प्रत्येकाचे जीवन जगण्याचे मार्ग,पैलु भिन्न- भिन्न असतात. जगातील बहुतांशी लोक रुळलेल्या वाटेवरूनच चालतात आणि आपले जीवन संपवतात,पण काही लोक इतके जिद्दी, निश्चयी आणि धैर्यशील असतात की ते जुन्या वाटा मोडून काढतात आणि नव्या प्रेरणादायी वाटा तयार करतात.
अशीच माणसे इतिहासावर आपला ठसा उमटवतात.असाच प्रेरक ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले होय.आज सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती आहे.त्या निमीत्ताने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करीत आहे.
“ज्ञान नाही विद्या नाही,
ती घेण्याची गोडी नाही,
बुद्धी असुन चालत नाही,
तयाशी मानव म्हणावे का?”
समस्त मानवाच्या वर्तणूकीवर सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक गुलामगिरीवर प्रश्न उपस्थित करून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मृतावस्थेतील स्त्री पुरूषांना जीवंत करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात इ.सनाच्या १८ व्या शतकात केलं.
भारतीय बहुजन समाजामध्ये स्त्रियांचा हुंकार कायम भिंतीआड दाबला गेला.परकीय आक्रमणाने भारतीय मुळ संस्कृती आणि समाज व्यवस्थाच पूर्णपणे उद्ध्वस्त केली.आर्यांच्या आक्रमणानंतर पितृसत्ताक पद्धती रूढ झाली.त्यामुळे स्त्री ही गुलामगिरीच्या साखळदंडात बंदिस्त झाली.आर्यांच्या पुरुषप्रधान संस्कृतीने तिला केवळ एक उपभोग वस्तू बनविली.रूढी,परंपरा, देवदेवतांच्या कपोलकल्पित खोट्यानाट्या कथांमध्ये तिला गुंतवून ठेवण्यात आले
. व्रतवैकल्य,मंत्र,जप,तप, अनुष्टान,या सारक्या नियमात तिला बांधून ठेवले.त्यांमुळे तिच्यातील प्रतिभा,क्षमता, बुद्धीकौशल्य यासारख्या गुणांचा विकास झाला नाही.जन्मापासून मरेपर्यंत तिने सेवा करावी अशीच व्यवस्था आर्यांच्या धर्मव्यवस्थेने केली.ती कशी त्यागमूर्ती आहे , याचे फसवे आदर्श तिच्यापुढे ठेवण्यात आले . तिच्या कुठल्याच कर्तृत्वाला वाव मिळाला नाही आणि तिनेही निमुटपणे मूक प्राण्याप्रमाणं गुलामवृत्तीत जगण्याची मानसिक तयारी ठेवली.
भारत गुलामगिरीचे चटके सोसत होता.
भारताला गुलामगिरी नवी नव्हती.कित्येक वर्षे भारत देश हा गुलाम राहिला.अशा या गुलाम देशातील गुलाम स्त्रीची काय अवस्था असेल? तिची चूल आणि मुल एव्हढेच तिचे कार्यक्षेत्र होते . पण ती कुटुंबात सुध्दा सुरक्षित नव्हती.अनेक वाईट चालीरीती , कुप्रथा जोखड यामध्ये ती पिचून गेलेली होती.
बालविवाह,वैधव्य,सतीप्रथाच्या अनिष्ट रूढी परंपरेत ती होरपळत होती.घरातल्या घरात तिच्यावर होणारया अन्याय आणि अत्याचाराला संपूर्ण इतिहास साक्ष आहे.अशा या धर्माच्या आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या चौकटी खिळखिल्या करण्याचे काम सावित्रीमाई फुलेनी केले. सावित्रीमाई फुलेंनी उचललेले पाउल हे क्रांतिकारी होते. ज्या काळात स्त्रीला माजघरातून दिवाणखाण्यात पाहण्याची सुद्धा बंदी होती.त्या काळात सावित्रीबाईंनी स्त्रीयांसाठी शाळा काढली हे मोठे धाडसाचे पाउल होते.अन्याय आणि अत्याचारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ती प्रथम स्वावलंबी बनली पाहिजे हा विचार त्यांच्या मनात होता. म्हणूनच त्यांनी पुण्याला भिडेवाड्यात (1848 मध्ये ) पहिली मुलींची शाळा काढली.
धर्माने स्त्री शिक्षणावर बंदी घातलेल्या स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे त्या काळातील सनातनी प्रस्थापित व्यवस्थेला खूप मोठा धक्का होता. पहिल्यांदाच एका शुद्रबहुजन समाजातील स्त्रीने उचललेले हे बंडखोरीचे पाउल होते.
याचा त्रासही त्यांना सहन करावा लागला.पण गुंडांच्या आणि धटीगणांच्या भीतीला त्यांनी भिक घातली नाही . वेळप्रसंगी अशा गुंडांचे श्रीमुख फोडण्याचे अचाट सामर्थ्यही त्यांनी दाखविले म्हणूनच आत्मरक्षणासाठी संपूर्ण स्त्री जातीसाठी सावित्रीबाई फुले प्रेरणादाई आहेत.
३ जानेवारी हा दिवस बालिका दिन, स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले या केवळ समाजसुधारक नव्हत्या , तर त्या स्त्रियांच्या न्याय – हक्कासाठी लढणार्या प्रेरकशक्ती होत्या . समाजात स्त्री आणि पुरुषांमध्ये असणार्या असमानतेबद्दल त्यांच्या मनात कमालीचा तिटकारा होता.त्यांची ही घालमेल त्यांच्या कवितेतून व्यक्त होताना दिसते.त्या म्हणतात –
बैल काम करीत राही,
ऐतोबा हा खात राही
पशुपक्षांत असे नाही,
त्यास मानव म्हणावे का ?
निसर्गातील साधं उदाहरण देऊनही असमानता केवळ मानव प्राण्यात कशी आहे, हे दाखवून समाजातील दांभिकतेवर त्यांनी प्रहार केला आहे.
सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तिमत्व एक क्रांतिकारी लोकनायिकेच्या रुपात पुढे येताना दिसते. त्याकाळी स्त्रियांना वर्ज्य असणार्या कित्येक गोष्टी सावित्रीबाईंनी मोठ्या हिंमतीने केल्या.पेशवाईच्या काळात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.सवर्ण जातीतील वाकडे पाउल पडलेल्या स्त्रियांच्या अनौरस मुलाचं बाळंतपण करण्यासाठी त्यांना बालहत्या प्रतीबंधक गृहच आधार होता.यामुळे संपूर्ण समाजात खळबळ माजली धर्माच्या ठेकेदारांनी टीकेचे रान उठविले. पण धीरोदत्त व निश्चयाचा महामेरू असलेल्या सावित्रीबाई फुले डगमगल्या नाहीत,त्यांनी आपले कार्य जोमाने चालू ठेवले.अशा या कणखर व्यक्तिमत्वाच्या युगस्त्रीने आपल्या पतीच्या निधनानंतर हातात टिटव धरून अंतिम संस्काराचाही विधी पार पाडला आणि राष्ट्रपिता फुलेंच्या निधनाचा तमाशा करायला बसलेल्या कर्मठ चांडाळ चौकडीला चांगलाच धडा शिकविला.या घटनेवरून सावित्रीबाई फुले आधुनिक समाज निर्मितीचे प्रतिनिधित्व करताना दिसतात.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावलेल्या सुधारणेच्या रोपट्याने आज वटवृक्षात रूपांतर केले आहे.स्त्रीया बाहेर पडत आहेत . शिकत आहेत.चांगल्या पदांवर नोकरया व काम करीत आहेत.पण आजही तिच्यावरील अन्याय आणि अत्याचार कमी झालेले नाहीत.लैंगिक अत्याचाराची तीव्रता वाढत आहे . निर्भयपणे जगण्याची तयारी तिने केली आहे.पण व्यवस्था तिला निर्भयपणे जगू देत नाही.वयाने लहान वा मोठी,सुशिक्षित – अडाणी,शहरी, ग्रामीण, उच्चपदस्थ या सगळ्याच स्थरातील स्त्रिया लैंगिक वासनेला बळी पडत आहेत.हा अन्याय , अत्याचार थांबविण्यासाठी पुन्हा सावित्री निर्माण होणे आता शक्य नाही.
पण …… सावित्रीच्या खरया वारसदार म्हणून स्वतःचा उद्धार स्वतःच करण्याची हिम्मत दाखविली पाहिजे.सावित्रींच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आत्मसन्मानाने जगण्याचा निर्धार करायला हवा! बहुजन समाजात जन्माला येउन सावित्रीबाई निर्भयपणे जगून स्त्री वर्गाला निर्भयपणे जगण्याची हिम्मत दिली,तर मग आज आपण याच सखी सावित्रीच्या लेकी असूनही भयप्रद जिने का जगावे ? याचा विचार होणे गरजेचे आहे.
सावित्रीच्या याच प्रेरणेची ज्योत पेटवून आत्मनिर्भर होऊ या! सावित्रींची ज्ञानज्योत घराघरात लावू या!
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
आणि त्यांच्या कार्यास,पावित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
रमेश पवार
लेखक,व्याख्याते-बहीशाल शिक्षण केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
(मो.७५८८४२६५२१)