आपल्या गोड, मधूर वाणीने सर्वसामान्यांसह रूग्णांना प्रबोधनाचा डोस देवून बरे करणारे आणि त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, नवोदितांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना अडी-अडचणीच्यावेळी मदतीचा हात देणारे, तुमच्या – आमच्या परिचयातील ख्यातनाम कवी तथा साहित्यिक व माझे गुरुवर्य डॉ.माधव कुद्रे (कंधारकर मो.९०४९२३२०१७) यांचा आज (२० डिसेंबर) वाढदिवस ! वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो ही मनस्वी सदिच्छा व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !
त्यांच्या विषयी थोडक्यात…
डाॅ.माधव कुद्रे यांचे पूर्ण नाव डाॅ.माधव सैनाजीराव कुद्रे, तर त्यांच्या आईचे नाव गंगाबाई सैनाजीराव कुद्रे. ते मूळचे सावरगाव (पी.), ता.मुखेड येथील रहिवासी होत. अतिशय गरीब कुटुंबात डॉ.माधव कुद्रे यांचा २० डिसेंबर १९७५ रोजी जन्म झाला. घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वडिलांनी सावरगाव सोडून डॉ.माधव कुद्रे यांच्या आजोळी म्हणजे कंधारला माधवच्या बालपणीच स्थायिक झाले. म्हणून ते आज कंधारकर झाले.
आई – वडिल मोलमजूरी करून कुटुंबाचा गाडा हाकत.
डॉ.कुद्रे यांची बालपणीची परिस्थिती एवढी हालाखीची होती की, घरी विद्युत नसल्यामुळे घरासमोर असलेल्या पथदिव्याखाली बसून अभ्यास करत. लाईट गेल्यास घरात चिमणीच्या दिव्याखाली बसून दिलेला अभ्यास करत. चिकाटीने दररोज किमान ३० शब्दांचे पाठांतर करत. बालपणापासून जिद्दी व हुशार स्वभावाचे असलेल्या आपल्या माधवला आई-वडिलांनी मजूरी करून मिळालेल्या दोन पैशात वह्या-पुस्तके घेऊन देऊन उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न उराशी बाळगून वेळ प्रसंगी उपाशीपोटी राहून माधवला डॉक्टर बनविले.
डॉ.माधव यांनीसुद्धा शालेय जीवनापासूनच सुट्टीच्या दिवशी, दिवाळी व ऊन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आई-वडिलांसोबत बांधकाम कामगार म्हणून व तसेच मिळेल ती मजूरी करुन स्वतःला व कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतानासुद्धा डॉ.माधव यांनी ट्यूशन घेणे, मेडिकलवर काम करणे, एस.टी.डी.वर काम करणे, खासगी दवाखान्यात काम करणे, दुधपुडे वाटप करणे यासह काही दिवस वर्तमानपत्र टाकणे इत्यादी अनेक पार्ट टाईम कामे केली.
डाॅ.माधवराव यांचे वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व पत्रकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. साहित्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. त्यांनी अनेक साहित्य संमेलने आपल्या गोड, मधून आवाजाने गाजविले आहेत.
आणखी एक महत्वाची गोष्ट ती अशी, साहित्य हे समाजमनाचा आरसा असते याची डॉ.माधव कुद्रे यांना प्रचिती आली. त्यांची ‘स्त्रीभ्रूणहत्या’ ही कविता दै.गाववालामध्ये ०१ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झाली होती. ती कविता वाचून फुलकळस, ता.पूर्णा, जि.परभणी येथील संदिप शिराळे ह्या काव्यरसिकाला ती कविता इतकी भावली की, त्यांनी कु.समृद्धी ह्या त्यांच्या पहिल्या मुलीचा पहिला वाढदिवस ‘बेटी बचाव कार्यक्रम’ घेऊन मोठ्या जल्होसात साजरा केला. या कार्यक्रमाला डॉ.माधव कुद्रे यांना ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून आमंत्रित केले होते. साहित्य माणसाला घडवू शकते, हे आजवर ऐकलेले विचार डॉ.माधव कुद्रे यांच्या ‘स्त्रीभ्रूणहत्या’ या एका कवितेच्या प्रेरणेतून घडून आलेल्या ‘बेटी बचाव’ कार्यक्रमातून प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. कवितेची दैदिप्यमान ताकद या कार्यक्रमातून पहायला मिळाली.
डाॅ.माधवराव कुद्रे हे ‘युगसाक्षी साहित्य पत्रिका’ या त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहतात. तर अक्षरोदय साहित्य मंडळ, शाखा- कंधारचे ते अध्यक्ष आणि डाॅक्टर असोसिएशन व डॉक्टर निमा संघटना, महाराष्ट्र राज्याचे सदस्य आहेत. डॉ.माधव कुद्रे हे या माध्यमातून कार्य करतात. ध्वनीप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण, तंटामुक्ती, हागणदारीमुक्ती, व्यसन, हुंडाबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, पाणी टंचाई, एड्सला विरोध, रक्तदान, नेत्रदान अशा अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडण्यासाठी, अनिष्ट रुढी-परंपरेचे पांघरूण घेऊन गाढ झोपलेल्या मानवाला जागे करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा समाज प्रबोधन करणारा ‘जागा हो मानवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह डॉ.कुद्रे यांनी निर्माण केला….
त्यांचा हा कवितासंग्रह अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आहे. त्यांच्या या कविता संग्रहातील ‘गंगामाय’ ही कविता उर्जा देणारी आहे.
‘माझी माय गंगामाय
झीजवूनी सारी काया
माझ्या बाबांचा घेऊनी साया
यत्नांच्या पराकाष्ठेत घालून माया !’
वरील कवितेच्या माध्यमातून कळते. आई-वडिल हे आपल्या मुलांना घडविण्यासाठी किती कष्ट करतात. अशाच कष्टातून डॉ. माधवराव घडले. ते आपल्या ‘गंगामाय’ या कवितेतून व्यक्त होतात.
ह्या कवितासंग्रहातील ‘माय’ ह्या कवितेतून कवी डॉ.कुद्रे सांगतात
“शिकून मोठा हो असं
कानी माझ्या सांगायची
गरिबीचा पांग फेडेल असं
स्वप्नं ती रंगवायची !”
आपलं बाळ शिकून मोठं होईल व गरीबीचा पांग फेडेल असं स्वप्न रंगवणा-या आईचं बाळ ‘डॉक्टर’ झालं हे पाहून आई कृतकृत्य झाली असेल.
‘जागा हो मानवा’ या काव्यसंग्रहात ‘७०’ कवितेचे तोरण बांधले आहेत. त्यातील सर्वच कविता एकापेक्षा एक सरस प्रबोधन करणाऱ्या आहेत. डॉ.माधव कुद्रे यांच्या सामाजिक, साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यातील काही पुरस्कारांचा विशेष उल्लेख करवा वाटतो.
(१) मातंग समाज सद्भावना मित्रमंडळ, औरंगाबाद यांच्याकडून ‘समाज भुषण पुरस्कार २०१५’.
(२) वीर लहुजी साळवे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिक्षण प्रसारक मंडळ, गुंधा. ता. लोणार. जि. बुलडाणा यांच्याकडून ‘साहित्यरत्न पुरस्कार २०१५’.
(३) स्वदेशी भारत बचत गट व काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठाण, आसू, ता.फलटण. जि.सातारा यांच्याकडून ‘स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०१५’.
(४) श्री कृष्ण सेवा ट्रस्ट, राख, ता.पुरंदर .जि. पुणे यांच्याकडून ‘साहित्यसेवा समाजरत्न पुरस्कार २०१५’
(५) भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांच्याकडून ‘डॉ . बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार २०१५’
(६) सा. क्राईम बॉर्डर, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन व श्री स्वामी सखा मासिक परिवार, डोंबिवली यांच्याकडून ‘समाजप्रबोधन गौरव पुरस्कार २०१५’
(७) डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, सासवड, ता.पुरंदर.जि.पुणे यांच्याकडून ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार २०१५’
(८) अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ,गुरुकुंज आश्रम, शाखा-जळगाव यांच्याकडून ‘जिजाऊमाता विश्व गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार २०१६’
(९) श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिक्षण प्रसारक मंडळ, गुंधा. ता.लोणार. जि.बुलडाणा यांच्याकडून राज्यस्तरीय ‘साहित्य गौरव पुरस्कार २०१७’
(१०) रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन, मुंबई, शाखा-बल्लारपूर, जि.चंद्रपूर यांच्याकडून राज्यस्तरीय ‘साहित्य सेवा रत्न पुरस्कार २०१८’
(११) क्रांतीगुरु सेवाभावी संस्था, गुंधा ता.लोणार जि.बुलडाणा यांच्याकडून ‘काव्य गौरव पुरस्कार २०२०’ आदी पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. कुद्रे यांनी नांदेड आकाशवाणीवरून ‘लोकसंख्या वाढीचा भस्मासूर’ याविषयी समाज प्रबोधन केले. तर अनेकवेळा काव्यवाचन करण्याची संधी मिळाली. अनेक काव्यसंग्रह, पुस्तकांची प्रस्तावना, समीक्षा लेखन केले असून विविध नियतकालिकातून त्यांच्या कथा, कविता, समीक्षा लेखन, औषधी वनस्पती लेखही प्रकाशित झाले आहेत.
पाऊस पडण्यासाठी, वायूप्रदूषण थांबविण्यासाठी, ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी, शुद्ध श्वसन मिळवून निरामय जीवन जगण्यासाठी संपूर्ण प्राणीमात्रांसाठी व पृथ्वीवरील जीवसृष्टी दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने ‘वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन’ करणे अत्यंत गरजेचे आहे, हे ‘वृक्षारोपण’ या कवितेमध्ये पटवून सांगताना बेंबीच्या देठापासून कवी डॉ.माधव कुद्रे तळमळीने म्हणतात –
“किती करावे तुमच्यापुढे कथन ?
वृक्षतोड पाहता येते रुदन
वृक्षारोपणाचे गाऊनी कवन
एक तरी झाड लावा प्रत्येकानं !”
वैद्यकीय व्यवसाय करताना येणाऱ्या अडी-अडचणी कवितासंग्रहातील शेवटच्या ‘डॉक्टर’ या कवितेतून मांडलेल्या दिसून येतात. या कवितेमध्ये डाॅक्टरांविषयी भावना व्यक्त केल्या…
‘विचारून पहा तुमच्या मनाला
डाॅक्टर म्हणजे काय असतं?
रूग्णाचं सुख-दुःख ऐकून
घेण्याचे एक ठिकाण असतं !’
डाॅ.माधवराव यांचा प्रत्येकाने वाचण्यासारखा, वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा, घराघरात संग्ही ठेवण्यासारखा अतिशय उत्कृष्ट असा ‘जागा हो मानवा’ हा काव्यसंग्रह वाचल्यावर खरोखरच मानव जागा झाल्याशिवाय राहत नाही. हा काव्यसंग्रह प्रत्येकाने एकदातरी वाचन करावा. डॉ.माधवराव कुद्रे यांच्या ‘जागा हो मानवा’ या काव्यसंग्रहचे कौतुक तर आगामी ‘आठवणीचं वारं (चारोळी संग्रह) व ‘वास्तव्य तुझे’ (कविता संग्रह) साठी सदिच्छा आणि पुढील लेखनासाठी व वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
– राजेश.ह.जेटेवाड, बरबडेकर
मो. ९४२०८१४०९९