कंधार ; प्रतिनिधी
एड्स रोग हा अतिशय गंभीर रोग असून त्याची लागण होऊ नये म्हणून आपण आपली सुरक्षा आपणच केली पाहिजे. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हा रोग होतो. त्यासाठी असुरक्षित संबंध टाळून या जीवघेण्या रोगापासून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सतर्कता हाच या रोगावर उपाय असून लोकांनी याकडे गंभीरतेने पाहावे, असे आवाहन न्यायाधीश एस. डी. तारे यांनी केले.
कंधार येथील जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधिकरण समिती व अभिवक्ता संघ कंधार यांच्या संयुक्तविद्यमाणे कायदेविषयक शिबिर जागतिक एड्स दिन आणि जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त कायदे विषयक शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अतुल सलगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश ल. मु. सय्यद, न्यायाधीश एस. डी. तारे, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अड. किशोर क्षीरसागर हे होते.
न्यायाधीश तारे म्हणाले की, एड्स या रोगाने पूर्ण जगाला वेळा घातल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. जगाच्या तुलनेत भारतात या रोगाचा फैलाव कमी असला तरी या रोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेष करून तरुणांनी सावध राहिले पाहिजे. तरुण देशाचे भविष्य आहेत. तरुण सुदृढ राहीले तरच देश बलवान राहू शकते. तरुणांनी अवैध मार्गाचा अवलंब न करता शिक्षणाला वाहून घ्यावे. तरुणांवर देशाचे भवितव्य अवलंबून असते, असे स्पष्ट करून त्यांनी सतर्क राहून आपण एड्सला हद्दपार करू शकतो,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अतुल सलगर, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष किशोर क्षीरसागर, अड. मयुरी बंडेवार यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी अभिवक्ता संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन अड. कलीम अन्सारी यांनी केले तर आभार अड. मयुरी बंडेवार यांनी मानले.