सेवानिवृत्त होत असताना…

— धर्मभुषण ॲड.दिलीप ठाकुर

काय दचकलात ना शीर्षक वाचून. तसाच मी देखील दचकलो होतो जेव्हा २०२० चा डिसेंबर संपत होता. जर मी आज एस टी महामंडळात नोकरीला असतो तर ३१ डिसेंबर २०२० रोजी वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्त झालो असतो. माणूस सेवानिवृत्त झाला की, आपले काम संपले. आता आपल्याला कोणी विचारणार नाही. आपला वेळ कसा जाईल? या धसक्याने अनेकजण निराश होतात. काही जण तर अशाच निराशे पोटी जिंदगीच्या पटलावरून निवृत्त होऊन स्वर्गवासी होतात. याचे कारण म्हणजे, त्या शासकीय, अशासकीय, महामंडळ कर्मचाऱ्यांनी आपले जीवन एका चाकोरीत जगलेले असते आणि त्या चाकोरी मध्ये त्यांची नोकरी हेच सर्व काही असते. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर नोकरीत असताना मिळत असलेला मान कमी झाल्यामुळे मन कच खाते. नौकरीत असताना वेळ कसा निघून जातो हे कळत देखील नाही पण सेवा निवृत्त झाल्यावर वेळ कसा काढावा हा प्रश्न प्रामुख्याने सतावत असतो. पण काही लोक सेवा निवृतीच्या एक दोन वर्ष अगोदरच नियोजन करून ठेवत असतात. असो.

१९८४ साली एक वर्ष अप्रेंटीशीप केल्यानंतर मी आणि सुधाकर पांढरे १ जून १९८५ ला एकाच दिवशी एस टी महामंडळात लिपीक या पदावर रुजू झालो. ८५ ते ८९ या काळात काम कसे करावे याचा बारकाईने अभ्यास केला त्यामुळेच खूप काम करता आले. १९८९ साली हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन एसटी कामगार सेना या युनियनची ची स्थापना नांदेड विभागात केली आणि सरचिटणीस या मुख्य पदाची ची जबाबदारी माझ्यावर आली. कामाचे स्वरूप बदलले. कामगारांचे प्रश्न सोडवण्यात वेळ खर्ची होऊ लागला. याच काळात नांदेड विभागात सेनेच्या संघटनेचे बरेचसे नवीन सभासद केले, संघटनेचे काम वाढविले. त्यावेळी कै प्रकाशभाऊ खेडकर हे विभागीय अध्यक्ष या पदावर होते. त्यामुळेच त्यांच्या सोबतचा संपर्क आणि स्नेह वाढत गेला. पुढे १९९५ साली विधानसभेची निवडणूक लागली आणि प्रकाशभाऊंना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. आचारसंहिता असल्यामुळे उघडपणे काम करू शकत नव्हतो कारण नोकरीवर गदा येण्याची भीती होती. त्यामुळे प्रकाशभाऊ खेडकर यांच्या घरातून महिनाभरात बाहेरच निघालो नाही आणि प्रचार मोहिम राबविली. भाऊ आमदार झाले. त्यांच्यासोबत काम करत असताना खूप मेहनत घेतली. पूर्ण काम करून देखील नोकरी असल्यामुळे त्याचे श्रेय मिळत नव्हते. शेवटी विचार केला नोकरी सोडून द्यावी आणि उघडपणे काम करावे. मग २००२ साली नांदेड मनपाचा नगरसेवक झाल्यामुळे एसटीच्या नोकरीचा राजीनामा दिला.

नोकरी सोडल्यामुळे कोणतेही बंधन नव्हते. मनात इच्छा असेल ते काम करायचो. विविध उपक्रम राबवले त्यामुळे कामाचे श्रेय देखील मिळत गेले. कधी तेच तेच सेवाकार्य करताना कंटाळा आला की, नवीन सेवाकार्य सुरू करायचो. त्यामुळे उत्साहात कमतरता जाणवत नव्हती. कधी कधी कंटाळा आला की ,आवडेल तिथे एकटाच जात असे, जे दिसतील त्यांच्याशी उगाच ओळख काढून बोलायचो. जे बघितले ते घरी जाऊन बायकोला सांगत असे. जे आवडले ते खातो. खात असताना कोणी काय म्हणेल याचा विचार करत नाही. रस्त्यावर भाजलेले मक्याचे कणीस खाताना काही अवघड वाटलं नाही. बुढ्ढीके बाल खाल्ल्यानंतर जीभ लाल झालेली पाहून बालपण आठवत असे. लहानपणीच्या आठवणी आल्या की खाऊ, खेळणी घेऊन एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन भरपुर वेळ घालवत असे. त्यांच्यासोबत मस्तपैकी नाचतो, गातो. त्यामुळे वयाचे अंतर विसरून ही बच्चे मंडळी देखील आपल्यात मला सामील करून घ्यायचे. यातूनच एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळत गेली. कधीकधी खुप एकटे वाटले की छानपैकी खाण्याचे पार्सल घेऊन वृध्दाश्रमात जातो,त्यांच्या सोबत खातो. त्यांच्याशी संवाद करतो. वेगवेगळे खेळ त्यांच्यासोबत खेळतो. विनोदी किस्से सांगून भरपुर हसवतो व त्यांच्या आनंदात सामील होतो .

एखादा दिवस असा उजडतो की, काहीच करावेसे वाटत नाही. मग काय मोबाईल करतो बंद. एखादे छानसे पुस्तक हातात घेतो आणि ते वाचत असताना दिवस कसा जातो हे कळतच नाही. साहित्य विश्वात रममान होताना तहानभूक विसरून जातो. मुंबईसारख्या शहरात गेलो . काम संपले आणि मोकळा वेळ असला की, आलेली पहिली बेस्ट बस पकडून शेवटच्या स्टॉप चे तिकीट काढतो. तिथे उतरल्यानंतर पुढची जी कोणती बस मिळाली त्यात बसून भटकतो. मुंबईची गर्दी, लोकांची धावपळ ,उंच उंच इमारती पहात असताना दिवस चुटकी सारखा संपतो. मुंबईच्या लोकांचे जीवन घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळत असते हे पाहून आपण नांदेड सारख्या शांत शहरात रहात असल्याचे समाधान मिळते. नांदेड ला एखाद्या दिवशी गोदावरी काठी जातो. निसर्गरम्य वातावरणात एकांतात बसल्यामुळे मनाला शांती मिळते. हे सर्व केल्यामुळे नवीन ऑक्सिजन मिळत असतो जगायला. आणि मग परत नव्या जोमाने काम करायला सुरुवात करतो.

नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला नसता तर एसटीचा कर्मचारी म्हणूनच जीवन जगले असते. आज माझ्यासोबत जे काम करत होते त्यांचे विश्व एसटी पुरतेच मर्यादित राहिले कारण प्रत्येक चाकरमान्याचे जीवन हे एका चौकटीत बंदिस्त झालेले असते. पण मला स्वच्छंद आकाश मिळाल्यामुळे मनसोक्त पणे वावरता आले. आता तरी वयाची 58 वर्षे पूर्ण होत असली तरी जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत सेवाकार्य करत राहायचा वसा हातात घेतला आहे. बघूया यात परमेश्वराची कृपा आणि लोकांची साथ किती मिळते ते.

सुनने की आदत डालो… क्योंकि ताने मारने वालों की कमी नहीं हैं।

मुस्कराने की आदत डालो… क्योंकि रुलाने वालों की कमी नहीं हैं

ऊपर उठने की आदत डालो… क्योंकि टांग खींचने वालों की कमी नहीं है।

हौसला बढाने की आदत डालो… क्योंकि
हताश करने वालों की कमी नहीं है

( वरील माझा लेख दैनीक उद्याच्या मराठवाडा मध्ये रविवार दिनांक 27.12.2020 रोजी प्रकाशित झाला आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *