आसमंत भेदणारा हंबरडा

महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत. शुक्रवारी रात्री १.३० वाजल्याच्या सुमारास रुग्णालयात ही आग लागली होती. यामध्ये १७ बालकांवर उपचार सुरू होता. आगीतून सात बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या दक्षता विभागातून धूर येत असल्याचं सर्वात अगोदर एका नर्सच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तिथे पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सात बालकांना सुखरूप बाहेर काढलं परंतु, १० बालकांना एव्हाना प्राण गमवावे लागले होते.

या बालकांना ज्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं तिथे सलग ऑक्सिजन पुरवठा गरजेचा आहे. या वॉर्डमध्ये आग विझवण्यासाठी उपकरणही उपलब्ध होते… रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला परंतु, तिथे धूर पसरला होता, असं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलं आहे. रुग्णालयात ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचा तपास अद्याप सुरू आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

ही आग शॉर्टसर्किटने लागली की इनक्युबेटर जळाल्यामुळे, याचा तपास केला जात आहे. विधानसभाध्यक्ष नाना पटोले, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींनी घटनास्थळाला भेट दिली. दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. अग्नितांडवात दहा अर्भकांचा मृत्यू झाला. त्यात उसगाव (ता. साकोली) येथील हिरकन्या हिरालाल भानारकर, मोहाडी तालुक्यातील जांबच्या प्रियांका जयंत बसेशंकर, टाकला येथील दुर्गा विशाल रहांगडाले, उसरला येथील सुकेशनी धर्मपाल आगरे, तुमसर तालुक्यातील सीतेसारा आलेसूर येथील कविता बारेलाल कुंभारे आणि भंडारा तालुक्यातील भोजापूरच्या गीता विश्वनाथ बेहरे व रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम, तसेच मोरगाव अर्जुनी (जि. गोंदिया)च्या सुषमा पंढरी भंडारी यांच्या पोटी जन्मलेल्या मुलींचा, तर श्रीनगर पहेला (ता. भंडारा) येथील योगिता विकेश धुळसे यांच्या मुलाचा समावेश आहे. याशिवाय बेवारस स्थितीत सापडलेल्या बाळाचा जीव गेला. दीक्षा दिनेश खंडाईत यांच्या दोन जुळ्या मुली, श्यामकला शेंडे, अंजना युवराज भोंडे, चेतना चाचेरे, करिश्मा कन्हैय्या मेश्राम व सोनू मनोज मारबते अशा सहा मातांच्या सात मुली मात्र वाचविण्यात रुग्णालयातील कर्मचारी व इतरांना यश आले.

[जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद खंडाते पहाटे ३ वाजताच रुग्णालयात दाखल झाले. आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल पहाटे साडेपाचला पोचले. घटनेची माहिती शहरात पसरताच सकाळी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यामुळे आधी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला व नंतर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांना पाचारण करण्यात आले.
n दहापैकी एक बाळ लाखांदूर येथे बेवारस स्थितीत आढळले असल्याने उरलेल्या नऊ बाळांचे मृतदेह शवविच्छेदन पूर्ण करून सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले व शासकीय वाहनाने पालकांना गावी रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी कदम यांनी घटनेचा प्राथमिक अहवाल सरकारकडे पाठविला आहे.

आग लागताच बाहेर थांबलेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांनी नवजात कक्षाकडे धाव घेतली. ओल्या बाळंतिणी व त्यांचे नातेवाईक डॉक्टर व नर्सेसमागे धावत होते. प्रशासनाने सगळ्या मातांना पोर्चमध्ये बसवून ठेवले. नेमके कुणाचे बाळ दगावले व कुणाचे वाचले, हे बराच वेळ स्पष्ट होत नव्हते. इनबॉर्न विभागातील मुले वाचल्याचे स्पष्ट झाले व दिलासा मिळाला पण आऊटबॉर्न विभागात आग व धूर अधिक होता. तिथली मुले संकटात असल्याचे समजताच झालेला मातांचा आक्रोश सुरू झाला.

या कक्षातून शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास अचानक धूर निघत असल्याचे रात्रपाळीवरील परिचारिकेच्या लक्षात आले.
दार उघडले असता कक्ष धुराने भरला होता. प्रशासनाने परिचारिकेचे नाव जाहीर करण्यास नकार दिला.
वैद्यकीय अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्यानंतर दरवाजा तोडून अंधारलेल्या कक्षातून टॉर्च व मोबाईलच्या प्रकाशात अर्भकांना बाहेर काढले. कक्षात कमी वजनाची, मुदतपूर्व जन्मलेली बालके उपचारार्थ ठेवली जातात. रुग्णालयाबाहेर प्रसूती झालेल्या मातांच्या दहा बाळांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या बाळांमध्ये आठ मुली व दोन मुले आहेत. रुग्णालयात जन्मलेल्या (इनबॉर्न) सात बाळांना वाचविण्यात यश आले. वाचविलेल्या सर्व सात मुली आहेत.

नवजात चिमुकल्यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कलेवर दुपारच्या वेळी गावात पोहोचले. निरागस चिमुकल्यांच्या निपचित देहाकडे पाहून कुटुंबातीलच नव्हे तर उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. चिमुकल्यांना अखेरचा निरोप द्यायची वेळ आली तेव्हा मातांचा ‘माझं बाळ मला द्या हो…’ हा आक्राेश हदय पिळवटून टाकणारा होता. कोणी कोणाचे सांत्वन करायचे, हा प्रश्न तेथे प्रत्येकालाच पडला होता.

माझी मुलगी मला आणून द्या हो…
मुलीला जन्म दिला पण तिला अजूनही मनाप्रमाणे कवेत घेतले नव्हते. माझी मुलगी मला आणून द्या हो… असा टाहो भंडारा तालुक्यातील पहेलाजवळील श्रीनगर येथील रहिवासी योगिता विवेक धुळसे यांनी फोडताच उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रकृती ठीक नसल्याने मुलीला एसएनसीयु कक्षात दाखल करण्यात आले होते. मुलगी मृत झाल्याचे वृत्त तिला देण्यात आले, तेव्हापासून तिच्या डोळ्यातून सारख्या धारा वाहत आहेत.

लग्नाला तीन वर्षे झाली, त्यानंतर कुंभरे दाम्पत्यांच्या घरी फुल उमलले. परंतु या जगात दाखल हाेताच अबाेल मुलीने जगाचा निराेप घेतला. पहिल्याच मुलीच्या मृत्यूने कुंभरे दाम्पत्यांवर दु:खाचा डाेंगर काेसळला. ‘आम्हाला आमची पाेरगी आणून द्या, असा हंबरडा तुमसर तालुक्यातील सिलेकसा (खापा) येथील आई कविता बारेलाल कुंभरे (२४) यांनी फोडला.

गीताने गमावले पहिलेच बाळ… वर्षभरापूर्वीच गीता आणि विश्वनाथचे लग्न झाले. वर्षभराच्या आत, म्हणजे १० नोव्हेंबर २०२० ला गीताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र जन्मतः तिचे वजन कमी असल्याने तिला एसएनसीयू वाॅर्डात हलविण्यात आले. भोजापुर येथील रहिवासी असलेल्या गीता विश्वनाथ बेहरे (२०) यांचे हे पहिलेच बाळ होते. ‘बाबूजी मेरी लडकी मुझे ला दो’ असे शब्द हुंदके देत ती बोलली, आणि गीता निःशब्द झाली.

कन्याजन्माचा आनंद दु:खात परावर्तित झाला. भंडारा तालुक्यातील रावणवाडी येथील रहिवासी वंदना मोहन सिडाम यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पहिली मुलगी असली तरी दुसरे अपत्यही अत्यंत आनंदात स्वीकारत त्याचा जल्लोष करण्याचे त्यांनी ठरविले होते. लोकमत प्रतिनिधीजवळ वंदनाने आक्रोश आणि आसवांना वाट मोकळी करून दिली. जन्मताच वजन कमी असल्याने मुलीला एसएनसीयु कक्षात हलविण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र या दुर्घटनेने वंदना यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. संपूर्ण कुटुंबच दु:खात बुडाले.

नऊ दिवसांच्या मुलीचा दोष होता तरी काय?
मोहाडी : नऊ दिवसांपूर्वीच तिला जन्म दिला. दिसायला अत्यंत सुंदर. अशक्त असल्याने तिला एसएनसीयू कक्षात दाखल केले होते. मात्र ती मला अशी पुन्हा परत मिळेल, असा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. नऊ दिवसांच्या मुलीचा काय दोष होता, असे बोलत दुर्गा विशाल रहांगडाले (टाकला, ता. मोहाडी) या मातेने आसवांना वाट मोकळी करून दिली.
स्वत:च्या जिवाची पर्वा न करता चार युवकांनी पहिल्या मजल्यावर शिडीच्या मदतीने चढत, ‘एसएनआयसीयू’ कक्षाचे दार तोडून ७ बालकांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. ही सर्व बालके सुखरूप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या युवकांमध्ये दोन रुग्णालयाचे सुरक्षारक्षक तर दोन खासगी रुग्णवाहिकेचे चालक आहेत. या युवकांनी दहा बालकांना वाचवू शकलो नाही, अशी खंतही व्यक्त केली.

रुग्णवाहिका चालक राजकुमार दहेकर व राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पहाटे सुरक्षारक्षक गौरव रेहपाडे व शिवम मडावी यांचा रुग्णालयात आग लागल्याचा फोन आला. आम्ही तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. पहिल्या मजल्यावरून धूर बाहेर येत होता. मागील भागातून शिडीने पहिल्या मजल्यावर पोहोचलो. कक्षाचे दार आतून बंद होते. ते तोडले. नाकातोंडात धूर गेला. तोंडाला रुमाल बांधून समोर गेलो. सर्वत्र अंधार होता. खिडक्यांच्या काचा फोडल्या. धूर कमी झाल्यावर बालकांना बाहेर काढणे सुरू केले. दोन हातांनी दोन बालकांना पकडून सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले.

आपल्याला बाळ होणार ही बाबच माझ्यासाठी लाखमोलाची होती. चिमुकलीला जन्म दिला. तिचा तो गोंडस चेहरा अजूनही डोळ्यासमोर आहे. अचानक ती मला सोडून निघून जाईल, अशी कल्पनाही करणे अशक्य. शनिवारचा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. दादा, माझी झोळी रिकामीच राहिली हो, असे भावोद्गार प्रियंका जयंत बसेशंकर या मातेने व्यक्त केले. मोहाडी तालुक्यातील जांब लोहारा येथील रहिवासी असलेल्या प्रियंकाला १० डिसेंबरला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. १२ डिसेंबरला प्रियंकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, मुलगी अशक्त असल्यामुळे तिला एसएनसीयू कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, तिच्या मृत्यूची वार्ता मिळाली, असे प्रियंकाचे पती जयंत बसेशंकर यांनी सांगितले. जयंत हा रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. एकत्र कुटुंबासोबत राहत असलेल्या जयंत आणि प्रियंका यांच्यावर जणू दुःखाचे डोंगरच कोसळले आहे.

ते जगात आले असले तरी त्यांना जगाची ओळख नव्हती. जग काय, जिने जन्माला घातले तिलाही त्यांनी निट बघितलं नव्हतं. तर, ९ महिने पोटात सांभाळणाऱ्या माऊलीनही त्याला-तिला नीट बघितलं नव्हतं. त्यामुळे त्याचा-तिचा गोड चेहरा जन्मदात्रीलाही व्यवस्थीत आठवत नसावा. काजव्याप्रमाणे तो निरागस जीव काही वेळ लुकलुकला अन् आगीत लुप्तही झाला. नियतीने १० जन्मदात्यांवर सूड उगवला तर प्रशासनाने पुढचे पाउल टाकले. डीएनए टेस्ट केलीच नाही अन् धगधगत्या आगीतून अलगद निखारा काढावा, त्याप्रमाणे होरपळलेल्या ‘त्या’ मृत जीवांची तत्परतेने ओळख पटविण्याचा चमत्कार करून भंडारा रुग्णालयाच्या प्रशासनाने मृत बालकांचे जन्मदाते, त्यांचे आप्तस्वकियच नव्हे तर उभ्या जगाचीही रडकी बोळवण केली.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात केअर युनिटच्या अतिदक्षता विभागात शनिवारी पहाटे २ च्या सुमारास आग लागली. ज्यांना निट हालचालही करता येत नाही, अशा १० निष्पाप, निरागस जीवांना या आगीने भक्ष्य केले. ही आग कशी लागली, कुणाच्या निष्काळजीपणामुळे लागली, हे शोधण्याच्या घोषणा अन् प्रयत्न सुरू झाले आहे. त्यामुळे अग्नीज्वाळा आता काहींच्या नोकऱ्यांना झळ पोहचवू शकतात. ते ध्यानात घेत आपला पदर जळू नये म्हणून संबंधित मंडळी आपापल्या अंगावरचे घोंगडे झटकण्याचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळेच की काय संबंधित कोडग्यांनी पीडितांच्या भाव-भावनांनाही रुग्णालयातील आगीच्या हवाली करण्याची निर्लज्ज धावपळ चालविली आहे. ज्या आगीने लोखंडी पट्टयांना पिघळवले त्या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या कोवळ्या बालकांची अवस्था काय झाली असेल, हे सहज लक्षात यावे. या बालकांची नाजूक नितळ त्वचा त्यांचा चेहरा खरेच शाबूत राहिला असेल का, या प्रश्नाचे उत्तर अपवादानाचे कुणाकडून ‘हो’ मिळेल. १० पैकी एक दोन बालकांच्या बाबतीत तसे झालेही असेल. मात्र, १० पैकी ९ बालकांचे (एक बिचारा बेवारस म्हणून सापडला होता अन् त्याची प्रकृती चांगली नसल्याने त्याला येथे दाखल केला होता.) कलेवर संबंधित डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आग विझल्यानंतर लगेच पीडित परिवारांच्या पदरात घातले. हे तुमचेच आहे, असे म्हणत त्या शोकविव्हळ परिवारांना स्मशानाच्या वाटेने लावले. बाळ जन्माला आल्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याची आैटघटकेची भावना अन् नंतर काळीज चिरणारे दुख पदरात घेऊन पदरात पडलेल्या मृत जीवाला घेऊन निघालेल्या पीडितांना हे बाळ आपलेच की दुसऱ्याचे ते विचारण्याचे भान असण्याचे कारण नाही. मात्र, ते बाळ त्यांचेच हे संबंधित डॉक्टर, पारिचारिका आणि ईतर कर्मचाऱ्यांनी एवढ्या लवकर कसे काय ठरवले, हा लाखमोलाचा प्रश्न ठरतो.

आगीने होरपळलेल्या आणि धुराने काळवंडलेल्या मृत बालकांची ओळख तेथील संबंधितांनी झटपट कशी पटवली, हा सामान्य नागरिक नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनाही खटकणारा प्रश्न आहे. प्रसृती तज्ज्ञ, नवजात शिशू तज्ज्ञ आणि त्वचा तज्ज्ञांच्या मते आईने जन्माला घातल्यानंतर पहिले दोन आठवडे शिशू सगळ्यापासूनच बेखबर असतो. चार आठवड्यापासून तो प्रतिसाद देणे सुरू करतो. हसनं, आईकडे बघणं , टकटकी लावणं, आकार घेण त्याच आपल सुरू होते. ६ आठवड्यांपर्यंत त्याची त्वचा एवढी कोमल असते की गरम वाफेचाही त्याला धोका होऊ शकतो. अशात रुग्णालयाच्या आगीत ज्या १० नवजात बालकांचा बळी गेला, त्यांची आगीनंतर लगेच ओळख पटणे अशक्यच आहे. या संदर्भात बोलताना सुप्रसिद्ध जेनेटिसिस्ट डॉ. विनय टुले म्हणाले की, एक नव्हे १० बालकांचे प्राण गेले. घटनास्थळी गोंधळ उडाला असेल यात शंकाच नाही. त्यामुळे मृतांची अदलाबदली होण्याचा धोका आहे. अशात मातापित्यांच्या हवाली मृतदेह करण्यापूर्वी डीएनए टेस्ट करायला हवी होती.

प्रत्यक्षदर्शींच्या मते पहाटे दोनच्या वेळी जेव्हा आग लागली तेव्हा सर्वच जण साखर झोपेत होते. थंडीचे दिवस असल्याने आगीकडे बराच वेळ कुणाचे लक्ष गेले नाही. नंतर मात्र एकच धावपळ उडाली. निरागस बालक असलेल्या आणि आग लागलेल्या कक्षासमोर खुपच गोंधळ आरडाओरड सुरू झाली होती. आग विझवल्यानंतर घाईगडबडीतच सर्व बालकांना एसएनसीयूतून बाहेर काढण्यात आले. १० जणांचा मृत्यू झाला होता. हादरलेले, गोंधळलेले भंडारा प्रशासन निस्तरण्यासाठी कामी लागले होते. मृत बालकांचे काही नाव नव्हतेच. गळालेल्या त्वचेला साफ करून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पीडितांना हाक दिली अन् तो निष्प्राण जीव त्यांच्या पदरात घातला. संबंधित प्रशासनाने या घिसाडघाईतून काय साध्य करण्याचा किंवा दडवण्याचा प्रयत्न केला, हे काही दिवसांनी पुढे येईल. पण मृताची अदलाबदल झाली असेल तर…?

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात लागलेल्या अचानक आगीत 17 नवजात शिशूपैकी 7 शिशूंना वैद्यकीय चमू व अग्निशमन विभागाच्या चमूंनी तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. परंतु या दुर्घटनेत 10 शिशू मृत पावले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात (एसएनसीयु) येथे रात्रो उशिरा आग लागली. भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी व पोलीस पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच ती इतरत्र पसरु नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग पूर्णत: विझविण्यात आलेली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात 17 नवजात शिशू दाखल झाले. त्यापैकी 10 शिशू मृत झाले असून त्यांच्या मातांची नावे याप्रमाणे, 1 – आईचे नाव – हिरकन्या हिरालाल भानारकर (मृतबालक-स्त्री) रा. उसगाव (साकोली), 2 – आईचे नाव – प्रियंका जयंत बसेशंकर (मृतबालक-स्त्री) रा. जांब (मोहाडी), 3 – आईचे नाव – योगिता विकेश धुळसे (मृतबालक-पुरुष) रा. श्रीनगर पहेला (भंडारा), 4- आईचे नाव – सुषमा पंढरी भंडारी (मृतबालक-स्त्री) रा. मोरगाव अर्जुनी (गोंदिया), 5 – आईचे नाव – गिता विश्वनाथ बेहरे (मृतबालक-स्त्री) रा. भोजापूर (भंडारा), 6 – आईचे नाव- दुर्गा विशाल रहांगडाले (मृतबालक-स्त्री) रा. टाकला (मोहाडी), 7 – आईचे नाव – सुकेशनी धर्मपाल आगरे (मृतबालक-स्त्री) रा. उसरला (मोहाडी), 8 – आईचे नाव – कविता बारेलाल कुंभारे (मृतबालक-स्त्री) रा. सितेसारा आलेसूर (तुमसर), 10 – आईचे नाव – वंदना मोहन सिडाम (मृतबालक-स्त्री) रा.रावणवाडी (भंडारा), 10 – अज्ञात (मृतबालक-पुरुष).

संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये एका जुळ्यांचा समावेश आहे. यामध्ये 1 – आईचे नाव – शामकला शेंडे (बालक-स्त्री), 2 – आईचे नाव – दीक्षा दिनेश खंडाते (बालक – स्त्री (जुळे), 3 – आईचे नाव – अंजना युवराज भोंडे (बालक-स्त्री), 4 – आईचे नाव – चेतना चाचेरे (बालक-स्त्री), 5 – आईचे नाव – करीश्मा कन्हैया मेश्राम (बालक-स्त्री), 6 – आईचे नाव – सोनू मनोज मारबते (बालक-स्त्री). बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीसंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सादर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्दैवी घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. ‘महाराष्ट्राच्या भंडाऱ्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली जिथे आपण अनमोल निरागस बालकांना गमावलं. शोकाकूळ संतप्त कुटुंबासोबत माझी सहानुभूती आहे. जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी आशा करतो’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
१०.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *