नामांतराचे राजकारण

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यात यावे, यासाठी शिवसेना, भाजप आणि मनसे आक्रमक झाली आहे. औरंगाबादला जाणाऱ्या बसेसवरील बोर्डांवर संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला होता.

औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील राजकारण संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. परवा मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद येथील वैद्यकीय खात्यासंदर्भात निर्णय झाला. याची माहिती देताना CMO च्या ट्विटर हँडलवरून मंत्री अमित देशमुख यांच्यासह संभाजीनगर (औरंगाबाद) असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत माहिती व जनसंपर्क विभागाला बजावलं होतं. मात्र त्यानंतरही काल CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विधानात संभाजीनगर म्हटल्यानं CMOनं तोच शब्द ट्विटमध्ये वापरला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचा उल्लेख करत असल्यानं काँग्रेस नाराज आहे. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा असलेला विरोध कायम असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगरच म्हणणार असल्याचं ठणकावून सांगितलं. ‘मी नवीन काय केलंय? आतापर्यंत मी जे बोलत आलोय, बाळासाहेब जे बोलत आलेत, तेच मी बोलतोय, तेच करतोय आणि पुढेही तेच करणार. औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या सेक्युलर अजेंड्यात औरंगजेब बसत नाही,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा संभाजीनगर म्हटल्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘छत्रपती संभाजी महाराज आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र आमचा नामांतराला आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणाला विरोध आहे. महाविकास आघाडीनं किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे मतभेदांचे मुद्दे चर्चेतून सोडवू. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांनी पटवून देऊ,’ असं थोरात यांनी म्हटलं.

औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख केल्याचा मुद्दा बुधवारी माध्यमात झळकत असताना संध्याकाळी पुन्हा CMO च्या ट्विटर हॅडलवर त्याची पुनरावृत्ती करण्यात आली. यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे. त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या असं विधान त्यांनी केले. त्यामुळे शिवसेनेकडून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न झाला का? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.

गुरूवारी सकाळी माध्यमात या संदर्भात बातम्या आल्या तेव्हा काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी सावध प्रतिक्रिया देत ‘कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ’ असं सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
औरंगाबादचे संभाजीनगर या विषयावर चर्चा करण्याचे कारण नाही. त्यासाठीच्या आमच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यातच महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान. काही विषय असे असतात की त्यातून काही वेगळी वातावरण निर्मिती होऊ नये असे, आमचे धोरण आहे.  महाराज आमचे आराध्यदैवत आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

ठाण्यात ते आले असता काँग्रेसच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.  महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. आम्हाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. परंतु त्याबरोबर भाजपाची विचार सरणी आणि कार्यपद्धती मान्य नाही.त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत त्याचवेळी आम्ही महाविकास आघाडीत आहेत. आम्ही प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने चर्चा करुन निर्णय घेऊ आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेऊ असेही थोरात यांनी सांगितलं.   

माझ्याकडे तीन महत्त्वाचे पदे आहेत. त्यामुळे सहाजीकच एकाचकडे या तीन पदाचा कोणालाही हेवा वाटणारा आहे. पक्षश्रेष्ठींना वाटले तर ते यात विभाजन करु शकता. ते अनेकांना संधी देऊ शकता. त्यासाठी मी सुद्धा तयार आहे, की तरुण मंडळींना संधी द्या आणि नवे नेतृत्व घडवा,  असेही थोरात यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या खांदेपालटाविषयी बोलताना स्पष्ट केले. येथील शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील आदींनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी स्थानिक मुद्यांवर ओझरती चर्चा केली. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यांवर चर्चा झाली. दरम्यान या पुतळ्यासाठी ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात चर केल्याचे यावळी कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिले.

आम्हाला महापालिकेत सत्ता द्या पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे.

औरंगाबाद मनपाची सत्ता हातात द्या, सत्ता आल्यावर “संभाजीनगर” नाव देऊ असं वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील जी, आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चे नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

इतक्या वर्षांपासून सत्ता भोगुन ‘अहमदाबाद’ नाव बदलता येत नाही का?, असा सवाल मिटकरींनी भाजपला केला आहे. यांदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेबरोबर रेल्वेस्टेशनवरील नामफलकाचीही सुरक्षा करण्याची वेळ सध्या लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बलावर ओढावली. कारण शहराच्या नामकरणावरून गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण तापले आहे. यातूनच रेल्वेस्टेशनवरील औरंगाबाद नामफलकाला चक्‍क संरक्षण देण्यात येत आहे.

नामकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशनवर खबरदारी घेतली जात आहे. या फलकाला प्रत्येक पाळीत ३ ते ४ जवानांकडून पहारा देत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा यांनी दिली. यापूर्वी रेल्वेस्टेशनवरील नामफलकावरील नाव बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

औरंगाबाद महापालिकेत तिसऱ्यांदा शिवसेना सत्तेत आहे. १९८८ पासून नामांतराच्या मुद्यावर शिवसेना आग्रही आहे.
शिवसेना राज्याच्या सत्तेत तीन वेळा निवडून आली आहे. तरीही हे नामांतर झालेलं नाही. इकडच्या स्थानिक लोकांना शहराच्या नामांतरात फारसा रस नाही. याउलट शिवसेना औरंगाबाद महापालिकेत तिसऱ्यांदा सत्तेत असूनही वीज, पाणी आणि रस्ते याच मुद्द्यांवर निवडणूक लढते. औरंगाबाद शहराचा विकास तितकासा केलेला नाही. हिंदू-मुस्लीम मतांतराचा तेढ असल्यामुळे प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा शिवसेना समोर आणते आणि त्याचा फायदाही सेनेला होतो असं बर्‍याच वर्षांपासूनचं चित्र आहे. आताच्या निवडणुकीचं गणितही तेच असू शकतं.

गंगाधर ढवळे नांदेड

संपादकीय
०९.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *