी फुले प्रेतावरती वाहिली जातात.
त्याचप्रमाणे आपले आयुष्य हे सुद्धा नशीबाचा खेळ आहे. कुणी सुखात असतात. तर कुणी दुःखात असतात.
आणि अशा नशीबाच्या खेळाची अनेक उदाहरणे गोविंदाग्रज आपल्या या कवितेत देतात. चला तर या कवितेतच ती सारी उदाहरणे पाहू आणि कवितेचा आनंद घेऊ…
एखाद्याचे नशीब
काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !
कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हेमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला ;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !
झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !
चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी यापरी
पाही कोण अशा हताश हृदया? जो तो असे आपला,
देवा ! तू तरि टाकि अश्रु वरुनी, त्यासाठी तो तापला !
- गोविंदाग्रज
- ◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/