आंबेडकरी विचारांतून बुद्धाचे तत्वज्ञान प्रकटते – गंगाधर ढवळे

नांदेड – प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष केला. त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करून अस्पृश्य समाजाची पुनर्रचना केली. एवढेच नव्हे तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून नव्या राष्ट्राची उभारणी केली. आंबेडकरी विचारातच बुद्ध तत्त्वज्ञान सामावलेले असून आंबेडकरी विचारांचे चिंतन केल्यास ते सहज प्रकटते असे प्रतिपादन साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी दिग्रस नांदला येथे केले. ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र’ या ग्रंथवाचनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अर्धापूरचे अध्यक्ष एच. व्ही. मोरे हे होते तर जिल्हा महिला सचिव गोदावरी सावते, तालुका सरचिटणीस मधुकर लोणे, शामराव लोणे, जिजाबाई लोणे, बाबुराव थोरात पाथरडकर, भीमराव सावते, रामजी लोणे, कमलाकर कांबळे, एस. एन. लोणे, कांताबाई सावते, त्रिशला सरपाते, मधुकर सावते आदींची उपस्थिती होती.

भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा दिग्रस नांदला व महिला मंडळाच्या वतीने आश्विन पौर्णिमेनिमित्त ग्रंध वाचन समापन सोहळा गावातील त्रीरत्न बुद्ध विहारात आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना ढवळे म्हणाले की, शिक्षण हे माणसाच्या सर्वांगिण प्रगतीचे महाद्वार आहे. बाबासाहेबांचे जीवनचरित्र अभावग्रस्त मानवी समुहाला जगण्याची, संघर्षाची आणि प्रगतीची प्रेरणा देते, त्यासाठी प्रत्येकाने बाबासाहेब वाचून समजून घ्यावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सोहळ्याच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप व धूप पूजन करण्यात आले. सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर गावकऱ्यांमार्फत मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून बुद्ध विहारात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र’ या ग्रंथाचे वाचन केले त्या ग्रंथवाचक संकेत सरपाते, कावेरी सरपाते, शुभम सरपाते, नंदा सरपाते यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व्यक्तींची समयोचित भाषणे झाली. त्यानंतर महिला मंडळाच्या वतीने खीरदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत सरपाते यांनी केले तर अध्यक्षीय समारोप एच. व्ही. मोरे यांनी केला. शेवटी सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान, अक्षरा सरपाते, कावेरी सरपाते, तिरुपती सरपाते, प्राप्ती सरपाते, प्रतिक्षा सरपाते, रागिणी सरपाते, राजनंदिनी सरपाते या चिमुकल्यांची भाषणे झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्यात आली होती. संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नितीन थोरात, प्रभाकर सरपाते, किशोर सरपाते, आनंदा सरपाते, बंडू सरपाते, भीमराव सरपाते, आप्पाराव सरपाते, सुमनबाई सरपाते, प्रेमला सरपाते, सखाराम सरपाते, दीपक सरपाते, सखुबाई सरपाते, विजय सरपाते, ग्यानू सरपाते, प्रकाश सरपाते, लोभाजी सरपाते, भिवाजी सरपाते, निलाबाई सरपाते आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *