रब्बी पेरणीतून बळीराजाला बळ मिळण्याची अपेक्षा रब्बीसाठी जोमाने तयारी सुरू- तालुका कृषी अधिकारी आर.एम.देशमुख


चालू वर्षातील पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 107.35%असा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी नाले तलाव छोटे मोठे प्रकल्प यासह जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत झालेल्या कामामुळे पाण्याच्या पातळीत स्थिरता आली असून खरीप हंगामातील परतीच्या व सततच्या पावसाने खरीपातील पिकांचू नुकसान झाले असले तरी याच पावसामुळे तालुक्यातील रब्बी हंगामाला हातभार लागणार असून मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे 2018 19 मध्ये अवघ्या सहा हजार हेक्‍टरवर असलेली रब्बी लागवड 2019 मध्ये 17 हजार हेक्टरवर झाली तर चालू हंगामामध्ये हीच लागवड 18 ते 20 हजार हे दरम्यान होईल अशी शक्यता आहे.


शेतकरी बांधवांनो फरदड कापूस घेण्याचे टाळा.


तालुक्यात खरीप हंगामातील कापूस हे पिक महत्त्वाचे असून या पिकाखालील क्षेत्र खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर असते. यावर्षी कापूस पिकाची लागवड लवकर झाल्याने व हे पिक सध्या पक्वतेच्या स्थितीत असल्याने यावर्षी हलक्या जमिनीतील कापूस दोन वेचणीमध्येतर मध्यम व भारी जमिनीतील कापूस तीन वेचणीत संपणार आहे. परतीच्या पावसामुळे चांगल्या जमिनीतील काही कापसात नव्याने पाते फुले व बोंडे लागत आहेत परंतु अशा नवीन कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे ह्याच नवीन नवतीकडे पाहून काही शेतकरी कापूस पिकाला खते व पाणी देऊन कापूस पिकाचा हंगाम वाढवीत आहेत परंतु ही बाब अतिशय घातक असून भविष्यात गुलाबी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरुवातीला फुटलेला कापूस हा बोंडअळी मुक्त असून पहिल्या दोन ते तीन वेचण्या झाल्यानंतर असा कापूस पुढे न ठेवता तो लगेच उपटून काढावा व कुठल्याही परिस्थितीत कापूस पिकाचा हंगाम लांबवू नये. कापूस पिकाखालील रिकामे झालेले क्षेत्र जिथे संरक्षित सिंचनाची व्यवस्था आहे तिथे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिक पेरणीसाठी उपलब्ध करून घ्यावे.जेणेकरून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी जास्तीचे क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध होईल.


तुरीचे पीक फुलोऱ्यात असताना पिक संरक्षण करावे.


खरीप हंगामातील तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून या पिकाची परिस्थिती अतिशय चांगली आहे तालुक्यात या पिकाची आंतरपीक लागवड फार मोठ्या प्रमाणावर आहे या पिकापासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी या पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्या थंडी वाढल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी आहे.परंतू ढगाळ वातावरण असेल तर पिकावर किडीचा धोका वाढतो.या पिकापासून यावर्षी थोडी आशा वाटते. सध्या तरी हे पीक अतिशय चांगल्या अवस्थेत आहे बाजारभाव चांगले आहेत या पुढील काळात आपल्याला या पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी पिक किड रोगापासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी पिक ३०% कळी फुलोरा अवस्थेत असताना पहिली फवारणी लिंबोळी अर्काची ,दुसरी फवारणी क्लोरोपायरीफॉस / क्विनॉलफॉस /प्रोफेनोफॉस यापैकी एक किटकनाशक 20 मिली तिसरी फवारणी ईमामेक्टीन बेंझोएट 4 ग्रॅम प्रती 10 ली पाण्यात (साध्या पंपाने) फुलगळ होऊ नये फुलांचे धुक्यापासून संरक्षण होण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मिली व बुरशीनाशक बावीस्टीन 10 ग्रॅम याची फवारणी करावी. पिकावरील किडींचे निरीक्षण करून उपयोजना हाती घ्याव्यात.


रब्बी पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ अपेक्षित


गतवर्षीच्या रब्बी गहू रब्बी 8400 हे., र ज्वारी 502 हे., मका 419 हे., हरभरा 7300 हे .,करडई भुईमूग भाजीपाला इतर पिके 442 हे. असे मिळून एकूण 17081हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची लागवड करण्यात आलेली होती.
याहीवर्षी रब्बी हरभरा या मुख्य पिकासह तालुक्यात 18 ते 20 हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजित असून सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मुबलक असल्याने व कापूस पिकाखालील क्षेत्र यासाठी उपलब्ध होणार असल्याने यावर्षी क्षेत्रात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी जवळपास 18 ते 20 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. जी मागील काही वर्षांच्या तुलनेत तिप्पट आहे.

येत्या हंगामासाठी सोयाबीन बियाणे घरच्या घरी तयार ठेवा


खरीप हंगामातील तयार सोयाबीनचे बियाणे पुढील हंगामासाठी घरच्याघरी तयार करून ठेवावे .सोयाबीन मधील काडीकचरा ,फुटके ,तुटके बियाणे वेगळे करून ज्युटच्या बारदानामध्ये भरून ठेवावे बियाणे हवेशीर ठिकाणी व एकावर एक जास्त पोते न ठेवता सहा पोत्याच्या थप्पीप्रमाणे ठेवावे.पुढील हंगामासाठी घरचे बियाणे चांगल्या प्रतीचे उपलब्ध होईल.
रब्बी हंगामातही रब्बी पिकासह सोयाबीन पिकाची लागवड करावी तसेच उन्हाळी हंगामात भुईमूग पिकांसह उन्हाळी सोयाबीनची लागवड केल्यास येत्या हंगामासाठी अतिशय दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना घरच्या घरी उपलब्ध होईल तसेच बाजारातही यावर्षी चढे दर असल्यामुळे या पिकापासून शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न होईल .

रब्बी हंगामातील पेरणीने घेतला वेग

रब्बी पिकाची पेरणी करण्यास शेतकरी बांधवांनी सुरुवात केली असून रब्बी पेरणीला वेग आला आहे खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर रब्बी पिकांची पेरणी सोबत झालेली आहे ‌. गहू पिकाची पेरणी करताना बियाण्याला रासायनिक बुरशीनाशकांची व अझॅटोबॅक्टर या जैविक खताची तर हरभरा पिकाला मर लागू नये यासाठी रासायनिक बुरशीनाशकांची प्रथम बिजप्रक्रिया करून ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची व रायझोबियम या जैविक खताची बीजप्रक्रिया करावी. कुठल्याही परिस्थितीत बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाण्याची पेरणी करू नये.हुमनी या किडीपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी फरटेरा हे कीटकनाशक चार किलो प्रति एकर खतात मिसळून पेरणी वेळी द्यावे.


रब्बी पिकाची पेरणी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते यावर्षी रब्बी हंगामातील पेरणी ही या पद्धतीने करावी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर हलके पाणी देऊन पेरणी करावी.


जमीन आरोग्य पत्रिकेचा अवलंब करून एकात्मिक खत व्यवस्थापन करावे शिफारशीप्रमाणे गहू पिकाला नत्राचा अर्धा हप्ता तसेच पूर्ण स्फुरद व पूर्ण पालाश हे पेरणी करतानाच देण्यात यावे उर्वरित नत्राची अर्धी मात्रा 30 दिवसांनी द्यावी. हरभरा पिकाला खत व्यवस्थापन करताना खताची संपूर्ण मात्रा पेरणी वेळीच द्यावी नंतर कुठल्याही प्रकारचे खत या पिकाला देऊ नये.गहू पिकाच्या विद्यापीठाने विकसित केलेल्या व शिफारस केलेल्या जातींचा अवलंब करावा या जाती तांबेरा रोगास बळी पडत नसल्याने या जातीची निवड करून पेरणी करावी. हरभरा या पिकाची लागवड लवकरात लवकर करून घ्यावी गतवर्षी उशिरा लागवड झालेल्या पिकावर तांबेरा हा रोग मोठ्या प्रमाणावर आलेला होता अनुकूल हवामान असल्यास या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. तांबेरा चे नियंत्रण करण्यासाठी प्रोपिकोनॅझोल किंवा डायथेन एम-45 या बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे.पिकाचे मर रोगापासून नुकसान न होण्यासाठी बीज प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे.


हरभरा पिकासाठी सिंचनाचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असून योग्य वेळी सिंचन देणे गरजेचे आहे सिंचनाची वेळ चुकीची निवडल्यास शाखीय वाढ होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते त्यामुळे योग्य वेळी व योग्य प्रमाणात सिंचन अतिशय महत्वाचे आहे या पिकाला तुषार सिंचनाद्वारे सिंचनाचे व्यवस्थापन केल्यास व रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ होते.


रब्बी हंगामातील ज्वारी करडई या पिकाची पेरणी प्रथम प्राधान्याने करून त्यानंतर हरभरा गहू या पिकांची पेरणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *