नागपूर पदवीधर मतदार संघाचा निकाल म्हटला तर धक्कादायक, म्हटला तर अपेक्षित असा म्हणता येईल. पण गडकरी, फडणवीस, भाजपा आणि संघाचा बालेकिल्ला या निमित्तानं उध्वस्त झाला, ही मोठी गोष्ट आहे !
प्रत्येकजण या निकालाचे आपापल्या परीने अर्थ काढतील. त्यातला पहिला तुफान अर्थ, विदर्भवादी मित्राकडून व्हॉटसअप वर रात्री उशिरा वाचायला मिळाला. ‘या पराभवातून भाजपने धडा घ्यावा. आणि आम्हाला तात्काळ विदर्भ देवून टाकावा !’ ( आता यावर हसावं की रडावं ? विशेष म्हणजे विदर्भवादी आघाडीच्या उमेदवाराला एकूण मतं मिळाली आहेत – ५२२ )
• ईव्हीएम विरोधकांचा सुद्धा वेगळाच फंडा असणार. ( अर्थात.. त्यावर माझा विश्वास नसला तरी स्वच्छ आणि पारदर्शी निवडणुका व्हाव्यात म्हणून बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, या मागणीला आमचा पाठिंबा आहे )
या निकालाबाबत माझं स्वतःचं आकलन खालील प्रमाणे आहे..
• वंजारी यांच्या विजयाला शिवसेना फॅक्टर जास्त जबाबदार आहे. समजा, त्यांची पाच हजार मतं जरी धरली, तरी त्याचा परिणाम दहा हजार एवढा होतो. कारण त्यामुळे जोशींची पाच हजार मतं कमी झाली आणि वंजारी यांची पाच वाढलित.
• शिवाय महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे आणि एकजूट पक्की दिसत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
• आधीचे काँग्रेसचे उमेदवार बहुधा डमी असायचे. वाड्यावर जाऊन शेपटी हलवून यायचे. वंजारी हे त्या पंथातले उमेदवार नक्कीच नव्हते.
• वंजारी आर्थिक दृष्ट्या सुद्धा मजबूत होते. विशेष म्हणजे ते मनापासून लढले असावेत.
• मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कधी नव्हे एवढा तापला होता. त्यामुळे पूर्वीसारखे काँग्रेसच्या वरातीत वंजारी सोबत फिरायचं आणि जोशींना ‘लव्ह यू..’ चा चोरटा मेसेज पाठवायचा, अशी काही चलाख लोकांची कितीही इच्छा असली, तरी यावेळी त्यावर ब्रेक लागला होता. लोक बारिक लक्षही ठेवून होते.
• यावेळी ओबीसी कार्यकर्ते कोणत्याही नेत्याचे अंधारातले आदेश ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे अशा ओबीसी नेत्यांनी घेतलेल्या सुपाऱ्यांचा देखील खिशातल्या खिशात भुरका होऊन गेला.
• सुपारीचे ठोक व्यापारी गडकरी हेच आहेत. पण उमेदवार त्यांच्या विरोधी फडातील असल्यामुळे गडकरींनी देखील लॉक डाऊनचा फायदा घेत आपले दुकान यावेळी मनापासून उघडले नसावे.
• फडणवीस यांच्या कर्कश ऑर्केस्ट्रातील ढोल फोडण्याची आयतीच संधी असल्यामुळे गडकरींनी तिचा पुरेपूर उपयोग करून घेतला असावा.
या निवडणुकीत अंतिम फेरीपर्यंत पहिल्या पसंतीची जी मतं उमेदवारांना पडली, ती आकडेवारी पाहिली, तर काही खास गोष्टी लक्षात येतील.
• एकूण वैध मतं – १,२१,४९२
• अभिजित वंजारी – ५५, ९४७
• संदीप जोशी – ४१,५४०
• अतुल खोब्रागडे – ८,४९९
• नितेश कराळे – ६, ८८९
यातील अतूल खोब्रागडे हे परिवर्तन पॅनलचे उमेदवार असून त्यांना आम आदमी पार्टी, भीम आर्मी आणि आमची लोकजागर पार्टी यांचा पाठिंबा होता. नितेश कराळे हे अपक्ष होते. हे दोन्ही उमेदवार फ्रेश आहेत. ह्यांना विरोधकांची मते खाण्यासाठी उभे केले, असे आरोपही केले जात होते. आणि तरीही त्यांना ३ आणि ४ या क्रमांकाची मते मिळाली. हे आश्चर्यजनक नाही का ? त्याचवेळी जुन्या आणि मोठे नेटवर्क असलेल्या उमेदवरांची मते बघू या..
• वंचित बहुजन आघाडी – ( राहुल वानखेडे ) – ३,७५२
• विदर्भवादी आघाडी ( नितीन रोंघे ) – ५२२
• प्रशांत डेकाटे ( परिवर्तन पॅनल मधून फुटलेले आणि बीएसपी चे समर्थन असल्याचा दावा करणारे ) – १,८१८
ह्या तिन्ही मोठ्या ग्रुपच्या उमेदवारांची हालत एवढी वाईट का झाली असावी ? कराळे आणि खोब्रागडे यांच्या जवळपास देखील यांना मतदारांनी का फटकू दिले नाही ? उलट या तिन्ही उमेदवारांची एकत्र बेरीज केली तरी अपक्ष कराळे यांच्यापेक्षा कमीच भरते !
माझ्यामते, त्यामागे खालील कारणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही..
• विदर्भवादी चळवळीतील लोक, हे भाजपा किंवा गडकरी यांचे स्लीपर सेल असल्यासारखे काम करतात, हा जुना इतिहास आहे.
• शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना ही तर डायरेक्ट संघ किंवा भाजपचा स्लीपर सेल आहे, यावर शिक्का मोर्तब व्हावे, अशी वागणूक त्यांच्यामधील काही विशेष लोकांची असते !
• वंचित बहुजन यांचा इतिहास ‘त्या’ बाबतीत जगजाहीर आहे.
• बीएसपीला देखील तगडे ‘एटीएम’ असलेला उमेदवार यावेळी गवसला नाही. त्यामुळे त्यांचीही पंगत नागपुरी चना-पोहे खाऊन आटोपली असावी.
याउलट अतुल खोब्रागडे यांच्या टिमसोबत माझी जी चर्चा झाली, त्यात ते लोक पुरेसे परिपक्व आणि समंजस आहेत, त्यांच्या विचारावर ठाम आहेत आणि त्यांचं नियोजन सुद्धा चांगलं आहे, असं जाणवलं. म्हणूनच आमच्या पाटीतर्फे त्यांना पाठिंबा दिला गेला. आणखीही काही सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी होत्या.
आम आदमी पार्टी असो, भीम आर्मी असो की आमची लोकजागर पार्टी असो, आम्ही आपापला स्पष्ट अजेंडा घेवून निर्धाराने पुढं जात आहोत. ह्यावर लोकांनी विश्वास ठेवला असावा का ? आमची स्पष्ट दिशा आणि निर्धार लोकांना भावला असेल का ? या यशात अर्थातच खोब्रागडे आणि त्यांच्या टीमचा सिंहाचा वाटा आहे. पण एवढ्या अटीतटीच्या निवडणुकीत साडे आठ हजार लोकांनी त्यांना मतदान करावं किंवा कराळे यांना देखील सहा हजार नऊशे मतं मिळावीत, ही सहज घेण्यासारखी गोष्ट आहे का ? वंचित, बीएसपी आणि विदर्भवादी या तिन्ही पक्षांची एकत्र मिळून देखील कराळे यांच्या एवढी मतं होत नाहीत, याचा नेमका अर्थ काय होतो ? या पक्ष किंवा संघटनांमधील भाजपा, संघाचे स्लीपर सेल कोण आहेत हे आता लोकांच्या लक्षात आलेले आहे, असा त्याचा थेट अर्थ घेता येईल का ? त्याचाच फटका त्यांना बसला असेल का ?
असो, या निमित्तानं विदर्भाच्या राजकारणात नव्या दमाचे दोन तरुण चेहरे पुढे आले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.
या प्रसंगी अभिजित वंजारी यांचं मनःपुर्वक अभिनंदन ! सोबतच खोब्रागडे आणि कराळे या नव्या शिलेदारांचंही अभिनंदन !
तूर्तास एवढंच..
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर पार्टी
•••
संपर्क –
लोकजागर पार्टी
• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116