नांदेड;
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 12 डिसेंबर 2020 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे . या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप, व न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मो.अ.दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. या लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप व न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले असुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी 12 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.