माणसाच्या जगण्याचा सरनामा मांडणारा कवितासंग्रह – ‘आम्ही भारताचे लोक’


                भारतीय संविधान स्वत:प्रत अर्पण करण्याला आणि जगाच्या नकाशावर देशाने सार्वभौम सिद्ध करण्याच्या प्रारंभाला ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय संविधान जनमानसात किती रुजले आहे याचा परामर्श घेणे म्हणजे भल्या मोठ्या विस्तीर्ण अशा वाळवंटात सुई शोधण्यासारखे आहे. परंतु गेल्या काही वर्षात काही प्रमाणात संविधानविषयक जनजागृती झालेली किंवा होत असल्यामुळे संविधान समजून घेण्याचा आशादायक आलेख वाढत असल्याचे दिसते आहे. एवढेच नव्हे तर संधिवान जगण्याची, जपण्याची आणि असंवैधानिक कृतींना मूठमाती देण्याचीही जाणीव लोकांमध्ये येत चालली आहे. त्याचबरोबर संविधान समर्थकांतही वाढ होणे ही जमेची बाजू आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संविधानाने चांगला माणूस घडतो हे काही सर्वसाधारण वाक्य नाही. तर जगात सर्वांगसुंदर लोकशाहीचा महान पुरस्कर्ता देश म्हणून भारताची आणि भारतीयांची अमिट ओळख देणारा तो महान राष्ट्रीय ग्रंथ आहे, हे आजतरी मान्यच केले पाहिजे. 


              एकविसाव्या शतकातील भारतात धर्मांधता, जातीयवाद आणि द्वेष पसरवणारी संघटित विचारधारा व राजकारण वाढत चालले आहे, हे अगदी सहजपणे कुणीही सांगू शकेल. त्याचे दुष्परिणाम  म्हणून उमटलेल्या पडसादात अनेकांचे जीवन‌ उद्वस्त झाले आहे. उसळलेल्या धार्मिक दंगलीत झालेल्या हिंसेमुळे अकाली मृत्युमुखी पडलेल्या पुरुष, स्त्रिया आणि मुलांची प्रचंड मोठी यादी पाहिली तर ती अत्यंत भयावह अशीच आहे. त्यात काही महत्त्वाचे लोक इतिहासजमा झाले आहेत. तुम्ही त्यांना ठार मारु शकता पण त्यांचे विचार कधीच मारु शकत नाहीत. त्यांचा विचार ज्यांच्या डोक्यात जन्माला येतो तिथे दाभोळकर, कलबुर्गी, लंकेश वा पानसरे नव्याने जन्म घेत असतात. मारेकऱ्यांना वाटते की आम्ही यांना मारुन आम्ही जिंकलो आहोत. पण ते एका स्वप्नवत जगण्यात जगत असतात. त्यांना माहित नसते की त्यांच्या सांडलेल्या रक्तातून किती रक्तबीजे या मातीतून उगवत राहतील. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाच्या जागी आपापल्या धर्माची कर्मठता लागू करण्यासाठी प्रयत्न होत असतात. तसेच संविधान जाळून ते लागू करता येणार नाही. त्याच्या धगधगत्या ज्वाळांतून संविधानाचे रक्षक जन्माला येतील, हे लक्षात घेतले पाहिजे.


           भारतीय संविधानीतील सर्वांगसुंदर महामूल्यांचा  अंगिकार करुन जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील आदर्शवत  माणसांचा आशावाद घेऊन कवी बाबुराव पाईकराव हे ‘आम्ही भारताचे लोक’ हा कवितासंग्रह घेऊन कवितेच्या प्रांतात दाखल होत आहेत. भारत देश जगासाठी आदर्श आहे, अशी त्यांची धारणा आहे. ती खरीच आहे. बुद्धाचा हा देश सर्व जगाचा विश्वगुरु बनू शकतो याचे एकमेव कारण म्हणजे बुद्धाचा जन्म या देशात होणे आणि बुद्धाने सृष्टीच्या तमाम जीवजंतूंसाठीच दिलेले धम्म नावाचे संविधान हे होय. पण आधुनिक भारतात संविधान नावाचे शिल्प कोरणाऱ्या निर्मात्याने तीच सौंदर्यमूल्ये भारतीय संविधानात कोरली. हे होण्याचे कारण अत्यंत सहजतेने कवी बाबुराव पाईकराव सांगतात. या देशात झालेल्या  धम्मचक्रप्रवर्तनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणतात, 


          सम्राट अशोकानंतर   

     धम्मचक्र तुम्हीच फिरविले,   

      बुद्धांच्या शिकवणूकीचे धडे   

      मनावर आमच्या गिरविले.


धर्मनिरपेक्षता ही संकल्पना सक्रिय करण्यासाठी दोन मजबूत तत्त्वांची गरज आहे. एक- समाजातील वेगवेगळे धर्म व पंथांतील सर्व पुरुष व स्त्रिया संविधान, कायदा व राज्य यासमोर निःसंशयपणे समान आहेत. आपण धर्म, जात, वंश, वांशिकता, भाषा, लिंग यावरून कुठल्याही प्रकारे भेदभाव करता कामा नये, हेच आपल्या संविधानातील वेगवेगळ्या तरतुदीतून व्यक्त केले गेले आहे. दुसरे म्हणजे काही धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना दिलेले विशेष अधिकारसुद्धा याच समता व न्याय्य तत्त्वाला अनुसरून आहेत. यामधून भारताची महानता दुग्गोचर होते. हा आशय कवितासंग्रहाच्या ‘आम्ही भारताचे लोक’ या नामनिर्देशित कवितेत कवीने मांडला आहे. 
        न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता     

   एकतेचा महामंत्र दिला   

   सार्वभौम समताधिष्ठित धर्मनिरपेक्ष   

   महान भारत निर्माण केला


जातीयता समग्र भारतीयांच्या प्रागतिक भूमिकांत येणारा मोठाच अडसर मानला जातो. जातीचे राजकारण, समीकरण, जातीचे संदर्भ केवळ निवडणूकीपुरतेच मर्यादीत नसतात तर ते माणसापासून माणसाला तोडण्याचे षडयंत्रकारी पद्धतीनचे असतात. जातीची निर्मिती ही माणसाच्या एकतेच्या सौंदर्याच्या निर्मितीला कुरुपत्व बहाल करण्याच्या समाजव्यवस्थेची निर्मिती करण्याला कारणीभूत ठरलेली. जातीसाठी माती खाणारे उच्च जातीय काही मूठभर लोक सर्वच निम्नजातीयांचा छळवाद मांडतात. जातीयतेच्या जाळपोळीतून इथला निम्नवर्गीय माणूस भाजून निघालेला आहे. आजही जातीयतेचे चटके नवनव्या स्वरुपात बसत असतात. जातीयवादाच्या अनेक कारणांतून माणूस माणसाच्या जीवावर उठलेला आपण पाहिलेला आहे. एवढेच नव्हे तर आपल्या सभोवताली मानवतेला काळीमा फासणाऱ्या अनेक घटनाही आपण पाहत असतो.  अशा घटनांच्या संवेदनांनी पाईकराव यांच्या ‘जात’ कवितेला जन्म दिला आहे. ते या कवितेत म्हणतात,


        जातीपाई माणूसच     

  माणसाचा जीव घेई   

    अन् ह्यामुळेच मानवतेचा नाश होई   

    मानवा! नको रे     

   हा खटाटोप जातीपाई


तथागत गौतम बुद्धांच्या कालखंडापासून समाजप्रबोधनाचे आणि परिवर्तनाचे प्रयत्न झालेले आहेत. या ऐतिहासिक महापुरुषांच्या क्रमवारीत थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव अत्यंत आदराने घेऊन त्यांच्याबद्दल कवी कृतज्ञता व्यक्त करतो. समाजव्यवस्थेने माणसामाणसांत निर्माण केलेली दरी अण्णाभाऊ साठे यांनी बुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साहित्यातून ही क्रांतीकारी विचारधारा पेरली असल्याचे ठाम मत कवीचे आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातून जे उपेक्षित वंचित समाजासाठीच्या लढ्याची प्रेरणा मिळते ती धम्मविषयक संवैधानिकदृष्ट्या केलेली आंबेडकरी मांडणीच आहे, असा कविला विश्वास आहे. या संदर्भाने अण्णाभाऊंच्या एकूण साहित्य संरचनेची मध्यवर्ती भूमिका ते मांडतात, 


             जग बदल घालुनी घाव         

   भीमवाणी अण्णा सांगून गेले     

      बुद्धांच्या पंचशिलेचे महत्व     

       नायकांच्या कार्यातून दाखविले.


कवी पाईकराव हे जात्याच शिक्षक आहेत. त्यांचे वडील चोखाजी पाईकराव हेही एक आदर्श शिक्षक होते. म्हणून देशाची भावी पिढी निकोप निर्माण व्हावी यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. शिक्षक हा समाजशील प्राणी आहे. तसेच राष्ट्राच्या भक्कम उभारणीत शिक्षकांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आदर्श समाज, गाव तथा देश घडविण्याची जबाबदारी शिक्षकांचीच आहे असे ते मानतात. कवितासंग्रहातील इतर अनेक कविता मुलांवर खोलवर सुसंस्कार करणाऱ्या आहेत. परंतु आजच्या परिस्थितीत सर्वच लोक मूल्यहीन झाले असल्याची खंत ते व्यक्त करतात…
             मूल्यहीन झालेत सारे     

        संस्कारच इथे उरला नाही     

        शिक्षक अभियंता समाजाचा     

       अजून तो हरलेला नाही.


संघर्ष मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे. माणूस तोपर्यंत संघर्ष करीत राहतो जोपर्यंत तो हरलेला नसतो. परंतु माणूस जिंकत नाही तोपर्यंत हरतच नाही. पाईकराव प्रयत्नवादी आहेत. जिंकण्याचे त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांनी कवितासंग्रहाला जी दीडच पानांची प्रस्तावना (की अभिप्राय) दिली आहे, त्यात ते म्हणतात की कवी पाईकराव हे उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रचंड आशावादी आहेत. हे खरेच आहे. तो त्यांचा भाबडा आशावादच आहे. कारण हा आशावाद मलपृष्ठावरही अधोरेखित झालेला दिसतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये हे भोळे-भाबडेपण स्पष्टपणे दिसून येते. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार महापुरुषांच्या विचारांच्या काव्यपुष्पांचा या काव्यसंग्रहातून वर्षाव ते करीत आहेत. कवितासंग्रहातील काव्यपुष्पांचा प्रबोधनकारी सुगंध वाचकास मंत्रमुग्ध करुन एक कल्याणकारी संदेश ते देत आहेत. त्यामुळे सर्वच वयोगटातील वाचकांना काव्यांचा सुखद, परिवर्तनीय आनंद लाभणार आहे. हा एक आशावादच आहे. हे सर्वश्रुत आणि सर्वविदित आहे की, वाचकच आपल्या साहित्याचा दर्जा ठरवित असतात. 


नव्याने लिहिणाऱ्या हातांनी साहित्यविषयक जाणिवांचे स्वरुप समजून घेतले पाहिजे. काव्य आणि कविता यातील फरक त्यांच्या लक्षात आला पाहिजे. आपण कविता लिहितो म्हणजे काय करतो? आपण कविता लिहितो म्हणजे हस्तक्षेप लिहितो. कविता लिहितो म्हणजे पर्याय लिहितो. कवितेच्या माध्यमातून आपण काळोखाच्या गंडस्थळालाच आव्हानित करीत असतो. मुद्रणकलेच्या सुलभतेमुळे आणि उपलब्धतेमुळे काहीही लिहू नये अथवा लिहिले तर छापू नये. छापलेच तर त्याला काही पर्याय नसतो. कारण कविता म्हणजे काही फावल्या वेळातला उद्योग नाही. मांडणी करतांना ते सहज सूचन नसते. पाईकराव यांच्या काही कविता चांगल्या आहेत. पण काही कवितांतून सरळ विधाने आली आहेत. त्यांवर अधिक चिंतन आणि संस्कार आवश्यक होते. आशय आणि विषयाच्या बाबतीत त्यांचे फक्त अनुभवविश्व प्रगटले असल्यामुळे मूळातच आशय नसलेल्या कवितांचे विषयांतर झालेले आपल्याला काही ठिकाणी पहावयास मिळते. 


आम्ही भारताचे लोक हा कवितासंग्रह कवीने त्यांच्या वडिलांच्या स्फुर्तीदायी विचारांना समर्पित केला आहे. परंतु कवीच्या मनात स्थल- काल आणि उद्भवलेल्या परिस्थितीनुसार उगवलेल्या विचारांना कलकवितेचा मुलामा देऊन पुण्याच्या स्वयंदीप प्रकाशनाने प्रथमावृत्ती २६ जानेवारी २०२० लाच प्रकाशनास सिद्ध केला आहे. मुद्रक शिवानी प्रिंटर्स आणि प्रकाशक सुमंत जोगदंड यांच्या संकल्पनेतून कवितासंग्रहाचे एकूणच बांधकाम देखणे झाले आहे. कवी बाबुराव पाईकराव यांच्या अल्पपरिचयातून त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची माहिती मिळते. तसेच त्यांच्या आगामी साहित्याचीही माहिती मिळते. या कवितासंग्रहातील विविध कवितांमधली काव्यबीजे माणसाच्या जगण्याचा सरनामा प्रकाशित करतात, हे इथे आवर्जून नमूद करणे मी आवश्यक समजतो. तेव्हा त्यांचे हे आगामी लेखन दर्जेदारपणाची झूल अंगावर चढवून घेत एक नवी उंची गाठण्याच्या पायऱ्या चढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे असावे, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.


—————————————————————————

समीक्षक – गंगाधर ढवळे, नांदेड.       

        मो. ९८९०२४७९५३.
——————————————————————————-


कवितासंग्रहाचे नांव – आम्ही भारताचे लोक कवी – बाबुराव पाईकराव, डोंगरकडा जि. हिंगोली
प्रकाशक – स्वयंदीप प्रकाशन, पुणे.
प्रथमावृत्ती – प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी २०२०
पृष्ठे – ६५
मूल्य – ८०/- रुपये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *