मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गाडगे बाबा याचे बालपण गेले.बालपणापासून त्यांच्या मनात येथील समाजव्यवस्थेविरुध्द खुप चिड यायची,माणसामाणसातील भेद त्यांना मान्य नव्हता,गोपाला…गोपाला…देवकीनंदन गोपाला…हे शब्द उच्चारताक्षणी समोरचा जनसमुदाय मंत्रमुग्ध व्हायचा.साध्याभोळ्या जनतेपर्यंत आपले विचार पोहचावेत म्हणून ते व-हाडी बोली भाषेचा उपयोग करत.संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराज यांच्यात होत्या.गाडगेमहारांज यांनी जनकल्याणाची अनेक कामे केली.संत मालिकेतील ते संत शिरोमणी होते.बालपणापासूनच त्यांच्या अंगी भूतदया रक्तामासात भिनलेली होती.
एका उच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठी आत्मोध्दारासाठी त्यांनी सर्वाचाच त्याग केला.गाडगेबाबांचा वैरागी अवतार पाहातांना अगदि विचित्र वाटतो.पण त्यांना त्याचे काही वाटत नव्हते.विषमतेवर व जातीभेदावर आघात करण्याची त्यांची पध्दत फारच परिणामकारक होती.सर्वांच्या जन्माची वाट एक आहे.आणि जायची सुध्दा मग ही शिवाशिवी कशासाठी?हा शिवाशिवीचा,शुद्र ,अतिशुद्राचा कलंक धुऊन निघाला पाहिजे.सर्व मानवप्राणी एकसमान आहेत आणि एकसमानच राहातील असे त्यांचे म्हणणे होते.गाडगेबाबा स्वता:ला महाराज म्हणून घेत नसत,कुणी तसे म्हणाले तर त्यांना खुप राग यायचा.ते सतत म्हणत,मी कुणाचा गुरु नाही,आणि माझा कुणी शिष्य नाही.म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
कीर्तनातून प्रबोधन करणारे,थोर समाजसेवक,साधी राहाणी पण उच्च विचारसरणी असलेले अख्खे आयुष्य त्यांनी सामाजिक न्यायासाठी झटण्यातच व्यतीत केले.गावोगावी साफसफाई करत स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन जनतेला अनिष्टरुढी प्रथा यावर प्रचंड आघात करण्यास प्रेरणा देणारे तसेच त्यापासून परावृत्र करण्याचा प्रयत्न करणारे.संत गाडगेबाबा आयुष्यभर समाजहितासाठी जगले.स्वता:ह अडाणी असूनही अडाणी जनतेला शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
ते लोकशिक्षक झाले.शिक्षण हे व्यहार व परमार्थासाठी आवश्यक आहे.आपल्या कीर्तनातून ते सदैव हा उपदेश करत.देवळात जाऊ नका,बापहो…मूर्तिपूजा करु नका,सावकाराकडून कर्ज काढून सणवार साजरे करु नका,देवाला कोंबड,बकरी याचा बळी देऊ नका,पोथी पुराण,मंत्र-तंत्र,चमत्कार या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.माणसातच देव आहे त्याचा शोध घ्या,परोपकाराची भावना मनात असू द्या.धर्मशाळा,आश्रम,विद्यालय सुरु करा,दीनदुबळे,अपंग,अनाथ यांना मायेचा ओलावा द्या.संत तुकाराम महाराज यांना ते गुरु मानत.तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा,त्यांच्या विचारांचा संत गाडगेबाबा यांच्यावर प्रचंड प्रभाव होता.
रुढी-परंपरा यात गुरफटलेल्या समाजाला पाहून गाडगेबाबा यांना तीव्र दु:ख व्हायचे.समाजात दारु बंदी व्हावी यासाठी गाडगेबाबांनी प्रयत्न केले.साधू, संत कसा सत्यनिष्ठ,निर्भय,निस्पृह,सर्वांवर प्रेम करणारा असतो.याचे प्रारुप म्हणजे बाबांचे जीवन होय.श्रमनिष्ठा,औदार्यं,तेजस्विता,आत्मियता हे गुण गाडगेबाबांच्या अंगी होते.आचार्य अत्रे गाडगेबाबा विषयी अभिमानाने म्हणत…”सिंहाला पाहावे वनात,हत्तीला पाहावे रानात,तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात”.आयूष्यभर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यातच त्यांनी धन्यता मानली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा यांना गुरु मानत.जेव्हा गाडगेबाबांची प्रकृती ठिक नव्हती त्यावेळी डाॅ.बाबासाहेब हे भारताचे कायदेमंत्री होते.त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना २घोंगड्या भेट दिल्या.आणि त्यांनी त्याचा स्विकार देखिल केला,त्यावेळी गाडगेबाबा म्हणाले”डाॅ.बाबासाहेब तुम्ही इथं कशाला आले?मी एक फकीर…तुमचे एक एक मिनीट सुध्दा खुप महत्वाचे आहे.तुमचा किती मोठा अधिकार आहे.तेव्हा बाबासाहेब म्हणाले “बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा.ऊद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही.तुमचा अधिकार मोठा आहे.या प्रसंगी डाॅ.बाबासाहेबांच्या डोळ्यात आश्रू होते…कारण,हा प्रसंग दोघांच्याही आयूष्यात पून्हा कधीच येणार नाही.याची दोघांनापण जाणीव होती.गाडगेबाबांचे अखेरचे कीर्तन ८नोव्हेंबर १९५६रोजी वांद्रे (मुंबई)येथे झाले.
ज्यावेळी बाबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी बाबांच्या कानावर पडली त्यावेळी गाडगेबाबा लहानलेकरासारखे धायमोकलून रडले.पण,गाडगेबाबा का रडत आहेत हे उपस्थितांना उमगलेच नाही.त्यावेळी गाडगे बाबा आपल्या सहका-यांना म्हणाले.”अरे तूमचा आमचा बाप च या जगात राहिला नाही…अरे तुम्ही आम्ही पोरके झालो.असे म्हणत त्यांनी दु:खाला मोकळी वाट करुन दिली.असे गेले कोट्यानू कोटी,काय रडू एकाच्यासाठी असे म्हणणारे गाडगेबाबा यावेळी मात्र फारच खिन्न आणि उदास झाले. डाॅ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वानानंतर १३दिवसांनी म्हणजेच २०डिसेंबर १९५६रोजी गाडगे बाबांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या कार्याचा ठसा आजही जनसामान्यांच्या काळजावर उमटलेला आहे…बाबा तुम्ही आमच्यात नाहीत तरी…तुमचे प्रेरणादायी विचार आजही आम्हाला मार्गदर्शक ठरतात.आज गाडगेबाबांची पुण्यतिथी त्या निम्मित गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन…!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१