मन वढाय…वढाय…
बालपणाच्या ज्या गोष्टी मनावर अजून सुद्धा अधिराज्य गाजवून आहेत त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे गावची जत्रा. पूर्वी असा एकही चित्रपट असायचा नाही की, ज्यामध्ये जत्रेचा सीन नसेल. कित्येक चित्रपटाची कथाच गावच्या जत्रे भोवती फिरायची.पूर्वीच्या काळी करमणुकीची कुठलीही साधने नसल्याने जत्रेला अनन्यसाधारण महत्व होते.किंबहुना वर्षातून एकदा भरणारी गावची जत्रा ही आबालवृध्दांचे खास आकर्षण असायची. वर्षभरातील कष्टाचा, संसाराच्या रहाटगाड्याचा ताण या जत्रेतूनच कमी व्हायचा. ही जत्रा ख-या अर्थाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बारा महीने कामच असते. त्यातुन थोडा दिलासा म्हणून जत्रे कडे बळीराजा पाहत असतो. त्या काळी नातेसंबंध,आपुलकी,प्रेम, जिव्हाळा, मैत्री,विश्वास या साऱ्या गोष्टी इथे पाहायला मिळायच्या. इथे गरीब श्रीमंत कुठलाही भेदभाव पाळला जात नसे. सगळं वातावरण कसं आनंदी होऊन जायचं.
जत्रेच्या निमित्ताने सर्व गावकरी मंडळी एकत्र येतात.थट्टा मस्करी, गप्पा गोष्टी होतात. कधी भांडण होतात तर कधी जुन्या भांडणांचा वाद मिटत ही असे. मनोरंजन होते… भजन कीर्तन, लावणी, दिंडी, पोवाडे अश्या अनेक कलेचे सादरीकरण होते… गमतीदार खेळ खेळले जातात… शर्यती पाहायला मिळतात.. काही जत्रेमधून धार्मिक कारणांबरोबरच आर्थिक व व्यवहारिक उलाढालींसाठी सोयीचे केंद्रही जत्रा असते. कधी राजकारण तर कधी समाजकारणाचे ही रंग या जत्रेतून दिसून येतात. जत्रेत हवशे,गवसे आणि नवसे जातात. एक जत्रेत फिरायची ,नवीन नवीन काही पहायची हौस म्हणून येणारे हवशे , दुसरे जत्रेत काही गवसते का म्हणून येणारे गवशे आणि तिसरे म्हणजे देवाला अनेक कारणासाठी नवस बोलणारे नवशे. यानुसार आम्ही पहिल्या वर्गातील म्हणजे हवशे म्हणून जत्रेला जाणाऱ्यापैकी असायचो.
माझ्या मनात सुद्धा जत्रेच्या खूप आठवणी ताज्या आहेत. लहान असताना हदगाव ला दत्तबर्डी येथे दत्त जयंतीची जत्रा तीन दिवस भरायची. गावातील यात्रेची तारीख जरी नुसती जवळ आली तरी गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर चमकलेली दिसत असे. अनेक नातेवाईक- मित्रमंडळी या जत्रेच्या निमित्ताने एकत्र यायचे. घरातील वयस्कर मंडळी आपली लेक जावई सुना नातवंड येणार म्हणून आतुरतेने वाट पाहत असायची. या कालावधीत सुहासिनींची धावपळ उडायची. गावातल्या प्रत्येक घरात सडा सारवन रांगोळी यांचा झगमगाट असायचा. पाहुणे मंडळी येणार म्हणून स्वछता ठेवली जायची . घराघरात पुरणपोळी ,आमरस ,खीर,भजी , कुरूड्या यांचा समावेश असलेला सुग्रास भोजन तयार व्हायचे. गावातील महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई केली जात असे. यात्रेच्या कामात चढ़ा ओढीने भाग घेण्यास सर्व समाजातील तरुणाची जणू स्पर्धाच लागलेली असायची .
जत्रेच्या दिवशी सकाळीच कोणीही न उठवता आपोआप जाग यायची. लवकर लवकर तयार होऊन नवे कपडे घालून बसायचो. कधी एकदा जत्रेला जातो असं व्हायचं. आईच्या मागे जत्रेत गेल्यावर काय काय घ्यायचं याचा लकडा लावलेला असायचा. कधीकधी असंही व्हायचं तिथे गेल्यावर मन बदलायच. मग कशीबशी लाडीगोडी लावून अथवा रडत पडत का असेना आवडलेली वस्तू मात्र घ्यायलाच लावायची. जत्रेमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने, शेतीचे सामान,भांडीकुंडी यांच्या वेगळ्याच रांगा असत. रेवड्या,पेढे, प्लॅस्टीकची बॅट यांसारख्या भरपूर गोष्टींची खरेदी झाली की वेध लागायचे आकाश पाळण्यात बसायचे. पहिल्यांदा मी आकाश पाळण्यात बसल्यावर खाली उतरत असताना पोटात दुखू लागले. मी पाळणा थांबवा- पाळणा थांबवा म्हणून जोर जोरात ओरडू लागलो. पण पाळणा काही थांबवत नसल्याचे बघून मी किंचाळलो. तेव्हा कुठे पाळणा थांबला आणि नेमके त्यावेळी आम्ही होतो सर्वात वर. “मला खाली घेतो की इथून उडी मारू” असे मी रडत रडत म्हणालो. शेवटी एकदाचे जमिनीवर उतरल्यावर माझ्या जीवात जीव आला. त्या काळी हस्तचलित मेरी गो राऊंड मधील वेगवेगळ्या लाकडी प्राण्यावर बसायला मजा यायची.इथे पोटात वगैरे काही दुखायचे नसल्यामुळे भीती वाटायची नाही. त्यानंतर आम्ही जादूचे खेळ पाहण्यासाठी जात असू. झोपलेल्या मुलीचे तलवारीने तुकडे करताना पाहून अंग भीतीने थरथरायचे. जादूगार वर्तमानपत्राच्या कागदापासून नोट बनवायचा. रिकाम्या पिशवीतून कबुतर काढायचा. एका पेक्षा एक त्याच्या करामती पाहून मोठेपणी आपण जादूगारच व्हायचे हा निश्चय पक्का व्हायचा.मौत का कुंआ हा एक हमखास ॲटम जत्रेत असायचा. फटफटी वरून गिरक्या मारणारा तरूणाचा रुबाब हिरो पेक्षा कमी नसायचा. निरनिराळे आरसे लावलेल्या टेन्टमध्ये आपली विचित्र छबी पाहून हसून हसून मुरकुंडी उडायची.
भरपूर भटकंती झाल्यामुळे पोटात कावळे ओरडायला लागले की नजरा वळायच्या हॉटेल कडे. गरमागरम भजे, जिलेबी वर ताव मारायचा. मग उसाच्या गुऱ्हाळातील घुंगरांचा ठेका कानावर पडतो. बर्फ टाकलेला उसाचा रस प्यायलाने पोट गच्च भरून जायचे आणि मग बुड्डी के बाल विकत घेऊन बराच वेळ हातात सांभाळून ठेवायचो. अशा प्रकारे लहान मुलांची जत्रेत एक प्रकारे चंगळ असायची.
तरुणांची गर्दी असलेल्या तमाशाच्या तंबूत मात्र आम्हा लहान मुलांना प्रवेश मिळायचा नाही.जत्रेचा आणखी एक फायदा म्हणजे तमाशासारखी महाराष्ट्राची अस्सल लोककला जिवंत ठेवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते या खेडोपाडी होणाऱ्या जत्रांनीच. रात्रभर मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशांच्या राहुट्यात माणसे जागा पकडून बसायची.
जत्रेतील दुसरे मोठे आकर्षण म्हणजे टुरिंग टॉकीज. पूर्वी दूरदर्शन वगैरे मनोरंजनाचे साधन नसल्याने जत्रेतील सिनेमे पहाणे हे आमच्यासाठी फार मोठे आकर्षण असायचे. नवनवीन मराठी,हिंदी सिनेमे जत्रेतच पडद्याच्या मोकळ्या टॉकीजमध्ये पहायला मिळायचे. “धडाम ढिशुंम चा खेळ.धडाम ढिशुंम चा खेळ.”असे जोरजोरात माईक मधून ओरडणारे एकीकडे तर दुसरीकडे दादा कोंडके च्या सोंगाड्या ची जाहिरात विशेष लक्ष वेधून घेत असे. असा एक तरी सिनेमा बाघितल्याशिवाय गावाकडच्या कोणाचीही जत्रा संपत नसे. एका टुरिंग टॉकीज मध्ये वेगवेगळे पाच-सहा सिनेमे लागलेले असायचे. काही चित्रपट शौकीन तर झाडून सगळे सिनेमे बघायचे. सिनेमाच्या पडद्याच्या मागच्या बाजूला महिलांच्या बसण्याची व्यवस्था असल्यामुळे त्यांना डावखुरा अमिताभ उजव्या हाताने फाईट मारलेला दिसायचा. पण महिलांना यात काही वावगे वाटायचं नाही. दोन-तीन टुरिंग टॉकीज बाजूबाजूला असल्यामुळे एखाद्या सिनेमात गाणे चालू असतानाच दुसऱ्या टॉकीज मधील गोळीबाराचे ठो ठो आवाज मध्येच ऐकू यायचे. या सर्व कोलाहलात जमिनीवर बसून पाहिलेल्या पिक्चरची मजा काही औरच.आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात त्या सिनेमांची आवर्जून आठवण होते. आज पी. व्ही. आर. मध्येही बसून त्या सिनेमांची आठवण मात्र माणूस विसरू शकत नाही.
जत्रेमध्ये एक दिवस कुस्त्यांचा फडासाठी राखीव ठेवलेला असायचा. तांबड्या मातीतले अनेक नावाजलेले मल्ल असतील ज्यांनी आपल्या कुस्तीच्या कारकीर्दीची सुरुवात जत्रेतल्या फडातूनच केलेली बघायला मिळेल. कुस्ती क्षेत्राला लोकाश्रय द्यायचं काम या जत्रेनंच केलंय. छोट्या छोट्या पोरांच्या कुस्तीला बक्षीस म्हणून रेवडी पासून सुरुवात व्हायची. एक दोन रुपयापासून कुस्त्या लागायच्या. कधीकधी जिंकलेल्या पैलवान कमी पैसे दिले म्हणून रुसून बसायचा. एकाच मैदानात एकाच वेळी तीन-चार कुस्त्या चालू असायच्या. कुस्ती मारलेल्या पठ्ठा जोरात शड्डू ठोकायचा. कोणीतरी विजेत्या पैलवानाला खांद्यावर उचलून घ्यायचे. एखादी कुस्ती चुरशीची झाली तर चितपट करणाऱ्या पैलवानाला ठरलेल्या बक्षिसापेक्षा लोकांनी दिलेली उस्फुर्त बक्षिसीच जास्त असायची. शेवटची मानाची कुस्ती असायची पाचशे एक रुपयाची. मुख्य पैलवान शड्डू ठोकून मैदानात चक्कर मारायचा. कोणी खेळायला तयार झाले नाही तर वस्ताद मंडळी बळेबळेच एखाद्याला तयार करायची. कधी कधी तुल्यबळ लढत व्हायची. रंगात आलेल्या कुस्तीचा हलगी च्या गजरात सर्वजण आनंद घ्यायचे. विजयी पैलवानाचे कौतुक करताना कोणी आखडते घ्यायचे नाही.
त्याकाळी जत्रेत कुस्तीसोबतच बैलगाडीच्या शर्यतीदेखील व्हायच्या. सध्या न्यायालयाच्या निर्णयामुळे या शर्यती बंद झाल्या. पण जत्रा आली की विविध शेतकऱ्यांच्या सर्जा-राजांची आणि त्यांनी गाजवलेल्या मैदानांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कुणीही काहीही म्हणो, तमाशाचा फड असो किंवा कुस्तीचं मैदान असो जत्रांचा हंगाम असल्याशिवाय त्यात मजा नाही येत. लोकांची देवावर असणारी श्रद्धा भक्ती इथे पाहायला मिळायची .
दत्त मंदिर परिसरात पालखी मिरवणुकीचा मार्ग रंगीबेरंगी पताकांनी सजविलेला असायचा. पालखी मिरवणुकीत सतत ढोल ताश्याचा आवाज दुमदुमत असायचा. मंदिराच्या अंगणात पारंपरिक सनई-चौघडा वाजत असे.मंदिरात जायचे असल्याने घरची मंडळी प्रसादात पेढे मुरमुरे घ्यायची.पोतराज ,वासुदेव हे आपली कला दाखवून पैसे मागायचे. जत्रेमधे वेगवेगळया समाजाला वेगवेगळा मान असे. त्याच्याशिवाय दुसरा कोणी तो कामं करू शकत नव्हता. पूजेचा मान , अभिषेक करणे , बत्ती सांभाळणे , नारळ फोड़णे, पालखीला खांदा देणे अशा विविध कामाचा मान विशिष्ट समाजाकडे असतो. यातूनच एकत्रीकरण होवून एकीची, बंधुत्वाची माळ तयार होत असे. यातूनच मानवता मोठ्या डौलाने बहरते . नैवद्य व पूजेचा मान गावातील पाटलांना असतो, पालखीचा मान भोई समाजाला आहे .बत्तीचा मान इतर समाजाकडे असतो . उद घालण्याचा मान गावातील सर्व समाजाच्या प्रतिनिधीना असतो .एकंदरीत पाहिले तर गावातील सर्व देव -देवतानी , सर्व समाजाला एकत्रित आणून त्यांच्यामधे बंधुभाव निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील भारत जाती -पातीच्या पलिकडचा आहे. याला कारण म्हणजे गावाकडील जत्रा आहेत. गावाची नाळ तुटलेली शहरातील मंडळी जत्रेच्या निमित्तानं वेगवेगळे उद्देश असले, तरी पुन्हा एकदा मातीतल्या संस्कृतीशी जोडली जात आहेत. एवढंच नव्हे आता व्हाटसअप फेसबुकसारख्या सोशल मीडियावरही गावाकडच्या जत्रेतील क्षणचित्रं दिसायला लागली आहेत. जे लोक शहरात जाऊन नौकरी करत. त्यांनी गावाला , गावच्या जत्रेला कधीच विसरली नाहीत.गावाबरोबर कायम स्नेह जपला .तुम्ही कितीही मोठे व्हा. गावाला विसरले की सर्व काही संपले हे मात्र खरं .मोबाईलच्या अधुनिक युगात गावातील जत्रेत बदल होत आहेत. पहिल्या सारखी जत्रेत गर्दी आत्ता पहायला मिळत नाही हे नक्की. पण याला काही प्रमाणात सोशल मिडीयाचे वाढते प्रस्थ जबाबदार आहे.
जत्रेच्या आठवणी निघाल्या ना की, मन अगदी भरून येते. काही निरागस सुखद क्षण असे आहेत की, ज्यांची तुलना शहरातील सद्यकालीन आनंदनगरी,एक्झबिशन नव्हे तर एस्सेल वल्डशी होणं दुरच. खरंच गावातील ‘जत्रा’ व शहरातील ‘यात्रा’ व महानगरातील ‘फन फेअर’ यामध्ये खूप खूप अंतर आहे.
पण एक खंत व्यक्त कराविशी वाटते की, आजची पिढी जत्रेत कुठे आहे ? आजच्या पिढीला आनंद केवळ क्षणिक लाभतो तो माँल मध्ये. विशेषतः स्वतःचा स्टॅन्डर्ड जपू पाहणारे
आजचे पालक मुलांना मजबूत व कणखर होऊच देत नाहीत. त्यांचे काळजी घेणे चुकीचं आहे असे मला म्हणायचे नाही. पण मुलांची काळजी घेण्यात अतिशयोक्ती व्हायला नको.
आजच्या काळातही जत्रेविषयीची आपुलकी कायम राहिली आहे. बदलत्या काळात काही गोष्टी बदलल्या असल्या, तरी जत्रेचं आकर्षण बदललेलं नाही. ‘जुनं ते सोनं’ म्हणतात, ते या जत्रांबाबत घडतं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘गावच्या जत्रेला काय जायचं,’ असं म्हणून नाकं मुरडणारी शहरी तरुण मंडळी अलीकडे जत्रेकडे वळू लागली आहे. त्यामागे हेतू सहलीचा असतो किंवा फोटो इव्हेंटचा; पण ते जत्रेत सहभागी होत आहेत हे ही काही कमी नाही. काहीवेळा तर वेगवेगळ्या गावांतली जत्रा अनुभवण्यासाठी तसं प्लॅनिंगही करण्यात येते. गावाकडे घर असलेल्या मित्राचं जत्रेचं आमंत्रण आता आवर्जून स्वीकारलं जातं आहे. जत्रा फेस्टिव्हलचा आनंद आता समजू लागला आहे.
‘टिपिकल’ ग्रामीण जीवनाचा अनुभव देणारा हा जत्रेचा उत्सव फोटोग्राफर्ससाठी ‘कलर्स फेस्टिव्हल’, खवय्यांसाठी ‘खाद्य महोत्सव’, तर संस्कृती परंपरेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ‘कल्चरल फेस्टिव्हल’ ठरतो. जत्रेत जेवढे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मिळेल तेवढी आम्हाला कुठेच मिळणार नसल्याने शेवटी एवढेच म्हणेन…
आरं काठी न घोगंड घेवू द्या की रं
मला बी जत्रला येवू द्या की रं…
दिस आला माथ्यावर
बघ दुपार झाली भर
त्या गोट माळावर
कुणबी सोडून नांगर
टाकी वैरण बैला म्होर
घेतो विसावा घटकाभर
त्याची अस्तुरी सुंदर
आली घेवून भाकर
पाय भाजत्याती चरचर
कशी चालतिया भरभर
आरं कांदा न भाकरी खाऊ द्या …
आरं काठी न घोगंड घेवू द्या की रं
मला बी जत्रला येवू द्या की रं…
लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,नांदेड
94218 39333