महाराष्ट्रातील हिरे – अभिनंदनास पात्र!

पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचा (आयसर) माजी विद्यार्थी असलेल्या पुणेकर डॉ. सौमित्र आठवलेंच्या बुद्धिमत्तेचा डंका जगभरात वाजला आहे. रसायनशास्त्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘मर्क कंपाउंड चॅलेंज’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आठवले याने बाजी मारत जगभरातील तब्बल १३२ संघांना नमवले आहे. एका विशिष्ट रसायनांच्या निर्मितीचा मार्ग सौमित्रने ९६ तासाच्या स्पर्धेत यशस्वीरीत्या शोधला आहे.

सौमित्रचे वडील प्रा. विनायक आठवले सांगतात की, लहानपणापासूनच संशोधनात करिअर करायचे ठरविल्यामुळे आयआयटीत मिळणारा प्रवेश नाकारून सौमित्रने “आयसर’मध्ये पदवी शिक्षण घेऊन संशोधनात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

रसायनशास्त्रज्ञ प्रा. स्कॉट डेन्मार्क यांच्याकडे त्याने पीएचडी केली आणि विविध शोधनिबंध शाधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध केले.” आयसरमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सौमित्रने अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या कॅल्टेक येथे नाबेल विजेत्या प्रा. फ्रान्सिस अर्नोल्ड यांच्याकडे तो पोस्टडॉक करत आहे.

सौमित्रने शोधलेला रासायनिक मार्ग हा सर्वोत्तम ठरला आहे. त्याच्यासोबत जर्मनीतील एक चमूही विजेता ठरला. या दोन्ही चमूंना दहा हजार युरोचे बक्षीस विभागून देण्यात आले. सौमित्र सध्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे पोस्ट डॉक्‍टरल स्कॉलर आहे.

काय आहे “मर्क कंपाउंड चॅलेंज’ ?

  • रसायनशास्त्रातील प्रसिद्ध संस्थेतर्फे जगभरातील संशोधकांना एक विशिष्ट प्रकारचा रसायनशास्त्राचे उदाहरण दिले जाते.
  • एखादा विशिष्ट रसायन (कंपाउंड) विकसित करण्यासाठी छोट्या रेणूला त्याचा प्रवास करण्यासाठी रसायनशास्त्राचा आधार घेत सर्वोत्तम असा मार्ग निर्माण करून द्यायचा असतो.
  • यासाठी स्पर्धकांना ९६ तासांचा अवधी दिला जातो. स्पर्धेत वैयक्तिक किंवा संघासह सहभागी होता येते.
  • स्पर्धेच्या पहिल्या भागात प्रत्येक स्पर्धकाला उर्वरित आठ जणांचा रासायनिक मार्ग तपासायला दिला जातो. त्यातून सर्वोत्तम दहा स्पर्धक निवडले जातात. दुसऱ्या भागात या दहा स्पर्धकांचे रासायनिक मार्ग जर्मनी येथे मर्कच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष तपासला जातो.
  • विजेत्यांना दहा हजार युरोचे बक्षीस दिले जाते. ‘संशोधक डॉ. सौमित्र आठवले म्हणतात,
    आयसरमध्ये रचला गेलेला संशोधनाचा पाया यासाठी खूप उपयुक्त ठरला आहे. तरुण विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करावे. हे करत असताना त्यामध्ये झोकून देण्याची तयारी असावी. याचबरोबर परिस्थिती आणि व्यवहार्यता याचा विचार करूनही निर्णय घ्यावा. ‘ वैज्ञानिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्रातील चार शास्त्रज्ञांना केंद्र शासनाचा मानाचा ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०२०’ साठी एकूण सात श्रेणींमध्ये १४ वैज्ञानिकांना पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये महाराष्ट्रातून मुंबई आणि पुणे येथील प्रत्येकी दोन अशा एकूण चार शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यांचेही खूप आधी अभिनंदन करावयास हवे होते. पण असो. आता त्यांचे युगसाक्षीकडून खूप खूप अभिनंदन!

विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने (सीएसआयआर) संस्थेच्या एसएस भटनागर सभागृहात आज ७९ व्या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक तथा विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे यांनी वर्ष २०२०च्या ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ विजेत्या वैज्ञानिकांच्या नावाची घोषणा केली. एकूण सात श्रेणींमध्ये प्रत्येकी दोन अशा एकूण १४ वैज्ञानिकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ५ लाख रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमधील दोन्ही पुरस्कारांवर राज्यातील वैज्ञानिकांनी आपली छाप उमटविली. सीएसआयर प्रणित पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी आणि मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. किंशुक दासगुप्ता हे या श्रेणीत विजेते ठरले असून त्यांना शांती स्वरूप भटनागर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमधील दोन्ही पुरस्कारांवर राज्यातील वैज्ञानिकांनी आपली छाप उमटविली. सीएसआयर प्रणित पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी आणि मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. किंशुक दासगुप्ता हे या श्रेणीत विजेते ठरले असून त्यांना शांती स्वरूप भटनागर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आपल्या कतृत्वाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविणाऱ्या मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 2 वैज्ञानिकांनी दोन वेगवेगळया श्रेणींमध्ये हा पुरस्कार पटकावला आहे. संस्थेच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सुर्येंदू दत्ता यांना पृथ्वी, वातावरण, समुद्री व ग्रह विज्ञान श्रेणीमध्ये तर गणित विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. यु. के आनंदवर्धन यांना गणिती विज्ञान श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.

मार्च महिन्यापासून भारतात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा सामना कसा करायचा आणि देशपातळीवर कोरोनावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. डॉ. रमण गंगाखेडकर हे संसर्गजन्य रोगांवर अभ्यास करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत साथ आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख होते. या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासाठी २०२० साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले होते.

देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपली जीवाची बाजी लावणाऱ्या शूर जवानांना त्यांच्या शौर्यासाठी शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं यावेळी जम्मू आणि काश्मीर पोलीस कान्स्टेबल, एक स्पेशल फोर्सचे अधिकारी आणि एका भारतीय वायु दलाच्या वैमानिकासह 84 जवानांना शौर्य पुरस्कार देण्यात आला.

जम्मू काश्मीर पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या अब्दुल रशीद कालस यांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर किर्ती चक्र देण्यात आले. किर्ती चक्र शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वात मोठा दुसरा पुरस्कार आहे. इतर ९ जवांनांना देखील त्यांच्या बहादुरपणासाठी शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. शौर्य चक्र शांततेच्या काळात दिला जाणारा तिसरा मोठा सन्मान आहे.

यावेळी लेफ्टनंट कर्नल कृष्ण सिंह रावत, मेजर अनिल उर्स, हवलदार आलोक कुमार दुबे, विंग कमांडर विशाल नायर, जम्मू काश्मीर पोलीस उप महासंचालक (डेप्युटी इंस्पेक्टर जनरल) अमित कुमार, CISF सब इंस्पेक्टर महावीर प्रसाद (मरणोत्तर), CISF हेड कॉन्स्टेबल ई नायक (मरणोत्तर), CISF कॉन्स्टेबल महेंद्र कुमार पासवान (मरणोत्तर) आणि CISF कॉन्स्टेबल सतीश प्रसाद कुशवाह (मरणोत्तर) यांना शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

याशिवाय ५ सैन्य मेडल बार (दूसरी बार सैन्य मेडल), ६० सैन्य मेडल, ४ नवे सैन्य मेडल आणि ५ वायु सैन्य मेडलने सुरक्षा दलांना सन्मानित करण्यात आलं. १ पॅराच्या (स्पेशल फोर्स) लेफ्टनंट कर्नल रावत यांना जम्मू काश्मिरमध्ये LoC जवळ राबवण्यातआलेल्या एका मोहिमेसाठी शौर्य चक्र देण्यात आलं. लेफ्टनंट कर्नल रावत आणि त्यांच्या टीमने दहशतवादी घुसखोरी करण्याच्या आधी तब्बल ३६ तास दबा धरुन वाट पाहिली आणि ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या नेतृत्वासाठी आणि शौर्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

मेजर अनिल उर्स यांनी देखील एक अशाचं मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. यात ५ दहशतवादींना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं. त्यांना देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रानुसार त्यांच्या टीमने देशाच्या सुरक्षेसाठी “साहस आणि दुर्मिळ युद्ध नेतृत्व” दाखवलं. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये हवालदार दुबे यांनी A++ कॅटेगरीच्या दहशतवाद्याला अगदी त्याच्या जवळ जाऊन मारलं. त्यांना दिलेल्या सन्मानपत्रात म्हटलं आहे, की त्यांच्या साहसामुळे दहशतवादी पळून जाण्यात अपयशी ठरले. तसेच शेवटी ४ दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं.

राष्ट्रपती कोविंद यांनी विविध सैन्याच्या मोहिमांमध्ये आपलं योगदान देणाऱ्या १९ जवांनांना ‘मेंशन-इन-डिस्पॅच’ देण्यालाही मंजूरी दिली. यात ८ जणांना ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन रक्षकसाठी मरणोत्तर सन्मान देण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात येणार आहे. तर १४ पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता ३९ पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण ९२६ पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यातील ८० पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) तर २१५ पोलिसांना पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६३१ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५८ पदक मिळाली आहेत.

देशातील ८० पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेले ५८ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!!

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ ‘पोलीस शौर्य पदक’ आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणाऱ्या या कामगिरीसाठी सलाम. पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

“महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,” असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार आणि पुण्यातील मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सय्यद मेहबूब शाह कादरी यांना यंदाचे पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. देशविदेशातील ११८ व्यक्तींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येईल. यामध्ये क्रिकेटपटू जहीर खान, डॉ. रमण गंगाखेडकर, सरिता जोशी, राहीबाई पोपोरे, सँड्रा डिसूझा हेही पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. महाराष्ट्रात हिऱ्यांचीच खाण आहे. ते सगळे देशाच्या जनतेची शान आहेत. जगज्जेते रणजीत सिंह डिसले यांचा पुन्हा पुन्हा अभिमान वाटावा आणि त्यांचे पुन:पुन्हा अभिनंदन करावे असेच ते आहेत.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
१५.१२.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *