स्मृतिगंध या उपक्रमाचे २५ भाग पुर्ण झाले त्यानिमित्ताने कवी, गीतकार, लेखक, साहित्यिक, समुपदेशक मा.श्री.प्रसाद कुलकर्णी, गोरेगाव, मुंबई यांच्या या उपक्रमासाठीच्या प्रेरक शुभेच्छा….
“आनंदाची अत्तरदाणी शिंपणारा स्मृतिगंध”
प्रिय विजो,
गेले काही महिने दर गुरुवारी आणि रविवारी नेमाने गत पिढीतल्या कवींच्या व्यक्तिमत्त्वांचा आणि त्यांच्या कवितांचा परिचय करून देणारा स्मृतिगंध हा उपक्रम तुम्ही चालवत आहात, तो एवढा सुंदर आहे की दर खेपेस माझ्या मनाला पंख लागतात आणि मी आठवणींच्या नंदनवनात विहार करून येतो. माझ्या जडणघडणीच्या वयात जे चांगले संस्कार झाले त्याचे बरेचसे श्रेय शालेय जीवनातल्या मराठी कवितांना आहे. आपल्या बालपणात इंटरनेट नव्हते, मोबाईल नव्हता, कॉम्प्युटर नव्हता. अगदी साधा फोन देखील नव्हता. शालेय क्रमिक पुस्तकांतल्या कविता वाचणे आणि त्या तालासुरात म्हणणे हेच मोठे आनंदनिधान असायचे. त्या दिवसांनीच माझ्या गात्रांमध्ये कवितांची बीजे पेरली आणि मी पुढे कवी आणि गीतकार झालो. अजूनही एकांताच्या क्षणी कधीतरी अवचित त्यातली एखादी कविता मोहक अप्सरेसारखी माझ्या मन:पटलावर उतरते आणि मला काही क्षणांकरता भारून टाकते.
तुम्ही स्वतः एक उत्तम कवी आहात. काव्यरसिक आहात. परंतु तुमचे कौतुक मला यासाठी वाटते की इतरांच्या कवितांना उमदेपणाने दाद देण्यात तुम्ही कधी हातचे राखून ठेवत नाही. बरे लिहीता ते देखील किती मेहनत घेऊन! त्या कवीची माहिती, त्यांची साहित्यिक कारकीर्द, संपूर्ण काव्यसंचित, त्यांच्या कवितेतील सौंदर्यस्थळे आणि मनात दडून बसलेली त्यांची एक कविता…. हे सारे प्रेझेंटेशन अतिशय रोचक आणि श्रुतिसुखद असते. हे सारे केवळ प्रशंसनीयच नव्हे तर इतरांकराता अनुकरणीयही आहे. सामान्य कवींचा परीघ हा मी, माझा आणि माझ्यापुरता एवढाच मर्यादित असतो. पण तुमचे तसे नाही.
हा उपक्रम आता पंचविशीत आहे. तो असाच निरंतर बहरत रहावा आणि आमच्यासारख्या असंख्य रसिकांच्या मनांवर आनंदाची अत्तरदाणी शिंपित जावा अशा शुभेच्छा आपल्याला देतो.
- प्रसाद कुलकर्णी
गोरेगाव, मुंबई
मला सांगायला आनंद आणि समाधान वाटतं की स्मृतिगंध या उपक्रमाचे आजवर २५ भाग झाले. या उपक्रमाला भावतरंग उपक्रमाप्रमाणेच रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. “दर गुरूवार, रविवार आम्ही आपल्या स्मृतिगंधची वाट पहात असतो”, असे अनेकजण आवर्जून सांगतात. अनेकांच्या नेमाने भरभरून प्रतिक्रिया शुभेच्छा येतात. आणि रसिकांचे हे प्रेम हीच स्मृतिगंध उपक्रमाच्या यशाची पावती आहे आणि मला यातूनच स्फुर्ती मिळत असते.
स्मृतिगंध उपक्रमाचे ५० भाग पुर्ण करण्याचा मानस आहे. आणि हे सर्व भाग संकलित, संपादीत करून “स्मृतिगंध” याच नावाने पुस्तकरुपाने हा उपक्रम प्रकाशित करण्याचा विचार आहे. तशी इच्छा/मागणी अनेक रसिकप्रेमींनीही केली आहे.
ही एकत्रित माहिती अभ्यास/संदर्भ म्हणून इतरांसाठी उपलब्ध करून देणे हाच यामागे उद्देश आहे.
स्मृतिगंध या उपक्रमाला आपल्या मिळाणाऱ्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व रसिक मित्रांचे मी मनापासून आभार मानतो. आपले प्रेम आणि शुभेच्छा अशाच माझ्या सोबत कायम राहू द्याव्यात हीच प्रार्थना…
आपला स्नेहांकित
विजो (विजय जोशी)
डोंबिवली
९८९२७५२२४२
०१/११/२०२०