राज्यातील विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान संपन्न झाले आहे. तीन डिसेंबरला म्हणजे परवा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखालीच या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती. पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी सरासरी २२ टक्के मतदान होत असते. आजच ते सायंकाळपर्यंत कळेलच. मात्र, यंदा राजकीय पक्षांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यामुळे मतदान वाढविण्यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. तसेच, अनेक मतदारांना दूर अंतरावरील मतदान केंद्र आली आहेत. त्यामुळे मतदान करताना मतदारांना त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदार यादीतील आठ हजार ८३४ मतदारांच्या नावासमोरील मोबाइल क्रमांक हे भाजपच्या कार्यकर्त्यांचे असल्याचे आणि दोन हजार २५७ मतदारांची नावे दुबार असून, त्यांची मतदार केंद्रे वेगवेगळी दाखविण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.
तीन पदवीधर मतदारसंघ आणि दोन शिक्षक मतदारसंघ अशा विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज १ डिसेंबर रोजी मतदान झाले. ५ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. करोनाच्या साथीमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. राज्यातल्या विधानपरिषदेच्या पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली तेव्हा या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधान -परिषदेच्या पाच मतदारसंघातून आता १६८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणाऱ्या चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दणका दिला. महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करणारे चंद्रशेखर भोयर यांची पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. महाविकास आघाडीच्या या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर भोयर हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवत आहेत. याची गंभीर दखल घेत भोयर यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी विभागात चार लाख ३२ हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७४ हजार ८६० इतके मतदार आहेत. तर पुणे विभागात मिळून एकूण १ हजार २०२ मतदान केंद्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ६२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड, तर भाजपकडून संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत. इतर प्रमुख पक्षांचे उमेदवारदेखील या रिंगणात उतरले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी ६२ उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत.
औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सतिश चव्हाण यांची ही सलग तिसरी निवडणूक आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपवासी झाल्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पार पडणार आहे. मराठवाडा पदवीधरसाठी मतदारसंघासाठी तीन लाख ७४ हजार ४५ मतदार मतदान करणार आहेत. एकूण ८१३ मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. यासाठी एकूण ३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारात खरी लढत आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदान केंद्रात निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नागपूर मतदारसंघात ३२२ मतदान केंद्रात मतदान पार पडत आहे. नागपूर मतदारसंघात एकूण २ लाख ६ हजार ४५४ मतदार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपने विद्यमान आमदारांना डावलून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडूनही नव्या दमाच्या अभिजीत वंजारी यांना संधी देण्यात आली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपकडून नितीन धांडे निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान भाजप नेते अनिल बोंडे यांच्या बहीण संगिता शिंदेही मैदानात असल्याने भाजप उमेदवारासमोरिल डोकेदुखी वाढली आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक तसेच धुळे-नंदुरबार स्थानीय स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असेल . पुणे पदवीधर आणि शिक्षक, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक या पाच मतदारसंघांत मतदान होत आहे. याबरोबरच धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरिता मतदान होईल. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर राज्यात ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. करोनामुळेच मतदार मतदानाला बाहेर पडतील का, याची राजकीय पक्षांना चिंता वाटते. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांना प्रयत्न करावे लागतील.
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूकीचे मतदान झाले आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यामुळेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून विजयासाठी कंबर कसण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपचे राज्यातील प्रमुख नेते प्रचारात उतरले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारची बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा पवित्रा तिन्ही पक्षांनी घेतल्याचे दिसला होता. कारण शिवसेनेच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीने केलेल्या कारवाईतून ती बाब ठळकपणे अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठीही समन्वयातून एकत्रितपणे पाचही उमेदवारांची घोषणा करण्यात आली. उमेदवारांचा प्रचारही एकत्रितपणे सुरू होता. आता निकालच सांगेल की पुढे काय होणार!
पदवीधरांना बेरोजगार भत्ता मिळावा, सरकारी नोकरभरतीची माहिती गावपातळीवरील पदवीधरांना कळावी तसेच विविध परीक्षांची केंद्रे गावपातळीवर तयार व्हावी यासाठी भरीव कामगिरी करण्यासाठीचे आश्वासन दिले जाते. कोणताही राजकिय वारसा नसताना व पैशाचे पाठबळ नसताना केवळ पदवीधरांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठीच अत्यंत प्रामाणिकपणे प्रत्येकवेळी नवे उमेदवार निवडणूकीसाठी उभे राहतात.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही पदवीधरांच्या कल्याणासाठी असून यामध्ये पक्षीय राजकारणाचा संबंध नाही. पदवीधरांसाठी विधायक कामे करता यावी, त्यांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा याकरिता निवडणूक लढवायची असते. सर्वसाधारण तरुणांना राजकारणात संधी मिळावी, त्यांचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी, शैक्षणीक धोरणात अमुलाग्र बदल घडवण्याची गरज आहे. राज्यकर्ते शिक्षण क्षेत्रात दररोज नवनवीन धोरण आणताहेत. यामुळे प्राध्यापक, शिक्षक या साऱ्यांना याचा फटका बसत आहे. औरंगाबाद येथे शिक्षकांवर लाठीमार करण्यात आला. शिक्षकांवर अन्याय होत आहे. शिक्षक संभ्रमात आहेत. राज्य शासन शिक्षणाचा बट्ट्याबोळ करीत आहे. शिक्षणविरोधी धोरण हाणून पाडण्याची गरज आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. ६० लाख लोकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. असेही आरोप प्रत्यारोप निवडणुकीदरम्यान झाले. सत्ताधारी उमेदवारांनी आम्ही कसे चांगले काम केले हे सांगितले. इतर उमेदवारांनी आम्ही तुमच्यासाठी काय काम करणार याचा जाहीरनामा सादर केला. परंतु ही निवडणूकसुद्धा इतर निवडणुकांसारखीच होऊन निवडून येणारे उमेदवार काहीच काम करत नसतील तर फार अवघड बाब आहे.
पदवीधरांचे प्रश्न नेमके काय आहेत? शिक्षक मतदारसंघातील मतदारांना काय हवं आहे, हा मुद्दा नेहमी चर्चेत येत असतो. पण प्रत्येकवेळी मतदानाची जी नकारात्मकता जशी असते तशी या संवर्गातील मतदारांत कमालीची उदासिनता दिसून येते. वैयक्तिक काही कामे वगळली तर आपापल्या सामुहिक प्रश्नांसाठी संबंधित सरकारलाच जबाबदार धरत असतो. यावेळी आपण मतदान करतो ते फार कमी असते. त्यामुळे या उमेदवारांचे फावते. निवडून येण्यासाठी जास्त मतदान लागत नाही, अशी धारणा पक्की झालेली असते. प्रत्येक घटकाचे प्रश्न स्वतंत्रपणे सोडविता यावेत पदवीधर आणि शिक्षकांचे प्रतिनिधी असतात. हे सुशिक्षितांचे मतदान असते. तेच लोक मागे राहतात. राजकीय लोकंच अशा निवडणूकांचा फायदा घेतात. पदवीधरांचे प्रश्न कायम तसेच असतात. त्यांच्यासाठी ही नेतेमंडळी फारशी सकारात्मक असते असे नाही. आपल्यासाठी स्वतंत्र आमदार असतांना आपण गप्प बसून चालणार नाही.
बेरोजगार पदवीधरांनी हे लक्षात घेतले पाहिजे. आपले प्रश्न आपणच सोडवून घेतले पाहिजेत. ते जर नाही सुटले तर त्या प्रश्नांतूनच नव्या प्रश्नांची निर्मिती होते. आंदोलनाच्या विविध मार्गांनी ते सोडवून घेतले पाहिजेत. एक सशक्त संघटन निर्माण करुन या निवडून आलेल्या आपल्याच प्रतिनिधींना सळो की पळो करून सोडले पाहिजे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
०१.१२.२०