जवळा देशमुख येथे राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा ; फटाकेमुक्त दिवाळीचे सर्वांना आवाहन करणार!
नांदेड ;
-जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तसेच राज्य अल्पसंख्याक आयोगाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले शिक्षणमंत्री, शिक्षणतज्ज्ञ तथा स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथे दि. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस., कमलाबाई गच्चे, हैदर शेख, सिद्धार्थ लोखंडे, बन्नी लोखंडे, धनराज गोडबोले, विशाल पंडित, मधुकर गच्चे, रत्नदीप गच्चे, संभाजी गवारे, अनिल गवारे, राजवर्धन गवारे, समृद्धी ससाणे, हर्षद यमराज यांची उपस्थिती होती.
प्रशासनाच्या सूचनेनुसार मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलतांना ढवळे म्हणाले की, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन म्हणजे सीबीएसईने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी २०१५ मध्ये राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी युजीसीची स्थापना केली होती. त्यांना कलम के सिपाही म्हणून गौरविण्यात येते. यावेळी उपस्थित असलेल्या तरुणांनी पुस्तके वाचून वैचारिक दिपावली साजरी करण्याची शपथ घेतली. यावेळी राजेश गच्चे, सम्राट गोडबोले, पवन नरवाडे,संघर्ष गच्चे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
प्रदुषणमुक्त दिवाळीची अशी घेतली शपथ…
आम्ही नवयुवक तरुण याद्वारे अशी प्रतिज्ञा घेतो की, यावर्षी दिपावली हा सण वैचारिक पद्धतीने साजरा करणार. या दिवसांत विविध पुस्तकांचे वाचन करणार. दिपावली निमित्त कुणीही फटाके फोडून प्रदुषण करणार नाही, याची काळजी घेणार. आम्ही सर्वांना फटाकेमुक्त दिपावली साजरी करण्याचे आवाहन करणार, अशी शपथ घेतो.