कवी – कृ. ना. आठल्ये
कविता – प्रमाण
कृष्णाजी नारायण आठल्ये.
कवी, टिकाकार, भाषांतरकार, चरित्रकार, संपादक.
जन्म – ०३/०१/१८५३ (टेंभू – सातारा).
मृत्यू – २९/११/१९२६ (पुणे).
कृ.ना.आठल्ये यांना वैदिक वाङ्मय शास्त्र, संहिता, ज्योतिष यांचे सखोल ज्ञान होते. त्यांना चित्रकलेचीही आवड होती. त्यांनी शिक्षकी पेशा स्विकारला होता.
नोकरी निमित्त आठल्ये यांनी सातारा, मुंबई, बडोदा, मद्रास, कोची अशा अनेक ठिकाणी वास्तव्य केलं.
१८८६ मध्ये कोची मध्ये त्यांनी “केरळ-कोकीळ” नावाचे मासिक सुरू केले. सामान्य मराठी वाचकांना विविध विषयांची गोडी लागावी म्हणून यामध्ये ते अनेक विषयांवर लिखाण संपादित करीत असत. निष्ठूर व सडेतोड टिका हे या “केरळ-कोकीळ” मासिकाचे वैशिष्ट्य होते.
१८८० मध्ये मुंबई येथे “पुष्पगुच्छ” नावाचे मासिक काढले. यातही त्यांनी विविध विषयांवर संकिर्ण लेखन केले.
कोचीला भाषा शिक्षकाची नोकरी करीत असताना कृ.ना.आठल्ये यांनी “गीतापद्यमुक्ताहार” नावाने पुस्तक लिहून १८८४ मध्ये आपल्या ग्रंथ लेखनाचा प्रारंभ केला. यामधून त्यांनी काव्य, नाटके, कादंबऱ्या, तत्वज्ञान, फोटोग्राफी, आरोग्य असे विविध विषय हाताळले.
प्रासादिक रचना, आकर्षक व अलंकारीक भाषाशैली ही कृ.ना.आठल्ये यांच्या काव्यरचनेची वैशिष्ट्ये होती. यांच्या कवितेतील चित्रमयतेमुळे त्यांना श्रुंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडून “महाराष्ट्र भाषा चित्रमयूर” ही पदवी मिळाली होती.
प्रबोधनकार ठाकरे यांनी कृ.ना.आठल्ये यांना गुरूपदाचा मान दिला होता.
कृ.ना.आठल्ये यांनी विविध विषयांवर आधारीत, अनुवादीत, स्वैर अनुवादीत, भाषांतरीत, चरीत्रे अशा विविद प्रकारांमध्ये जवळपास ४० पुस्तके लिहिली.
एका नाटक्याचा पश्चात्ताप, तुफान, प्रमाण, माहेरचे मूळ, मुलीचा समाचार, सासरची पाठवणी अशा कृ.ना.आठल्ये यांच्या अनेक गाजलेल्या कविता आहेत.
कृ.ना.आठल्ये यांनी त्यांच्या “प्रमाण” या कवितेत सर्व गोष्टी या प्रमाणात असाव्यात, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा की ज्यामुळे नुकसान होऊ शकते, अशा स्वरूपाचा संदेश दिला आहे. आणि यासाठी त्यांनी आपल्या रोजच्या जीवनातील अनेक उदाहरणांचा दाखला दिलेला आहे. २० कडव्यांची ही रचना थोडी दीर्घ आहे पण आपण ती न कंटाळता वाचतो एवढी आशय संपन्नता आणि लय सौंदर्य या कवितेमध्ये आहे. चला तर मग, या कविताचा आनंद घेऊयात –
“प्रमाण”
अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।
अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।
अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।
अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।
अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।
अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का रुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।
अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।
अती आळशी वाचुनी प्रेतरूप, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजि आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।
अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।
अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो’ बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।
अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।
अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।
अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।
अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।
जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।
सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।
-कृ. ना. आठल्ये
◆◆◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/