आजकाल मुलं थोडी मोठी झाली आणि त्यांचं खेळण्यातल्या तीन चाकी सायकलने खेळून खेळून मन भरलं की पहिला हट्ट असतो” बाबा मला त्या अमक्यासारखी सायकल पाहिजे”.
पैसे असो की नसो पण बाप पुढच्या वाढदिवसाला ते देण्याचं कबुल करतोच. त्याला ही माहीत असत की हा मुलाचा हट्ट काही बाकी खेळणी सारखा वाया जाणारा नाही. त्यात फायदाच फायदा आहे. लहानपणी सायकल चालवली की उंची वाढते अशी एक सर्वसाधारण कल्पना असे. पण उंची वाढो ना वाढो मुलाचा व्यायाम जरूर होतो. आणि त्याचा पुढे शरीराला पण चांगला फायदा होतो.
बापाला नुसती सायकल घेऊन चालत नाही तर ती शिकवायला वेळ ही द्यावा लागतो. जर मोठा भाऊ असेल तर तो ही शिकवू शकतो पण बाबा जेंव्हा मुलांना सायकल शिकवतात तेव्हा जास्त आनंद होतो .कारण ते मन लावून आणि काळजीने शिकवतात. मोठा भाऊ पण शिकवितो पण तो कधी रागावतो,कधी मारतो पण बाबा अस काही करत नाहीत.
एक दिवस मी असाच सकाळी गल्लीत फेरफटका मारत होतो आणि अचानक एक लहान मुलगा सायकलवर जोरात माझ्या दिशेने येतांना दिसला. वेग जास्त,हातातलं हँडल वाकड तिकडं होत होतं, आणि चेहरा थोडा भेदरलेलाच दिसत होता. वाटलं आता हा सायकल माझ्या अंगावरच घालणार आहे. मागे त्याचे बाबा ब्रेक मार ,ब्रेक मार म्हणुन ओरडत,धापा टाकत सायकल पकडण्यासाठी धावत होते. पण मुलाला या भेदरलेल्या स्थितीत काहीच कळत नव्हतं. आता त्याचा पूर्ण तोल जाणार तेवढयात मी त्याची सायकल पकडली आणि थांबवली. ” अरे अरे हळू चालव, पडशील बाळा ” म्हणत अर्धी कलंडलेली सायकल त्या मुलासह सरळ केली. आणि हँडल ला धरून त्याला आधार दिला. आता त्याला थोडा धीर आला होता आणि आपण पडता पडता वाचलो असा सुस्कारा टाकण्याचा हावभाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
“दिलीपभाऊ थॅंक्यु. पकडलं म्हणून बर झालं नाही तर पोरगं पडल असत खाली”
बाबाने पण पोरग पडलं नाही काही इजा झाली नाही या आनंदात माझे आभार मानले.
” नवीन सायकल दिसते. पोराला बर्थडे गिफ्ट का ?” मी सहजच विचारलं. ” हो हो. खुप हट्ट धरला होता पोरानं. मला ही वाटलं पोरग पहिल्यांदाच चांगली गोष्ट मागतोय मग काय दिली वाढदिवसाची गिफ्ट” म्हणत मुलगा आणि बाबा परत सायकल शिकण्यासाठी पुढे निघाले.” सावकाश चालवायला सांगा. मी अनुभवाचे दोन बोल सांगितले आणि मी पुढे निघालो.
बापलेका कडे बघुन मला ही माझ्या लहानपणीचे प्रसंग झटकन डोळ्या समोर आले. पाचवी सहावीत असताना असाच हट्ट करून बाबा सोबत जाऊन मी ” प्रभाकर सायकल मार्ट” मधून माझी पहिली सायकल घेतली होती. तशी ती मोठ्या सायकलपेक्षा फारच छोटी होती .पण ती मिळाल्यावर माझा आनंद गगनात मावत नव्हता. मित्रांनी बघावी ,मला थोडा मस्का लावावा आणि थोडा हेवाही करावा म्हणुन मी ती सायकल घेऊन कॉलनीत फिरायचो. पाहिले दोन तीन दिवस तर घरचे शोधत आले हा कुठे गेलाय म्हणुन, इतका वेळ मी त्या सायकल दाखवण्याच्या नादात बाहेरच असायचो. मी सायकल वर आणि मित्र माझ्या मागे पळायचे. त्यांनाही थोडी चालवायला मिळायची.
कधी कधी मी शाळेच्या ग्राउंड वर सायकल घेऊन जायचो. सुरुवातीला सायकल धरून शिकवायला कोणी ना कोणी सोबत असायचं.
पहिल्यांदा सायकलवर बसवले की दोन्ही हात हँडलला धरून ते आम्हाला फिरवायचे. एक-दोन दिवस गेले की मग पायडल मारायला शिकवायचे. कितीतरी वेळ आम्ही सायकलवरून पडायचो, मार लागायचा,खरचटल जायचं पण त्याची फार काळजी नसायची. जिथ मार लागला त्याच्यावर माती टाकून जखमेवर गावठी इलाज व्हायचा. पूर्वी कैंची मारणे हा एक प्रकार होता. ज्याचे सायकलीवरून जमिनीवर पाय पोचायचे नाही त्याच्यासाठी ही पळवाट असायची. ही कैंची मारून सायकल चालवायची पध्दत बहुतेक आजच्या तरूण पिढीला माहित ही नसावी. एकदा सायकल चालवायला आली की मग सायकलवर बसण्याची प्रॅक्टीस चालू व्हायची. पायडल मारता मारता सायकलवर बसायची कला काही वेगळीच. ज्याला ते नाही जमायचे ते सायकल थोडी आडवी करून त्यावर टांग मारून बसायचे. सायकल चालवण्याचा कॉन्फिडन्स आल्यानंतर मग मात्र कधी एकटे सायकल चालवू असे व्हायचे.
कधी कधी ज्यांच्याकडे स्वतःची सायकल नसेल ते सगळे मित्र भाड्याने पण छोटी सायकल घ्यायचे.बहुधा ती लाल किंवा चॉकलेटी रंगाची असायची आणि तिला मागे कँरीअर नसायचे. बहुतेक कुणाला डबल सिट नेऊ नये हा त्या मागचा उद्देश असायचा. गल्लीत किमान दोन-तीन तरी भाड्याच्या सायकलची दुकाने असायची.
भाडे जेमतेम तासाला ५० पैसे च्या आसपास असायचे. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. सुरुवातीला ओळख नसली तर कोणाची तरी ओळख द्यावी लागायची. दोन-तीनदा सायकल घेऊन गेल्या नंतर दुकानदाराची ओळख व्हायची. मग तर काय आपल्या शिफारसी वर दुकानदार इतर मुलांना सायकल दिवसभर देत असे. या भाड्याने घेतलेल्या सायकलचे नियम कडक असायचे. जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सायकल चालवणाऱ्या वर असे . सायकल चालवताना ऐट अशी असायची की जसे काही राजा हत्तीच्या अंबारीतून चाललाय. पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो. सायकलच्या मागच्या चाकाला फुगा बांधला की फार मस्त आवाज यायचा. फटफट करत जाणा-या त्या सायकल कडे सर्वजण कुतूहलाने बघायचे. एखाद्याने सायकल आणली की सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे. त्यातून जवळच्या मित्राला एखादी चक्कर जास्त मारायला मिळायची. कोणाला चक्कर नाही दिली तर रुसवे-फुगवे व्हायचे. अबोला धरला जायचा. मग त्याचा बदला जेव्हा तो सायकल भाड्याने आणायचा त्यावेळी घ्यायचा. सायकल चालवताना सारे लक्ष वेळे कडे असायचे. सायकलच्या दुकानात आलाराम घडी हमखास टेबलावर ठेवलेली असायची.
मुलांजवळ घड्याळ नसायचे. पाच मिनिटेही जास्त झाली तर दुकानदार अर्ध्या तासाचे भाडे वाढून घ्यायचा. त्यामुळे वेळ पाहण्यासाठी व भुर्दंड टाळण्यासाठी तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर मारण्यात येत असे. दुकानदारही खमक्या असायचा. वेळ संपत आली हे कधीही सांगायचा नाही. वेळेआधी सायकल आणून सोडण्यात कसरत करावी लागे. लहानपणी कधीतरी भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या सर्वांच्या आवडीचा विषय असायचा.स्वतः ची लहान सायकल असणा-यांची बातच काही और असायची. आपोआपच त्याच्याकडे लीडरकी जायची. तो सांगेल तसे ऐकावे लागायचे.
घरात वडिलांची किंवा मोठ्या भावाची सायकल असेल तर तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं यातचं दमछाक व्हायची. सायकलला हात न लावण्याची सक्त ताकीद भावाची असायची. हात लावला तर मार खाशील अशी धमकी तो द्यायचा. तरी पण धमकीला न जुमानता घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन पोरं बाहेर पळायची. सायकल शिकता शिकता डबल सीट चालवायला शिकलो. काही वात्रट कार्टी तर पुढे एक आणि मागे एक मुलगा बसून ट्रीपल सीट सायकल चालवायचे.
शासकीय विद्यानिकेतन या शाळेत असताना कधीतरी रविवार पाहून सायकल ट्रिप असायची.ट्रीप साठी नवीन सायकल भाड्याने कुठे मिळेल याकडे सर्वांचे लक्ष असायचे.रस्त्यावरून सायकल चालविताना तारांबळ उडायची. चौक समोर असला तर तो पार होईपर्यंत धाकधूक वाढलेली असायची. एखाद्यावेळेस सायकलवरून उतरावे लागले तर परत त्यावर बसताना घाबरगुंडी व्हायची. त्यामुळे दोन तीन मित्र एकत्रच सायकल चालवत असू. कोणी जोरात सायकल चालू लागला की मग ओरडून त्याला थांबायला लावायचे. डबल सीट चालवणाऱ्यांना पोलिसांची फार भीती असायची. तेव्हा असे वाटायचे की पोलिसांकडे फक्त एकच काम असावे ते म्हणजे डबलसीट चालवणाऱ्यांना पकडण्याचे.
बहुतेक सायकलींना चैन कवर नसल्यामुळे चैन वारंवार पडायची. चैन बसवताना हात काळे व्हायचे. पण त्याचे काही वाटायचे नाही. मॅट्रिक पास झाल्यानंतर कॉलेजला जाण्यासाठी वडिलांनी नवीन सायकल विकत घेऊन दिली. त्याच्या हँडल थोडेसे वेगळे होते .मी ऐटीत सायकल वरून कॉलेजला जात असे. त्याकाळी पूर्ण कॉलेजात एक दोन जणच लूना किंवा मोटार सायकल आणायचे. रोज सकाळी घरून निघताना सायकल पुसायची. संध्याकाळी घरी परत आल्यानंतर पुन्हा एकदा सायकल पुसून ठेवायची. सुट्टीच्या दिवशी सायकलीला मनसोक्त आंघोळ घालून चकचकित करायचो. पाच दहा पैशात हवा मारून मिळायची. पण ती बचत व्हावी यासाठी बहुतेकांच्या घरात हवा मारण्याचा पंप असायचा. त्या पंपाने हवा मारत असताना चांगलाच व्यायाम व्हायचा.
सायकल सजवायची एक फॅशन होती त्या काळी. दोन्ही हँडलला रबरी तारा किंवा खराब झालेल्या अॉडियो कॕसेटच्या रिळ लोंबकवत ठेवण्याची जणू फॕशनच होती. मागच्या चाकाच्या मडगार्डला चिखल किंवा पाणी उडू नये म्हणून रबरी कव्हर असायचे. त्यावर वेगवेगळ्या आकर्षक मजकूर लिहिलेला असायचा. चल हट पीछे, आई-वडिलांची कृपा, हम पंछी एक डाल के किंवा मुकद्दर का सिकंदर, शोले यासारखे चित्रपटाचे नाव त्यावर हमखास आढळून यायचे. काही दिवसानंतर सायकल सुटली ती कायमचीच. त्यानंतर फक्त जिम मधील सायकल चालवण्याचा योग आला. पण त्यात तितकी काही मजा नव्हती.खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे पण आता ते दिवस नाही…
तो आनंद नाही….
आता सगळे चित्र बदलून गेलेलं आहे. पूर्वी रस्त्यात जागोजागी आढळणाऱ्या सायकली आता विस्मृतीत गेलेल्या आहेत. दुचाकी आणि चारचाकी या गर्दीत सायकल दिसेनाशी झाली. सकाळी कोणीतरी व्यायाम करण्यासाठी सायकल चालवताना आढळून येतो. घराघरात जुन्या सायकली धूळखात पडलेल्या आहेत. त्यांना कोणी विचारत नाही. भाड्याने सायकल मिळण्याचे दुकान तर शोधुनही सापडणार नाही. आमच्या पिढीच्या सुवर्ण काळ गाजवलेल्या सायकलची मजा व सर आता असलेल्या चारचाकी वा दुचाकीला पण येणार नाही…पाहता पाहता पेट्रोल डिझेल चे दर आकाशाला भिडले. आज ना उद्या पेट्रोल डिझेल चा साठा संपेल, मनुष्य काही ना काही तोडगा शोधेल यात शंका नाही. पण कधी कधी मनात विचार येतो. जर काहीच शोध नाही लागला तर कित्ती मजा येईल.
सायकलचा रुबाब पुन्हा वाढेल.पुन्हा माझ्यामधील ते कुमारत्व जागे होईल. धूळ खात पडलेल्या सायकल ला सुंदर धुवून, सायकलच्या मागच्या चाकाला फुगा लावून पुन्हा गल्लीतून एक फेर फटका मारता येईल.
सायकल मेरी जान…
लेखक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर