डेपोच्या अडथळ्यामुळे राष्ट्रीय महामार्ग च्या बाजूने जाणाऱ्या नालीचे बांधकाम रखडले
फुलवळ (धोंडीबा बोरगावे)
कंधार तालुक्यातील फुलवळ येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग च्या बाजूला बसस्टँड च्या शेजारी विज वितरण चा एक डेपो असून या डेपोच्या अडथळ्यामुळे राष्ट्रीय महामार्ग च्या बाजूने जाणाऱ्या नालीचे बांधकाम रखडले असून त्या नालीचे बांधकाम झाल्याशिवाय सदर राष्ट्रीय महामार्ग चे उर्वरित काम चालू करणे शक्य नसल्याचे कारण दाखवत संबंधित ठेकेदाराने ते रस्त्याचे काम अर्धवट करून सोडले आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग च्या कामात विज वितरण चा हा आडवा दांडू असेच म्हणावे लागेल.
येथून जात असलेल्या महामार्ग वरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असून सदर रस्त्याचे काम ठीक ठिकाणी चालू आहेच परंतु बरेच ठिकाणी पुलाचे काम चालू असून रस्त्यावर असलेल्या खड्डयामुळे आहे जागोजागी अर्धवट सोडून काम पुढे चालू केल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर पुलाचे काम चालू असलेल्या ठिकाणी काढून दिलेल्या वळण रस्त्यावर पडलेल्या खड्या मुळे प्रवाशी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदरील रस्यावरून दिवसागणिक वाहतूक वाढतच असून राष्ट्रीय महामार्ग असल्याने ट्रान्सपोर्ट ची वाहने सुद्धा याच मार्गावरून ये जा करत आहेत . याच मुख्य महामार्गवर ऐन बसस्टँड वरती विज वितरण कंपनी च्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा एकदम कमी उंचीवर डोक्यावरच लोंबकळत असल्याने जवळपास अनेक वाहनांना त्याचा खूपच अडथळा होत असून ते तार वाहनाला स्पर्श होताच स्पार्किंग होऊन आजपर्यंत अनेक धोके सुदैवाने टळले पण जर का वाईट वेळ लागली आणि अशी स्पार्किंग झाली आणि मोठा अनर्थ झालाच तर मग मात्र किती जीवित हानी होईल आणि किती जणांना जीव गमवावा लागेल हे सांगता येणार नाही.
एकंदरीत अशा अनेक अडचणींना तोंड देत गावकरी , प्रवाशी आणि वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या अशा गंभीर बाबीकडे ना गुत्तेदार लक्ष घालत आहेत ना लोकप्रतिनिधी .
तेंव्हा सदर गंभीर बाबीकडे जर असे जबाबदार लोकच दुर्लक्ष करत असतील तर किमान शासन आणि प्रशासनाने तरी वेळीच लक्ष घातले तर वीज वितरण कंपनी च्या या आडमुठे धोरणामुळे व जाणीवपूर्वक करत असलेल्या दुर्लक्षामुळे होणारे अपघात आणि त्या डेपोमुळे रखडलेले नाली व रस्त्याचे काम लवकर मार्गी लागेल अशीच अपेक्षा गावकरी व जनमाणसाला वाटत आहे.