कंधार ; प्रतिनिधी
रब्बी हंगामाची लागवड अंतिम टप्प्याकडे सरासरीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ.
खरीप हंगाम 2020 मध्ये खरीप पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झालेले असले तरी रब्बीमध्ये मात्र या पाऊसाचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. सरासरीच्या तुलनेत शंभर टक्के पेक्षा अधिक पडलेला पाऊस प्रकल्पात असलेला पाणीसाठा समाधानकारक भूजल पातळी व सिंचनासाठी पुरेसे प्रमाणात उपलब्ध असलेले पाणी यामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात गतवर्षीप्रमाणे भरीव वाढ होतानाचे दिसत आहे.
रब्बी हंगामातील पेरणी आता अंतिम टप्प्यात
रब्बी हंगामातील पेरणी अंतीम टप्प्यात असून सरासरीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे. रब्बीतील प्रमुख पिकांमध्ये हरभरा ७८०० हे. गहू ७३०० हे. रब्बी ज्वारी ३८० हे. मका व इतर तृणधान्य १२० हे. करडई ४० हे. इतर गळीत धान्य ६१ हे. यांची पेरणी झाली असून अशी एकूण १५७०१ हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे येत्या काही दिवसात पेरणीच्या काम पूर्ण होईल.
फरदड कापूस न घेण्याच्या आव्हानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
यावर्षीचा कापूस हंगाम लवकर आटोपल्याने कापूस पिकाची पर्हाटी उपटून शेतकऱ्यांनी हे क्षेत्र रब्बी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणले आहेत यापुढील काळात उन्हाळी हंगामासाठी क्षेत्र तयार करण्यात येत असून फरदड कापूस न घेण्याच्या कृषी विभागाच्या आव्हानाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
दर्जेदार सोयाबीन बियाण्यासाठी बिगर हंगामी सोयाबीन पिकाच्या लागवडीलाही प्रतिसाद
येत्या खरीप हंगामासाठी लागणारे सोयाबीन बियाणे घरच्याघरी तयार करण्यासाठी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती खरिपातील बियाणे अनेक शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी राखून ठेवले आहे, याव्यतिरिक्त जिथं सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी नवनवीन सोयाबीन वाणांची बिगर हंगामी लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिला असून तालुक्यात रब्बी लेट रब्बी व उन्हाळी हंगामात या पिकाच्या लागवडीचे नियोजन असून आजपावेतो जवळपास ३५एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड झालेली आहे. सोयाबीनच्या नवीन वाण ज्यांना बाजारात चांगली मागणी आहे व चांगले भाव आहेत अशाच सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. बिगर हंगामी सोयाबीन पेरणीसाठी नवीन वाणाचे बियाणे पेरणी करणार्या शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे .
यावर्षी बटाटा लागवडही होत आहे.
यावर्षी बटाटा लागवड इकडेही शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला असून तालुक्यात जवळपास ६० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याचा अंदाज आहे.
ऊस लागवड क्षेत्रातही वाढ.
तालुक्यातील ऊस पिकाच्या तोडणीचे काम वेळेवर सुरू झाले असून परिसरातील अनेक कारखान्यांनी ऊसाची तोडणी वेळेवर सुरू करून अतिशय वेगाने तोडणीचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू केली असून यावर्षी यात तब्बल ४०० ते ५०० हेक्टरने वाढ होईल असा अंदाज आहे. पुरेसं पर्जन्यमान पाण्याची उपलब्धता, वेळेवर होत असलेली उसाची कापणी,मजुरांची समस्या ,तसेच बर्यापैकी असलेले भाव यामुळे ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
मौजे कौठावाडी येथील संभाजी पवळे यांनी केलेली बिगर हंगामी सोयाबीन लागवड वाण एम ए यु एस ७१.