महाराष्ट्रातील मॅग्नेटिक गुंतवणूक

कोरोनाची साथ आणि लॉकडाउन यामुळे कमजोर झालेली अर्थव्यवस्था आता हळूहळू रुळावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतात परदेशी गुंतवणूकही वाढत आहे. 18 डिसेंबरपर्यंत भारतीय शेअर बाजारांमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) तब्बल ५४ हजार ९८० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. जागतिक बाजारांमध्ये रोखीचा ओघ वाढल्यानं आणि विविध केंद्रीय बँकांना भांडवलासाठी आणखी एक पॅकेज मिळण्याची शक्यता असल्यानं परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूकीला प्राधान्य दिलं आहे.
डिपॉझिटरी आकडेवारीनुसार १८ डिसेंबरपर्यंत शेअर्समध्ये ४८ हजार ८५८कोटींची तर बाँड्समध्ये ६ हजार ११२ कोटींची अशी एकूण ५४ हजार ८५८ कोटींची गुंतवणूक झाली असल्याची माहिती मिळते आहे. गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये ६२ हजार ९५१ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली होती.

मॉर्निंग स्टार इंडियाचे सहायक संचालक आणि विश्लेषक हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, ‘जागतिक बाजारांमध्ये अतिरिक्त रोख भांडवल आणि कमी व्याजदर यामुळे भारतासारख्या देशांमध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. तसेच विविध देशातील केंद्रीय बँकाच्या वृद्धीसाठी प्रोत्साहन पॅकेजची अपेक्षा असल्यामुळेही गुंतवणूकदार जोखीम उचलत आहेत. कोरोनाची लस येण्यानंही शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे, यामुळेही गुंतवणूक वाढत आहे.’

गेले काही दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजीचा कल कायम असून, दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकही नोंदवले आहेत. कोरोनाशी लढा देण्यातही भारत यशस्वी ठरत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढवणं आणि मृत्यू दर जगात सर्वांत कमी राखण्यात भारतानं यश मिळवलं आहे. कोरोनावरील लशी उत्पादनातही भारत आघाडीवर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योग क्षेत्रालाही चालना मिळाली आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे.

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणजे परदेशातील बाँड्स शेअर्स यात गुंतवणूक केली जाते. यामध्ये अन्य देशातील नागरिकांद्वारे शेअर्स, सरकारी रोखे, व्यावसायिक रोखे आणि अन्य गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवले जातात. ही गुंतवणूक अल्पकालीन आर्थिक लाभ मिळवण्याच्या दृष्टीनं केली जाते. यात व्यावसयिक नियंत्रण मिळवण्याचा उद्देश नसतो.

उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करुन महाराष्ट्राने मागील वर्षभरात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या काळात सहा महिन्यातच एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे २५ भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ६१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

कोविड-१९ चे संकट जगावर असताना सुद्धा महाराष्ट्रात उद्योग विभागाने कमी कालावधीत दोन लाख कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा समाधान, अभिमान वाटेल असा क्षण आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री देसाई आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोविडचे संकट टळलेले नाही. सध्या कोरोनाची परिस्थिती समाधानकारक असली तरी युरोपात स्ट्रेन वेगाने पसरतोय. या गुंतवणूकीत पिझ्झा, आईसक्रीम आहे. शेततळे आहे, दूध आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्राला तुमची ताकद मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे.

घरातून ताकद मिळाल्यानंतर हत्तीचे बळ मिळते. महाराष्ट्राच्या परिवारातील तुम्ही सर्व आहात. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. देशाच्या प्रगतीची धारणा महत्त्वाची आहे. कष्ट करण्याची तयारी आपल्या अंगी असेल तर नक्कीच महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. उद्योग मित्र ही संकल्पना उत्तम असून त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी लवकर दूर होतील आणि कामाला गती मिळेल. उद्योजकांनी या संकटाच्या काळात देखील महाराष्ट्रात गुंतवणूक केली हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत राहील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना आश्वासित केले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत उद्योग करारांचा हा तिसरा टप्पा आहे. एक लाखाचा टप्पा पार करत आहोत. खास बाब म्हणजे करार होत असलेल्या सर्व कंपन्या भारतातील आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची उद्योजकांची इच्छा असल्याचे यावरून दिसून येते. यापूर्वी २९ करार झाले आहेत. त्यापैकी २१ उद्योजकांना उद्योगांसाठी जमिनी दिल्या आहेत. प्रत्यक्ष गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रत्येक उद्योगासाठी रिलेशन मॅनेजरची नियुक्ती केली आहे. रोजगार वाढावा, गुंतवणूक यावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सांगितले.

उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, जगावर कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचा टप्पा राज्याने गाठला आहे. जवळपास सहा महिन्यात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक करुन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करुन दिली, असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी म्हणाले, राज्यातील उद्योग क्षेत्र पुन्हा पूर्वपदावर येत आहे. ज्यांच्याशी करार झाले त्यांना जमिनी वाटप केल्या आहेत. राज्याच्या सर्व भागाचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, म्हणाले, औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. हे करार पूर्णत्वास येण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. महापरवानामुळे २१ दिवसांत परवाना दिला जात आहेत. यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. महाजॉब्जमुळे उद्योग आणि नोकरी मागणाऱ्यामध्ये दुवा म्हणून काम शासन काम करत आहे. सेवा, उद्योजकांना औद्योगिक सुविधा पुरवण्यावर अधिक भर आहे.

उद्योजक सज्जन जिंदाल म्हणाले, उद्योजक महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात पुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री श्री.ठाकरे विशेष प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मॅग्नेटीक आहे. संपूर्ण जग या ठिकाणी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. जिंदाल ग्रुपच्या १० कंपन्या महाराष्ट्रात काम करतात. जवळपास १ हजार कोटींची गुंतवणूक यामध्ये केलेली आहे. रायगड जिल्ह्यात देशांतील त्यामध्ये सर्वात मोठा स्टील कारखाना सुरू करण्याचा मानस आहे. ४० मिलीयन टन क्षमतेचा हा प्रकल्प असणार आहे.

सामंजस्य करारामध्ये या कंपन्यांचा समावेश आहे –
एक्साईड इन्डस्ट्रीज, भारत बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, (500 कोटी गुंतवणूक 1000 रोजगार निर्मिती), श्रीधर कॉटसाइन, वस्त्रोद्योग (369 कोटी गुंतवणूक,520 रोजगार निर्मिती), ज्युबिलन्ट फूड वर्क्स, अन्नप्रक्रिया (150 कोटी गुंतवणूक, 400 रोजगार निर्मिती), जेएसडब्ल्यू स्टील (20 हजार कोटी गुंतवणूक, 3000 रोजगार निर्मिती), गोयल गंगा आयटी पार्क (1000 कोटी गुंतवणूक, 10 हजार रोजगार निर्मिती), जी जी मेट्रोपॉलिस, आयटी पार्क (1500 कोटी गुंतवणूक 15 हजार रोजगार निर्मिती), सेंच्युर फार्मास्युटिकल लिमिटेड, फार्मास्युटिकल (300 कोटी गुंतवणूक, 1500 रोजगार निमिर्ती), ग्रँव्हिस भारत, अन्नप्रक्रिया (75 कोटींची गुंतवणूक, 100 रोजगार निर्मिती), के. रहेजा, माहिती तंत्रज्ञान (7 हजार 500 कोटी गुंतवणूक, 70 हजार रोजगार निर्मिती), इंडियन कॉर्पोरेशन लॉजिस्टीक, लॉजिस्टीक (11049.5 कोटी गुंतवूणक 75 हजार रोजगार निर्मिती), बजाज ऑटो अँड ऑटो कंपोनंट, (650 कोटी गुंतवूणक 2500 रोजगार निर्मिती), सुमेरू पॉलिस्टर एलएलपी, वस्त्रोद्योग (425 कोटी गुंतवूणक, 500 रोजगार निर्मिती), नवापूर इंडस्ट्रीयल पार्क एलएलपी, इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर (200 कोटी गुंतवणूक, 100 रोजगार निर्मिती), कीर्तीकुमार स्टील उद्योग, स्टील उत्पादन (7 हजार 500 कोटी गुंतवणक, 60 हजार रोजगार निर्मिती), इन्स्पायर इन्फ्रा (औरंगाबाद) लि. इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया (7 हजार 500 कोटी गुंतवणूक, 10 रोजगार निर्मिती), जेनक्रेस्ट बायो प्रॉडक्ट, वस्त्रोद्योग (500 कोटी गुंतवणूक, 500 रोजगार निर्मिती), मलक स्पेशालिटीज, केमिकल (45.56 कोटी गुंतवणूक 60 रोजगार निर्मिती), अम्बर एन्टरप्रायझेस इंडिया लि.मॅन्युफॅक्चरिंग (100 कोटी गुंतवणूक, 220 रोजगार निर्मिती), ग्रॅंड हॅण्डलूम फर्निचर प्रा. लि.वस्त्रोद्योग (106 कोटी गुंतवणूक, 210 रोजगार निर्मिती), अॅम्पस फार्मटेक्स इंडस्ट्रीज, इंजिनिअरींग (104 कोटी गुंतवणूक, 220 रोजगार निर्मिती), क्लिन सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि., केमिकल (132.4 कोटी गुंतवणूक, 750 रोजगार निर्मिती), सोनाई इडेबल इंडिया प्रा. लि. अन्न, खाद्य तेल रिफायनरी (189.57 कोटी गुंतवणूक, 300 रोजगार निर्मिती), सुनील प्लास्टिक इंडस्ट्रीज, डेव्हलपर (110 कोटी गुंतवणूक, 500 रोजगार निर्मिती), रिन्युसिस इंडिया प्रा लि, तरिन्युएबल एनर्जी (500 कोटी गुंतवणूक, 1500 रोजगार निर्मिती), हरमन फिनोकेम, केमिकल (536.5 कोटी गुंतवणूक, 1500 रोजगार निर्मिती), अशी रु. 61.043 कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. या माध्यमातून 2 लाख 53 हजार 880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत विविध गुंतवणूकदारांशी काल झालेल्या करार प्रसंगी झालेल्या भाषणबाजीतही राजकारण डोकावलेच. मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्के मुंबईकर आहोत, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

”मुंबई आणि महाराष्ट्रात गुंतवणूक सातत्याने होत असते. त्यामुळे येथे फेरीवालेही मोठ्या प्रमाणात येत असतात. येथील गुंतवणूक खेचण्यासाठी काही फेरीवाले बाहेरून येतात; पण मुंबईतील गुंतवणूक बाहेर जाणार नाही,” असा चिमटा देसाई यांनी काढला.

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी आले होते. उत्तर प्रदेशात चित्रपट नगरी सुरु करण्याचेही तेथील भाजप सरकारचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आदित्यनाथ यांनी बाॅलिवूडच्या निर्मात्यांची भेट घेतली होती. अभिनेता अक्षय कुमारही त्यांना भेटला होता. त्यावरुन शिवसेना नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे आता बाहेरून येणाऱ्या नेत्यांना फेरीवाला म्हणणे हा योगी आदित्यनाथ यांना मारलेला शेरा मानला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाकाळात मोठी गुंतवणूक आली असून आपले राज्य हे सुपर मॅग्नेटिक पॉवर असल्याचा अभिमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आज विविध गुंतवणूकदारांशी “मॅग्नेटिक महाराष्ट्र’अंतर्गत झालेल्या कराराप्रसंगी ते बोलत होते.

विविध क्षेत्रांत काम करणारे उद्योजक हे महाराष्ट्र परिवाराचे सदस्य आहेत. जग कोरोनासंकटाचा सामना करत असताना आपल्या मंडळींनी विश्वास टाकून जी गुंतवणूक केली आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपली मंडळी बरोबर असली की हत्तींचे बळ मिळते, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त
व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या काळात राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक आली. त्यातील १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक कोरोनाकाळातील आहे. महाराष्ट्राच्या या कामगिरीकडे संपूर्ण देश एक उदाहरण म्हणून बघेल, असेही ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक आता भारतात येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रातही यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्ते केली. महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक आता भारतात येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रातही यायला पाहिजे, असं सांगतानाच विदेशातील गुंतवणुकीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. आधी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होत होती. महाराष्ट्र या गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. आता तिसऱ्या क्रमांकावर आहे, असं फडणवीस म्हणाले.

पुढची पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री राहायचे आहे. तसं विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आशावादी आहेत याचाच आनंदन आहे. त्यांना पुढचे 50 वर्षे मुख्यमंत्री राहण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राऊतांच्या विधानावर मी बोलत नाही, असं ते म्हणाले.

राज्यावर विश्वास दाखवत जी गुंतवणूक येथे झाली, त्याबद्दल उद्योजकांचे मनापासून आभार मानायची गरज आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्येक उद्योजकाशी एक उद्योगमित्र जोडून दिला, हे अत्यंत अभिनंदनीय पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

राज्यातील अनेक उद्योगांना मजुरांचा तुटवडा पडल्याने दुप्पट मजुरीसह काम दिले जात आहे. मात्र त्याचा फायदा घेण्यात स्थानिकांची संख्या अपुरीच आहे. स्थानिक भूमिपुत्रांना उद्योगांमध्ये 80 टक्के नोकऱया देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. मात्र ज्या पद्धतीची कष्टाची कामे उद्योगक्षेत्रात आहेत, ती करायला आपला स्थानिक भूमिपुत्र फारसा उत्सुक दिसत नाही. तेथे परराज्यातून येणारी तरुणांची फळी संधी साधते आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या पुढील वीस वर्षांमध्ये दिसू लागणार आहे. आज मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांनी आपली संस्कृती आणि चेहरा हरवला आहे. पुणेसुद्धा आता बहुसांस्कृतिक शहर झाले आहे. अशावेळी स्थानिकांच्या बेरोजगारीचा प्रश्न हा केवळ संधी नाही म्हणून नव्हे तर असलेली संधी साधण्यात किंवा त्यासाठीचे कौशल्य प्राप्त करण्यात भूमीपुत्र कमी पडत आहे म्हणूनही निर्माण झाला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. ’उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी पाणी भरी’ हे गीत म्हणून चांगले असले तरी दारात लक्ष्मीने पाणी भरायचे तर त्यासाठी कौशल्य असले पाहिजे, जिद्दही पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रात किती सामंजस्य करार झाले तरी भूमिपुत्रांचे प्रश्न कायमच राहतील. पुढील वीस वर्षात अधिक तीव्र होतील. तेव्हा आजच कौशल्य आत्मसात करायला लागून या संधीत आपली जागा निश्चित केली पाहिजे.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
२४.१२.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *