कवी – कवी गिरीश
कविता – कृतज्ञता
शंकर केशव कानेकटर (कवी गिरीश).
जन्म – २८/१०/१८९३ (सातारा).
मृत्यू – ०४/१२/१९७३ (पुणे).
साताऱ्यात जन्मलेल्या कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजातून अध्यापन केले.
मुधोजी हायस्कूल फलटण येथे ते शाळेचे प्राचार्य होते.
त्यांनी त्यांच्या अनेक कविता फलटण मुक्कामी लिहिल्या.
कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.
नाटककार वसंत कानेकटर व मुंबई आकाशवाणी वरील अधिकारी व गायक मधुसूदन कानेकटर ही त्यांची मुले.
बालकवी आणि गोविंदाग्रज यांच्या कविता वाचून कवी गिरीश यांना काव्यरचनेची स्फुर्ती मिळाली. परंतू त्यांची काव्यरचना शैली ही स्वतंत्र आहे.
विविध वृत्तांचा वापर, घोटीव शब्दकळा व रेखीव रचना ही त्यांच्या कवितेची ठळक वैशिष्ट्ये होती.
“पोर खाटेवर मृत्युच्याच दारा…” ही गाजलेली कविता कवी गिरीश यांचीच आहे.
मासिक मनोरंजनात क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या “अभागी कमल” या सामाजिक खंडकाव्याने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. अर्वाचीन मराठी मधील सामाजिक खंडकाव्याचे ते आरंभस्थान म्हणता येईल. त्यानंतर कला १९२६ हे एक खंडात्मक दीर्घकाव्य, आंबराई हे ग्रामीण जीवनावरील खांडकाव्य, अनिकेत हे टेनिसच्या “ईनक-आर्डन” या काव्याचे भाषांतर ही दीर्घ काव्ये कवी गिरीश यांनी लिहिली.
कवी गिरीश यांनी स्फुट लेखन आणि टिकात्मक लेखनही केले.
कवी गिरीश यांचे कांचनगंगा, चंद्रलेखा, फलभार, बालगीत, सोनेरी चांदणे असे ५ कवितासंग्रह प्रकाशित झाले.
कवी यशवंत आणि कवी गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे “वीणाझंकार” व “यशो-गौरी” असे २ कवितासंग्रह प्रकाशित झाले.
कवी गिरीश यांनी माधव ज्युलियन यांचे “स्वप्नभुमी” हे चरित्र लिहिले. तसेच रेव्हरंड ना.वा.टिळक यांच्या “ख्रिस्तायन” या ग्रंथाचे संपादन केले.
शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल कवी गिरीश यांना १९५९ मध्ये राष्ट्रपतींचे पारितोषिक मिळाले.
कवी गिरीश यांच्या कविता सोप्या शब्दांमध्ये लय घेऊन येतात आणि आपल्या डोळ्यासमोर प्रसंगचित्र उभं करतात आणि हे त्यांच्या शब्दकळेचे सामर्थ्य आहे. “कृतज्ञता” या कवितेत कवी गिरीश यांनी कोकणातून आई वडीलांपासून शहरात दूर आलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये आजारी असलेल्या मुलाचे आणि त्याच्या भावभावनांचे यथोचित वर्णन केले आहे. आजाराने त्रस्त आणि आईच्या आठवणीत व्याकूळ असलेल्या त्या मुलाचे विरह आवेग सचित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात….
कृतज्ञता
पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरीबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !
ताप त्याने भरताच तडफडावे.
पाखराने एकले तडफडावे.
हळू गोंजारी सेविका दयाळू
डॉक्टराचे वच शंतवे कृपाळू.
कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न
कुठे डोळे लाउन बसे खीन्न
आणि डाक्टर येताच गोंजाराया
हाय! लागे तो घळघळा रडाया !
एक दिन तो व्याकुळ फार झला
आणि पुसिलेच त्याने डाक्टरला
”आता दादा, मरणार काय मी हो?”
तोच लागे अश्रुची धार वाहो!
ह्रदय हलूनी डोळ्यात उभे पाणी
तरी डाक्टरची वदे करूण वाणी
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजरून शांतावुन जाई.
रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास आता ताण
हळूच बोलावी बाळ डाक्टराला
तोही धर्मात्मा धाऊनीच आला.
आता बाळाला टोचणार तोच
वेड वासून पाखरू दीन चोच
“नको आता ! उपकार फार झाले!
तुम्ही मजला किती..गोड..वागविले!
भीत..दादा..मरणास मुळी..नाही!
तू..म्ही..आई..!!” बोलला पुढे नाही!
क्षणी डोळे फिरविले बालकाने
आणि पुशिली लोचने डाक्टराने
- शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/