माय सरली… आठवण उरली!

प्रेमे स्वरूप आई… वात्सल्यसिंधू आई… बोलावू मी तुझ आता… मी कोणत्या उपायी… या माधव जूलीयन यांच्या कवितेच्या ओळी वाचताना डोळ्यात आसवे आल्याशिवाय राहणार नाहीत. आई काय असते हे आई गेल्याशिवाय कळतच नाही.

माझी माय श्रीमती सुमित्राबाई गोविंदराव पाटील आगलावे ही दिनांक 16 ऑक्टोंबर 2020 रोजी आमच्या आगलावे परिवारातून निघून गेली. आई जाण्याचे दुःख काय असतं हे पोरके झालेल्या मुलाशिवाय इतरांना कळत नसतं. आम्ही तिघे भाऊ, प्रल्हादराव, उत्तमराव व मी दादाराव व एक बहीण उज्वलाबाई तेलंग (गवूळ) हे आमचं अल्प कुटुंब. माझ्या मायचा पारतंत्र्यात जन्म झालेला. अत्यंत हलाखीची परिस्थिती परंतु माझ्या लेकरांना शिकावावं यासाठी तिने खूप कष्ट सोसले अत्यंत हलाखीचे दिवस माझ्या मायीनं पाहिले. शेतीमध्ये काही पिकायचं नाही. घरी स्वयंपाक करण्यासाठी अनेकदा ज्वारी नसायची. कसाबस करून शेजारी-पाजारी कडून ज्वारी-पीठ आणून आपल्या संसाराचा गाडा पुढे रेटायची.

माझी माय अनेक वेळा आम्हा भावंडांना पोटभर खायला घालून हलवत: पोटभर खाल्ल्याचे भासवून उपाशीच झोपयची पण हे तीनं आम्हाला शेवटपर्यंत कळू दिलं नाही. तीने खूप कष्ट सोसले अनेक दुष्काळं पाहिले परंतु माझे वडील स्वर्गीय ज्येष्ठ ग्रामीण कवी गोविंदराव पाटील आगलावे व माझी माय सुमित्राबाई यांना आपले मुलं खूप शिकून मोठी झाली पाहिजेत हाच ध्यास पुढे ठेवून त्यांनी संसाराचा गाडा चालू ठेवला.

मला लहानपणी गुळ खाण्याचा खूपच नाद होता. मी मायी समोर रडायचा व गुळाची मागणी करायचा खूप वेळाने मला माय रडल्यानंतर गुळ द्यायची. माझ्याबरोबर माझी आक्का उज्वलाबाई हिलाही ती माझ्या इतकाच गूळ द्यायची. मला रडून गूळ मिळायचा व तिला काहीच न करता मिळायचा याबद्दल मला खूप वाईट वाटायचे. माय जेव्हा शेताकडे जायची तेव्हा मला सोबत घेऊन जायची. एके दिवशी शेतातील काम झाल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो होतो जेवता जेवता रस्त्याच्या कडेला लक्ष गेले तेथे एक व्यक्ती म्हैस दोरीला बांधुन घेऊन जात होता. मला दही व ताक खुप आवडायचे पण मिळायचे नाही म्हणून त्यावेळेला त्या व्यक्तीकडे पाहून मी म्हणालो होतो बाबा तुम्ही माझी उगी पप्पी घेत लाड करत राहता परंतु कधी म्हैस घेऊन येत नाही. माझे हे शब्द एकूण त्यांचे काळीज फाटले असावे परंतु त्या वेळेला मला एवढे कळाले नव्हते की आपली परिस्थिती त्यावेळेची दहा हजार रुपयाची म्हैस घेण्याची नाही. मायीने पदर आडवा करुन न कळू देता डोळ्यात कचरा गेल्याचे भासवत रडू लागली. परीस्थीतीमुळे आपण आपल्या लेकरांची इच्छा पुर्ण करु शकत नाही.

मी जेव्हा एखाद्या गोष्टीचा अठ्ठाहास करू लागलो त्यावेळेला माय मला मारायची नाही कडेवर बसवायची आणि दूर नेऊन सोडून द्यायची किंवा उतरंडीकडे घेऊन जायची, पुन्हा माझे रडणं बंद झाले की मी थोड्या वेळाने तिच्याजवळ येऊन पुन्हा बसायचा. मला पुरणपोळी जीवापाड आवडायची. एखादा सन पुढे दहा दिवस असतानाच मी घोकत रहायचा, माय सन केंव्हा आहे? मायीला माझ्या भावना कळायच्या पण पुरण-पोळी करुन देण्यासाठी घरात कांहीच नसायचं. आमच्या भावकीत कुणाच्या घरी पाहुणा आला का याकडे मी लक्ष ठेऊनच रहायचा. कारण त्यांच्याकडे त्यादिवशी त्याघरी नक्की गोडधोड होणार. अशी संधी आली की मी मायीला आग्रह करुन त्या घरी घेऊन जायला लावायचाच. मग सोबत लेकरु आलं म्हणून थोडं पुरण मीळायचं कधी निराशा पदरी पडायची. माझ्या जीवनात घडलेले असे कितीतरी गरिबीचे प्रसंग आमच्या वरती ओढडवले होते. बाबा व मायीनं आमच्या शिक्षणासाठी खूप कष्ट सोसले माझे मोठे भाऊ ॲड. प्रल्हादराव आगलावे यांच्या दहावीच्या परीक्षा फीस साठी मायीने हातातील चांदीचे कडे विकून फीस भरली होती हे तिनं आनंदाश्रू गाळत आमच्या समोर सांगितलं आमचे मोठे भाऊ प्रल्हादराव यांनी कमवा आणि शिका या योजनेचा लाभ घेऊन शिक्षणाचा रथ पुढे चालू ठेवला त्याकाळी शाळेमध्ये सुगडी (खाऊ) मिळायची. काही श्रीमंताचे मुलं सुगडी खायचे नाहीत आमच्या अण्णांनी सर्व मुलाकडील सुगडी जमा करून घरी मायीच्या स्वाधीन करायचे त्यावेळेला आमच्या घरात सना सारखं पोटभर अन्न आम्हाला मिळायचं. माय तिच्या संसाराची कहाणी आमच्यासमोर मांडतांना हसत-हसत सगळ सांगायची परंतु आमचे डोळे मात्र पाणावल्या शिवाय राहायचे नाही.

माझ्या मायीचं वय नव्वद वर्षाचंं 90 वर्षांमध्ये तिने अनेक चढ-उतार पाहिले अनेक संकटांचा सामना करत आम्हाला लहानाचं मोठं केलं परंतु आपला कमीपणा कधीही कुणापुढे तिने सांगितलेला नाही. ती पहाटे ४ वाजता उठून ६ वाजेपर्यंत जात्यावर दळायची. ती जात्यावरील ओळ्या म्हणायची. जेंव्हा आण्णाचा अभ्यास असायचा त्यावेळी जात्यावरील ओव्या बंद रहायच्या. मायीनं कापूस वेचून त्या मोबदल्यात आलेल्या पैशातून पितळंच भांड विकत घेतलं आहे ते आज आम्हाला सोन्याच्या भांड्याईतकं मौल्यवान आहे. मायीनं घेतलेली पाच रुपयांची लाकडी काटवट घरातील मौल्यवान वस्तू पैकी एक ठरली आहे. मायीने ४ आन्याला घेतलेला दिवा (चिमणी) त्या दिव्यावरच आम्हा भावंडांचे दिवे तेवत आहेत.

माझ्या मायीचा वर्धापकाळ जवळ येत असताना सर्व भावंडांना एकत्रित बोलावून सलोख्याने राहण्याचा सल्ला दिला आम्हाला त्यावेळी खूप भरून आलं मायीचा सल्ला म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी आमची देन होती. दि. 14 जुलै 2016 रोजी बाबा आमच्यातून निघून गेले त्याच वेळी मायीची तब्येत खूपच बिघडलेली होती मुखेड येथील ख्यातनाम डॉक्टर मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांच्या उपचारानंतर मायीला पुढील चार वर्ष आयुष्य भेटलं आम्हाला तिची सेवा करता आली आम्ही डॉ.पुंडे साहेब, डॉ. विरभद्र हिमगीरे साहेब व सुप्रभात मित्रमंडळ, जिप्सी परीवार यांचे उपकार कधीच विसरु शकणार नाही.

माझी माय सरली परंतु तिच्या अनेक अशा आठवणी मात्र शिल्लक राहिल्या. माय सरली पण आठवण उरली असेच म्हणावे लागेल.


दादाराव आगलावे, वर्ताळकर.
ता.मुखेड जि.नांदेड.
संवाद- 94 22 87 47 47.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *