फुलवळ येथील नवनाथ बनसोडे यांनी वाचवले जखमी कोल्ह्याचे प्राण..

प्रथमोपचार करून वनविभागाच्या स्वाधीन केले कोल्हा.

फुलवळ (धोंडीबा बोरगावे)

फुलवळ तालुका कंधार येथून जाणाऱ्या कंधार – मुखेड रोडवरील दत्त टेकडी शेजारील एम.आय.डी.सी. परिसरात राष्ट्रीय महामार्गावर एक कोल्हा गंभीर जखमी अवस्थेत सायंकाळच्या वेळी वेदनेने विव्हळत असल्याचे येथील नवनाथ बनसोडे यांच्या निदर्शनास आले . त्यांनी त्या जखमी कोल्ह्याला लगेच आपल्या गाडीवर घेऊन फुलवळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्यावर उपचार केला आणि त्या जखमी कोल्ह्याचे प्राण वाचविले. हि बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली , त्यामुळे वन्य प्राण्यास जीवदान देणाऱ्या बनसोडे यांचे सर्व स्तरातून आणि माध्यमातून कौतुक ही करण्यात आले.

नवनाथ बनसोडे हे काही कामा निमित्य कंधार येथे गेले आणि आपली कामे आटोपून ते आपल्या मोटार सायकलने फुलवळ कडे १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७:०० च्या सुमारास परत येत होते. त्यावेळी त्यांना जखमी प्राण्याचा रस्त्यावर आवाज आला आणि त्यांनी तत्काळ गाडी थांबवून तेथे गेले असता त्यांना महामार्गाच्या मधोमध एक जखमी कोल्हा वेदनेने व्याकूळ झालेला दिसला. हे दृश्य पाहून तेही गहिवरून गेले व कसलाच विचार न करता लगेच त्यांना त्या कोल्हया विषयी दया आली.


त्यावेळी रस्त्यावर मदतीसाठी कोणीच नव्हते त्यांनी कोल्ह्यास उचलल्यास तो चावणार तर नाही ना , हि अनामिक भीती बनसोडे यांच्या मनात होती तर दुसरे मन म्हणत होते काहीही करून हा कोल्हा वाचलाच पाहिजे असा ठाम निर्धार करीत बनसोडे यांनी शक्कल लढवत कमरेचा बेल्ट काढून कोल्ह्यास हलक्या हाताने गाडीस बांधून त्याला गाडीवर बसवले व गाडी भरधाव वेगाने चालवत फुलवळ गाव गाठले.


गावात जाऊन घरी गेल्यावर त्या कोल्ह्याला पाणी पाजवले व तात्काळ गावातील पशु वैद्यकीय कर्मचारी साहेबराव देवकांबळे यांना बोलावून रात्री उशिरा पर्यंत जखमी कोल्ह्यावर उपचार केले.

हि बातमी दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी वनविभागाचे वनसेवक पी.आर.राठोड यांच्या कानावर जाताच त्यांनी वनरक्षक डी.डी.बारोला व संदेश खरात यांना यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या .


त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फुलवळ येथील बनसोडे यांच्या घरी जाऊन जखमी कोल्ह्यास ताब्यात घेतले व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार कोल्हा दुरुस्त झाल्या नंतरच त्यास जंगलामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली.

वन्य प्राण्याविषयी बोलणारे खूप जन असतात पण कठीण प्रसंगात आपला जीव धोक्यात घालून जखमी कोल्ह्यावर उपचार करून त्याचा जीव वाचवणारे खूप कमी असतात . पण नवनाथ बनसोडे यांचे सामाजिक कार्य पाहता ते कौतुकास्पद असल्याची जाणीव होऊन त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून असाच आदर्श इतरांनी घ्यावा असा एकच सूर सर्व स्तरातून ऐकायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *