युती सरकारच्या काळात मराठवाड्यावर अन्याय …! विकासाचा बॅकलॉग भरून काढणार-ना.चव्हाण

आसना पूलाच्या पुनःनिर्माणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेड, दि. 22 – युती सरकारने मागील पाच वर्षांत मराठवाड्याकडे दुर्लक्ष केल्याने मराठवाड्यात विकासाचा रथ थांबला. पण महाविकास आघाडीचे सरकार येताच मराठवाड्यात विकासकामांची गंगा वाहू लागली. नांदेड समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी सुमारे साडे सहा हजार कोटी रुपये महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत. तर दोन हजार 755 कोटी रुपयांची विविध विकासकामे नांदेड जिल्ह्यात सुरु झाली आहेत. नांदेडसह मराठवाड्यावर झालेला विकासाचा अन्याय दूर करण्यासाठी आपण विकासाचा बॅकलॉग भरून काढणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. 

नांदेड-अर्धापूर (पूर्व वळण रस्ता) आसना नदीवरील जूना पूल व पोचमार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

आसना पुलालगत असलेल्या महादेव पिंपळगाव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला पंजाब येथील गुरुद्ाराचे संतबाबा सुखदेवसिंंघजी, विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, जि.प. अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. मोहिनीताई विजय येवनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे,  उपमहापौर मसूद अहेमद खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

ना. अशोकराव चव्हाण म्हणाले की, युती सरकारने नांदेडसाठी काहीच केले नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना आसना नदीवर नवीन पुल उभारण्यात आला. स्ट्रक्टरल अ‍ॅडीट मुळे जूना पुलाचा वापर बंद करण्यात आला. युतीने सरकारने या पूलाची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. ते पाच वर्षांत युती सरकारला करता आलेले नाही. पण हे पुण्याचे काम आपल्याच हातून व्हायचे होते, आणि ते होत आहे.  नांदेडच्या वैभवात भर पाडणारा आसना नदीवरील जुन्या पुलाचे पुनःनिर्माण करता आले, याचे मला मोठे समाधान आहे, असेही ना. चव्हाण म्हणाले. 

टीका करण्याशिवाय भाजपचा उद्योग नाही
ना. चव्हाण म्हणाले की, भाजपने गेली पाच वर्षे केवळ घोषणा व टीका करण्यापलिकडे काहीच केलेले नाही. हे जनतेने चांगलेच ओळखले होते. म्हणून परत येणार, परत येणार म्हणून ते परत आलेच नाहीत, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता भाजपला लगावला. भाजपच्या या बाष्कळपणामुळेच त्यांची सत्ता जाऊन महााविकास आघाडीचा जन्म झाला.  विकासकामांचा मास्टर प्लान तयार असूनही कोरोनामुळे काहीच करता आले नाही.  सरकारचे उत्पन्न घटल्याने विकासकामे करता आली नाही. पण आता हळूहळू सर्व सुरळीत होत आहे. म्हणून नवीन वर्षाच्या सुरवातीलाच नांदेडमध्ये दोन हजार 755 कोटी रुपयांची कामे सुरु केली आहेत, असेही ना. चव्हाण यांनी सांगितले.

‘माझं नांदेड, सुंदर नांदेड’ करण्याचा ध्यास
नांदेड जिल्ह्याला समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असून त्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची निधी खेचून आणला आहे. नांदेड शहरात प्रवेश करण्यासाठी अनेक पर्यायी रस्ते असावेत, या प्रयत्नातून नांदेड शहराला अनेक रस्ते दिले जाणार आहेत. निळा ते नांदेड मार्गे बासर या शंभर किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच नांदेड शहरातील शिवमंदिर -तरोडा- शेलगाव -दाभड असा 11 किलोमीटरचा रस्ताही तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.  देगलूर नाका परिसरातील वाहतूकीतून मार्ग काढण्यासाठी बाफना टी पाईंट ते सूतगिरणी असा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. 

म्हणूनच ‘त्यांना’ बोलावले नाही
खा. चिखलीकरांचे नाव न घेता ‘म्हणूनच ‘त्यांना’ बोलावले नाही’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. जिथे जातील तिथे आपलीच पुंगी वाजवण्या ची ‘त्यांना’ सवयच आहे. कोणतेही काम (मग ते न केलेले सुद्धा) आपणच केल्याचे सांगत सुटतात. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत असतो. आपण कष्टाने आणलेल्या कामांचा ऐनवेळी ‘त्यांनी’ श्रेय लाटू नये, म्हणून ‘त्यांना’ बोलावले नाही, असे ना. चव्हाण यांनी सांगितले. त्यांना बोलावण्याची गरजच पडू नये यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी हा कार्यक्रम घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. अमरनाथ राजूरकर यावेळी म्हणाले की, अशोकराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच नांदेड शहरात विकासाची गंगा वाहत आहे. त्यांच्यामुळेच नांदेड शहराचे भाग्य उजळले आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात हजारो कोटींची विकासकामे सुरु आहेत. त्याचे श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही आ. राजूरकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, आ. बालाजीराव कल्याणकर यांचीही भाषणे झाली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी प्रास्ताविक करून जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती दिली.  केवळ सात दिवसा आसना पुलाचे डिझाईन तयार करणारे सा.बां.चे अभियंता एम.आय. शेख यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. युवक काँग्रेस व महादेव पिंपळगाव ग्रामपंचायतच्या वतीने ना. अशोकराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. 

प्रारंभी ना. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आसना जूना पुलाच्या नवनिर्माणाच्या कामाचे विधीवत भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर आसना नदीवरील बंधार्‍यावर जाऊन त्यांनी जलपूजन केले. 

कार्यक्रमाला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, बी.आर. कदम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अ‍ॅड.सचिन देशमुख, संतोष कपाटे, नगरसेविका कौशल्या पुरी, नगरसेविका करूणा कोकाटे, उमेश पवळे, पं.स. सभापती कांताताई सावंत, सां.बांचे मुख्य अभियंता उकीरडे, कोरे विठ्ठल पावडे, मनपा स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले,  उद्योजक बालाजीराव जाधव, जि.प. समाजकल्याण सभापती अ‍ॅड. रामराव नाईक, शिक्षण सभापती संजय बेळगे, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, माजी सभापती किशोर स्वामी, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, अमित तेहरा, माजी महापौर अब्दुल सत्तार, भोकरचे सभापती प्रकाश भोसीकर, विलास धबाले, बापूराव गजभारे, सुभाष कल्याणकर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *