उपक्रम – स्मृतिगंध (क्र.३५) कविता मनामनातल्या*(विजो) विजय जोशी-डोंबिवली ** कवी – गदिमा

कवी – गदिमा
कविता – माहेर

गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा).
जन्म – ०१/१०/१९१९ (शेटेफळ, सांगली).
मृत्यू – १४/१२/१९७७ (पुणे).
विख्यात कवी, गीतकार, पटकथा-संवाद लेखक, कादंबरीकार, अभिनेता.आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक. गद्य व पद्य या दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध.

गदिमांच्या जन्माची कथा मोठी गमतीशीर आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हाच सुईणीने त्यांना मृत घोषित केलं होतं. दफनासाठी खड्डाही खोदलेला होता. पण शेकण्याचे निखाऱ्याजवळ त्या जन्मजात बालकाची बेंबी नेताच ते बालक टाहो फोडून रडू लागले. आणि गदिमांचा जणू पुनर्जन्मच झाला.

माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संताच्या कवितेचा प्रभाव होताच, पण त्याचबरोबर त्यांच्यावर पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार होते. त्यांच्या सुंदर घाटाच्या सोप्या पण प्रभावी गीतांमधून आपल्याला याचा प्रत्यय येतो.
कविता, चित्रपट गीते यासोबतच गदिमांनी समरगीते, बालगीते, लावण्या असं विविध प्रकारात लेखन केलं.
मराठी रसिकांनी गदिमांच्या काव्यलेखनाला मनापासून प्रतिसाद दिला. आणि त्यांच्या गीतरामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला.
गदिमांना “महाराष्ट्र वाल्मीकी” ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फुर्तीने दिली.
गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले. आजही होत आहेत. गीतरामायणाचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले.

चरितार्थासाठी गदिमा चित्रपट व्यवसायात आले आणि त्यात ते यशस्वीही झाले.
गदिमांच्या काही गाजलेल्या साहित्यकृती खालीलप्रमाणे-
कवितासाहित्य – जोगिया, चार संगीतिका, काव्यकथा, गीत रामायण.
कथासंग्रह – कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, चंदनी उदबत्ती.
कादंबरी – आकाशाची फळे.
आत्मचरित्रपर – मंतरलेले दिवस, अजून गदिमा, वाटेवरल्या सावल्या.

  • गदिमांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली.
  • भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री पुरस्काराने सन्माननित केलं.
  • १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • महाराष्ट्र शासनाच्या विधानपरिषदेवर ते काही काळ नियुक्त सदस्य होते.
  • महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य होते.
  • गदिमांच्या नावाने “गदिमा प्रतिष्ठान” ची स्थापन करण्यात आली.

अशा अष्टपैलू साहित्यिकाने मराठी साहित्याला आणि रसिकांना अनेक अजरामर कविता आणि गीते दिली. आणि त्यांच्या अनेक गाजलेल्या गीतांच्या माध्यमातून गदिमा आजही रसिकांच्या मनात स्थानापन्न आहेत.

गदिमांची अशीच एक गाजलेली कविता “माहेर” याचा आनंद आपण घेऊयात.
समुद्राला मिळाल्यावर नदी परत पर्वताकडे जात नाही म्हणून नदीला माहेर नाही असे म्हणतात. परंतू गदिमांनी ह्या कवितेत हा समज खोडून काढत जलचक्र आपल्या सुंदर शब्दात सांगितलं आहे..

माहेर

नदी सागरा मिळता
पुन्हा येईना बाहेर,
अशी शहाण्यांची म्हण
नाही नदीला माहेर

काय सांगू रे बाप्पानो
तुम्ही आंधळ्याचे चेले,
नदी माहेराला जाते
म्हणूनीच जग चाले

सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर,
तरी तिला आठवतो
जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन,
नदी तरंगत जाते
पंख वाऱ्याचे लावून

पुन्हा होऊन लेकरू
नदी वाजविते वाळा,
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा.

— गदिमा
◆◆◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट

विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, 9892752242)

सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.

Vijay Joshi sir



विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *