कवी – यशवंत
कविता – आई म्हणोनी कोणी
यशवंत दिनकर पेंढरकर (उर्फ यशवंत).
जन्म – ०९/०३/१८९९ (चाफळ – सातारा).
मृत्यू – २६/११/१९८५ (पुणे) (८६ वर्षे).
कवी यशवंत यांना “महाराष्ट्रकवी” म्हणून गौरवाने उल्लेखिले जाते.
ते बडोदा संस्थानचे राजकवी होते.
आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्वाचे स्थान आहे.
कवी यशवंत यांचे बालपण आणि शैक्षणिक जीवन अतिशय खडतर गेले. त्यांच्या या खडतर आयुष्यातील अनुभव त्यांच्या कवितेत परावर्तीत झालेले दिसून येतात.
१९१५ ते १९८५ असा प्रतिर्घ काळ त्यांनी कविता लेखन केले.
माधव ज्युलियन, वि.द.घाटे, द.ल.गोखले, गं.त्र्य.खानोलकर या मान्यवर कवी साहित्यिकांचा सहवास कवी यशवंत यांना लाभला आणि त्यांची कविता फुलत गेली. विशेषतः रवीकिरण मंडळातील कवींचा ठसा कवी यशवंत यांच्यावर दिसून येतो.
१९२२ मध्ये लिहिलेल्या त्यांच्या “आई” या कवितेचा गोडवा आजही कायम आहे.
त्यांनी प्रेमकविता, सामाजिक , भावनिक अशा वेगवेगळ्या आशय विषय असणाऱ्या कविता लिहिल्या. समाजातील दिसणारी गरीबी, अन्याय यांचे चित्रण त्यांनी अतिशय दाहकपणे आपल्या कवितेत मांडले.
त्यांच्या स्फुट कवितेत सुमीतांचाही समावेश आहे.
बंदीशाळा (खंडकाव्य),
काव्यकिरीट (खंडकाव्य),
जयमंगला ही २२ भावगीतांची साहित्यकृती,
छत्रपती शिवराय (महाकाव्य),
मुठे, लोकमाते (दीर्घकाव्य),
मोतीबाग (बालकविता संग्रह),
घायाळ (कादंबरी)
अशा विविध दर्जेदार साहित्यकृती कवी यशवंत यांनी मराठी साहित्याला दिल्या आहेत.
या शिवाय मित्रप्रेमरहस्य, तुटलेला तारा, पाणपोई, यशवंती, यशोगंध, यशोनिधी… असे त्यांचे विविध कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.
१९५० मध्ये मुंबई येथे भरलेल्या ३३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
आई या विषयावर अनेक कवींनी कविता केल्या आहेत. पण आई जवळ नसल्याचं दुःख कवी यशवंत आपल्या आर्त शब्दांमध्ये कवितेत जेव्हा व्याकुळतेने मांडतात तेव्हा आपले डोळे नकळत पाणावतात. माणूस असो वा पशू प्रत्येक आई आपल्या मुलाचे प्रेमाने मायेने जवळ घेऊन लाड करते. आई आहे तर सर्वस्व आहे. पण आई नाही तर देव सुद्धा भिकारी आहे. अशा भावनिक शब्दांनी कवी आईची महती सांगतो.
कवी यशवंत यांची साध्या सरळ सोप्या शब्दातील “आई म्हणोन कोणी” या आनंदकंद वृत्तातील रचनेचा आपण आस्वाद घेऊयात.
आई म्हणोनी कोणी
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’
ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’
आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे
गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला
येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे
- यशवंत
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/