गाडगेबाबांनी संवैधानिक महामूल्यांची पेरणी केली – प्रा. शिवाजीराव मोरे

नांदेड

– राष्ट्रसंत गाडगे महाराज हे केवळ स्वच्छतेचे पुजारी नव्हते तर ते एक लोकप्रबोधक होते. त्यांनी आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, चालीरीती, परंपरा तसेच कर्मकांडांवर प्रहार केले. इतकेच नव्हे तर समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या लोकशाही महामूल्यांची पेरणी केली असे प्रतिपादन येथील विचारवंत प्रा. शिवाजीराव मोरे यांनी केले. ते जवळा देशमुख येथे आयोजित राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आकाशवाणीचे वरीष्ठ निवेदक गणेश धोबे, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., ग्रामपंचायत संगणक परिचालक आनंद गोडबोले, ग्रामपंचायत कर्मचारी मारोती चक्रधर, ज्येष्ठ नागरिक हैदर शेख, कमलाबाई गच्चे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ढवळे जी. एस. हे होते.

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ६४ व्या स्मृतीदिनानिमित्त जवळा देशमुख येथे प्राथमिक शाळेत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. गाडगेबाबांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व धूप पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना गणेश धोबे म्हणाले की, गाडगेबाबांनी शारिरीक, सामाजिक स्वच्छतेबरोबरच मनाचीही मशागत केली. आज कोरोनाकाळाने स्वच्छतेला किती महत्त्व आहे ते दाखवून दिले आहे. मुख्याध्यापक ढवळे यांनी आजच्या राज्यकर्त्यांनी स्वच्छता व आरोग्याला राजाश्रय मिळवून दिला पाहिजे अन्यथा पर्यावरणातील कमालीच्या मानवी हस्तक्षेपामुळे तमाम सृष्टीचेच आरोग्य धोक्यात येईल याबाबत आश्वस्त केले. कोरोनाचे संकट अद्याप पूर्णतः दूर झाले नाही असेही ते म्हणाले.

शाळेतील चिमुकल्यांनी गाडगेबाबांच्या कार्याचा छोटासा भाग म्हणून शालेय परिसराची साफसफाई केली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात संध्या गच्चे, दिव्या गच्चे, गंगासागर शिखरे, लक्ष्मण शिखरे, पंकज गोडबोले, संघरत्न गोडबोले यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळा बंद असली तरी विविध उपक्रम राबवून शिक्षण चालू ठेवण्यात आले आहे. कोरोनाविषयक उपाययोजना अवलंबून गाडगेबाबांच्या अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. अजूनही कोरोनाचे संकट दूर झाले नसून सामाजिक अंतर राखण्याबाबत आणि मुखपट्टी वापरण्याबाबत आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद गोडबोले यांनी केले. तर आभार मारोती चक्रधर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *