आधुनिक भारताच्या निर्माणाकरता पंडित नेहरूंचे योगदान अमुल्य – गंगाधर ढवळे

शिक्षक सेनेचे आॅनलाईन बालकविसंमेलन रंगले ;  अनेक कवी कवयित्रींचा उत्स्फुर्त सहभाग


नांदेड –

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे राजकारणातील असा चकाकता तारा होते की त्यांच्या अवतीभवती संपुर्ण राजकारण फिरत होते.भारताचा पहिला पंतप्रधान बनुन त्यांनी भारताला गौरवान्वित केले आहे. सोबतच त्यांनी भारताचा मजबुत पाया निर्माण केला शांतता आणि संघटन याकरता निरपेक्ष आंदोलनाची रचना केली. स्वातंत्र्य संग्रामातील एक योध्दा म्हणुन त्यांना यश मिळालं, आधुनिक भारताच्या निर्माणाकरता त्यांचे योगदान अमुल्य आणि अभुतपुर्व असे होते, असे प्रतिपादन येथील साहित्यिक आणि समीक्षक गंगाधर ढवळे यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित आॅनलाईन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक प्र.श्री. जाधव , प्रमुख अतिथी म्हणून पालघर येथील साहित्यिक शिक्षिका शितल संखे, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, तानाजी पवार, मराठवाडा सहसचिव विठ्ठल देशटवाड, जिल्हा सरचिटणीस रविंद्र बंडेवार, कोषाध्यक्ष गंगाधर कदम, उपाध्यक्ष अविनाश चिद्रावार आदींची उपस्थिती होती. 

शिक्षकांच्या विचारांना चालना, बुध्दीला वाव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनने उपक्रम मालिका सुरू केली आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवामध्ये अनेक कला गुण व सामाजिक विचार दडलेले आहेत. त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी योग्य असे खुले व्यासपीठ  उपलब्ध करून दिले आहे. जात, धर्म, लिंग, प्रदेश, पंथ, भाषा असे सर्व भेद बाजूला सारून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

बालदिनाचे औचित्य साधून बालकविसंमेलनाचे आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना ढवळे म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतिहास, राजकारण,साहित्य, संगीत यांच्याबद्दल जेवढं प्रेम होतं त्यापेक्षा जास्त प्रेम त्यांना मुलांबद्दल होतं. मुलं ही पंडितजींच्या हृदयातला एक अमूल्य ठेवा होता. त्यांचा मुख्य उद्देश त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात लोकतांत्रिक परंपरांना मजबुत करणे, राष्ट्राच्या आणि संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेला स्थायीभाव मिळवून देणे, योजनांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरळीत करणे हा होता. या संकल्पांनी आणि उद्देशांनी त्यांना महान बनविले ते सर्वांकरता प्रेरणादायी आहेत.

बालदिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या गुगलमीटद्वारे आॅनलाईन कविसंमेलनात सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, बाबुराव पाईकराव, कैलास धुतराज, पांडूरंग कोकुलवार, शरदचंद्र हयातनगरकर, शोभा गिरी, विश्वनाथ साखरे, सिद्धांत सोनकांबळे, वैशाली सोनकांबळे, प्रतिक गायकवाड, विणा गौड, तुकाराम चव्हाण, प्रल्हाद श्रीनिवार, मारोती जाधव, अनुराधा जोशी, शिवशंकर धोंगडे, हमीद मोमीन, पंडित पवळे, रामलू कानटोळे, सुरेश पवार, रामदास गायधने, रमेश ईटलोड, रंगराव महादवाड, बालाजी गेंदेवाड, बस्वराज मठवाले आदींनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी केले. तसेच सुरेख सूत्रसंचालन शिवकन्या पटवे यांनी केले तर आभार माधव उलिगडे यांनी मानले. या बालकविसंमेलनात सादर झालेल्या उत्कृष्ट दहा कवितांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे शिक्षक सेनेकडून सांगण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *