विटंबना आणि सामाजिक असंतोष

संपादकीय ….


विटंबना आणि सामाजिक असंतोष


             सामाजिक शांतता भंग करण्याचे एक अत्यंत क्रुर आणि कुप्रवृत्तीचे कारण म्हणजे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणे हे एक आहे. समाजातील आदर्श महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणे, अर्वाच्य, अवमानकारक मजकूर लिहणे व वक्तव्य करणे आता नेहमीचेच झाले आहे. यात तथिकथित राजकीय नेतेही मागे नाहीत. अशावेळी दोन समाजात जातीय तथा धार्मिक वितुष्ट निर्माण होते. मग मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात. हे लोक नंतर अनियंत्रित होतात. या जमावाला झुंडशाहीचे स्वरूप प्राप्त होते. मग हे कोणत्याही वस्तूची नासधूस करतात. चळवळीचे कार्यकर्ते, नेते अशा आंदोलनाची हाक देतात किंवा सहभागी होतात. त्यामुळे प्रकरण चिघळण्यास मदत होते. दंगलसदृश परिस्थिती निर्माण होते.  आजच्या सोशल मीडियावरुन सर्वदूर तेजगतीच्या विषासारखे पसरते. जातीय अस्मिता हा फार मोठा विषाणू आहे. हा प्रचंड वेगाने सर्वदूर पसरतो. त्यानंतर होणाऱ्या, घडणाऱ्या घटना समाजात असंतोष पसरवतात. मने कलुषित होतात. याची ठिणगी आणखी काही दिवसांनंतर एखाद्या अनुचित घटनेमुळे पडू शकते. एखाद्या स्मारकाची, मंदिराची, मशिदीची किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळाची विटंबना करुन दंगल घडविण्याचे मनसुबे समाजकंटक करीत असतात. ते वेगवेगळे हातखंडे वापरतात. या घटनांमुळे अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण येतो. संबंधित ठिकाणाला छावणीचे रुप येते. प्रकरण चिघळले तर ठिकठिकाणच्या  संघटना त्यात उतरतात.

मोर्चे, आंदोलने केली जातात. सद्यस्थितीत कोणतेही आंदोलन, मोर्चा, मिरवणूका यांना आणि लोकांना एकत्र जमण्याची परवानगी नाही. तरीही लोक रस्त्यावर येतात. जिथे अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो तेथे कोरोनासारख्या महासंकटाला न भिता उत्स्फुर्तपणे आंदोलन घडून येते. जेव्हा अशाप्रकारे आंदोलन होते तेव्हा आधी आरोपीला अटक करण्याची आणि गुन्हे नोंदविण्याची मागणी केली जाते.  अशा आंदोलनाला कधी कधी हिंसक वळण लागते. यात समाजजीवनाचेच नुकसान होते. काही राजकीय पक्षही यात आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आधीच आवश्यक ती खबरदारी घेते. ती घेतलीच पाहिजे अन्यथा अशा घटनांमध्ये फार मोठी किंमत लागत असते हा मागचा इतिहास आहे.

                     श्रीक्षेत्र माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे वृत्त अत्यंत वेगाने काल पसरले. सोशल‌ मिडियावर तर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. आंबेडकरी जनतेत तीव्र संताप निर्माण झाला. घटनेचे वृत्त समजताच अनेक आंबेडकरी कार्यकर्ते माळेगावच्या दिशेने निघाले. पोलीस यंत्रणा लवकरात लवकर मोठ्या फौजफाट्यासह त्या ठिकाणी पोहोंचली. तसेच गावातील आणि बाहेरुन आलेल्या लोकांचा मोठा जमाव त्याठिकाणी जमला. तिथल्या आणि ठिकठिकाणच्या लोकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होऊ लागल्या. हे कारस्थान ‘मनुवादी भडव्यांचेच’ असे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेताच व्यक्त होऊ लागले. घटनेची कसलीही कारणमीमांसा न करता केलेली विधाने दोन समाजात दंगल किंवा दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. काही वेळाने सदरील व्यक्ती आंबेडकरी समाजातीलच असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सगळेच थंड झाले. परंतु गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो. त्यानंतर आपल्याच काही मूर्ख, गद्दार लोकांना हाताशी धरुन हे कृत्य करण्यास  काही समाजविघातक प्रवृत्ती कार्यरत असतात अशी भूमिका बाहेर आली. नशेच्या धुंदीत हे आपलेच अज्ञानी लोक काहीही करतात हा एक संशयित विचार पुढे आला असता तर आहे त्याच परिस्थितीत काही अप्रिय घटना घडली असती. थोड्या वेळाने ती व्यक्ती मनोरुग्ण असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आल्याबाबतची अधिकृत माहिती पुढे आली.

तेव्हा पुन्हा एकदा संशयाने जागा निर्माण केली. राजगृहावर हल्ला झाला त्यावेळी तो हल्लेखोर मनोरुग्ण असल्याचेच स्पष्ट करण्यात आले होते. तेव्हा असे असामाजिक कृत्य‌ करायला लावायचे आणि आरोपी मनोरुग्ण आहे असे जाहीर करायचे हे मोठे षडयंत्रच आहे, या घटनेची अधिक खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे अशी मागणी नेते करु लागले. आरोपीची जात पाहू नका किंवा तो मनोरुग्ण आहे म्हणून दुर्लक्ष करु नका असे सांगण्यापेक्षा कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याचा विचार करून सर्वांनाच शांततेचे आवाहन करणे आवश्यक असते. सामाजिक ऐक्य आणि सुशांतता कायम नांदावी यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेऊ नये. अशा घटनांची सखोल माहिती घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देणे उचित नाही. अशा संवेदनशील प्रसंगी निषेधाचे हत्यार उपसतांनाच संयमशील प्रज्ञा अंगी बाळगणे आवश्यक आहे.

गंगाधर ढवळे ,नांदेड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *