कवी – साने गुरुजी
कविता – १) खरा तो एकची धर्म
२) आता उठवू सारे रान
पांडुरंग सदाशिव साने (टोपण नाव – साने गुरुजी).
शिक्षक, समाजसुधारक, लेखक, कवी.
जन्म – २४/१२/१८९९ (पालगड, रत्नागिरी).
मृत्यू – ११/०६/१९५० (वय वर्षे ५०).
साने गुरुजी यांच्या बालमनावर त्यांच्या आईच्या संस्कारांचा मोठा प्रभाव होता. त्यातूनच त्यांचा जीवन विकास झाला. साने गुरुजींनी इंग्रजी साहित्यात एम.ए. ची पदवी उत्तीर्ण केली होती. पुढे ते शिक्षक झाले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा पगडा होता. साने गुरुजी मानवतेचे पुजारी होते तसेच ते शब्दांचेही पुजारी होते. साने गुरुजी यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली.
“पत्री” या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहात साने गुरुजी यांनी अनेक देशभक्तीपर कविता केल्या. “बलसागर भारत होवो” सारख्या कवितांचा प्रभाव जनमानसात मोठ्याप्रमाणावर झाला. त्यामुळे ब्रिटीशांनी त्याच्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या होत्या.
समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, अनिष्ट रुढी परंपरा या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठविला आणि आपल्या लेख आणि कविता साहित्यातून याविरोधात लेखन केले.
१९४८ मध्ये त्यांनी साधना साप्ताहीक सुरू केले. त्यातील कथा, कादंबरी, लेख, निबंध, चरित्रे, कविता अशा विविध प्रकारच्या साहित्यातून साने गुरुजी यांच्यात संवेदनशी साहित्यिक कवी असल्याचे आढळते.
साने गुरुजी यांनी ७३ पुस्तके लिहिली. त्यातील बरेचसे लेखन त्यांनी तुरुंगात असताना केले. “श्यामची आई” ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिली.
स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल साने गुरुजी यांना अनेकवेळा तुरुंगवासही भोगावा लागला.
बंगलोर येथे तुरुंगात असताना साने गुरुजी यांनी तिरुवल्लीर नावाच्या कवीच्या “कुरल” या नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले.
त्यांनी फ्रेंच भाषेतील “Les Miserables” या कादंबरीचा “दु:खी” या नावाने मराठीत अनुवाद केला.
डॉ.हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानव वंशशास्त्रज्ञाच्या “The story of human race” या पुस्तकाचे मराठीत “मानवजातीचा इतिहास” असे भाषांतर केले.
‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे’ हे साने गुरुजींच्या जीवनाचे सार होते.
त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली.
साने गुरुजींची “खरा तो एकची धर्म” ही कविता भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. साने गुरुजींच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिसतो. त्यांचे साध्या भाषेतील लेखन सामान्यांना नेहमीच भावत असे.
त्यांच्या मनातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक विचारांचे जे भावनिक कल्लोळ उठले ते सर्व त्यांनी आपल्या साहित्यातून प्रकट केले.
“श्यामची आई” आणि “श्याम” ही त्यांची पुस्तके विशेष गाजली.
आता उठवू सारे रान…
खरा तो एकची धर्म…
बलसागर भारत होवो…
या साने गुरुजी यांच्या गाजलेल्या कविता पाठ्यशाळेत अभ्यासक्रमातही होत्या.
अशा प्रतिभावंत हाडाच्या शिक्षक साहित्यिकाचे आयुष्य मात्र अवघे ५० वर्षेच राहिले.
समाजात आपण इतरांना मदत करत, गरजवंताच्या उपयोगी पडत, समाजाच्या कल्याणाप्रती झटत, सर्वांसोबत सतत प्रेमाने वागले पाहिजे. मानंवता हाच खरा आपला धर्म आहे आणि त्याचे आचरण करणे हे आपले कर्तव्य आहे. असा आशय व्यक्त करणारी साध्या सोप्या भाषेतील सुंदर कविता “खरा तो एकची धर्म” आपल्याला मानवतेचेचा आणि सत्कर्माचा संदेश देते.
तर “आता उठवू सारे रान” या कवितेत साने गुरुजी शेतकऱ्यांवर आणि मजूरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवताना दिसतात. आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याची उमेद जागृत करण्याचे काम ते आपल्या कवितेतून करतात.
या दोन्ही कवितांचा आनंद आपण घेऊयात –
खरा तो एकची धर्म
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
- साने गुरुजी
आता उठवू सारे रान
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान
कोण आम्हां अडवील, कोण आम्हां रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण
शेतकर्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण
- साने गुरुजी
◆◆◆◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/