■ कविवर्य मंगेश पाडगावकर सर यांचा
आज स्मृतीदिन…
त्यानिमित्ताने👇🏻
॥ काव्यांजली ॥
सर,
चांदोबासारखे शीतल तुम्ही
सूर्यासारखे तेजस्वी
ओंजळ भरून घेण्याइतकी
कविता तुमची ओजस्वी
शहाऐंशी पैकी जगलात
कवितेसाठी वर्षे सत्तर!
तुमचा प्रत्येक शब्द म्हणजे
कुप्पीतले सुगंधी अत्तर
बोबडं बाळ जसं
चोखतं आइसक्रेट, पेप्सी
इतकी सहज तुमची
कवितेतली ‘जिप्सी’
फूलपाखरू होऊन शिकवलात
गुणगुणत जगायला
अर्ध्या सरलेल्या पेल्याकडेही
सकारात्मक बघायला
वास्तवाचे भाष्यकार तुम्ही
हृदय फुलवणारी शैली
काळजीतल्या काळजांना दिलात
‘आनंदऋतू’ भरलेली थैली
अवघ्या विश्वाला बसवलात
ज्ञानी पिंपळ पानावर
प्रेम कराय शिकवलात
माणसातल्या ‘माणूस’पणावर
शब्दरत्ने शिंपडून जगण्याचा
मार्ग दाविलात सोप्पा
आनंदयात्रीला ‘सलाम’ ठोकतोय
हरेक काळीज कप्पा
कवितेला केलात तुम्ही
ओठावरचं मंजूळ गाणं
घरातल्या माणसासारखंच
सर,
वाटलं तेंव्हा तुमचं जाणं…
-विलास कोळनूरकर,
जिप केंद्रीय उर्दू-मराठी प्राशाळा,
तळेगाव, ता.उमरी, जि.नांदेड
📱९४२०४४८०१९
( 📝३० डिसेंबर,२०१५)