युगनिर्मात्या धुरंधर राजमाता : जिजाऊ

४२३ वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं १२ जानेवारी १५९८ रोजी जिजाऊंचा जन्म झाला. लखुजी जाधव आणि म्हाळसाई यांच्या पोटी हे दिव्य कन्यारत्न जन्माला आलं. लखुजी राजे यांचं राजघराणं होतं. वैभवसंपन्न राजवाडा, नोकरचाकरांची दीमत, घोड्यांचा पागा, हत्तीखाने, शिपायांच्या चित्तथरारक कवायती, विविध शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके, संगीतशाळा, नगारखाना यांच्या सान्निध्यात जिजाऊंचं बालपण गेलं. त्याचबरोबर राजवाड्यात येणार्‍या मुत्सद्दी व पराक्रमी लोकांची वर्दळ, लढायांचे डावपेच, जनतेची गार्‍हाणी, यशापयशाची कारणे, न्यायनिवाडे यांच्या उपस्थितीत जिजाऊच्या मनावर योग्य संस्कार होत राहिले. त्यातूनच एका युगनायिकेचं व्यक्तीमत्त्व खुलत होतं. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे जिजाऊंच्या कानावर पडत होते. पारतंत्र्याची जाणीव, रयतेचे हाल, लाचारी आणि फंदफितुरी या गोष्टी मनात घर करीत होत्या. त्या सातत्यानं तिरस्करणीय ठरत होत्या.

उमलत्या वयातच जिजाऊंच्या हट्टापायी लखुजीराजे यांनी राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. त्या आता एक योद्धा म्हणून तयार झाल्या. रणांगणापेक्षा जिवनातच आलेल्या अनेक संकटांचा सामना करण्यास त्या सज्ज झाल्या.

शहाजी-जिजाऊ विवाह झाल्यानंतर जिजाऊ समोर अनेक संकटं निर्माण झाली. विवाहापूर्वीच सासरे मालोजी भोसले इंदापूरच्या लढाईत मारले गेले तर विवाहानंतर खंडागळे यांच्या पिसाळलेल्या हत्ती प्रकरणावरुन भोसले-जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाले. संभाजी-दत्ताजी मारल्या तर गेलेच पण कालांतराने लखुजी जाधवांचा कपटाने खून करण्यात आला. सासरी जहागिरीच्या राज्यात सर्व काही आलबेल नव्हते. मराठी सरदार आपापसांत लढत होते. ते आदीलशाही आणि निजामशाहीच्या पदरी होते. या सुलतानांमध्ये नेहमीच लढाया चालत. त्यातून रयतेचे हालच होत. शेतकरी सुखी नव्हता, स्त्रियांची अब्रू तर वेशीलाच टांगली होती. लहान बालकेही सुरक्षित नव्हती. दिवसेंदिवस आक्रमणाच्या आणि लुटीच्या कहाण्या कानावर येत. अत्यंत अराजकाच्या परिस्थितीचा सामना हा मराठी मुलुख करीत होता. दिवसेंदिवस हा मुलुख परकीय आक्रमणांनी उद्धवस्त होत होता. देवळे पाडली जात होती, मुर्ती तोडल्या जात होत्या. सामान्य जनता तिरस्करणीय गुलामीचं जीणं जगत होती. तो काळ फार धामधुमीचा होता. अशातच १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंच्या स्वप्नातल्या स्वराज्याचा भारत जन्माला आला. जिजाऊंचे आयुष्य कायमचे पालटून गेले. शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीय शके १५५१ ला जन्माला आलेल्या शिवबाकडे जिजाऊसकट इतिहासाने आशेचा किरण म्हणून लकाकत्या डोळ्यांनी पाहिले.


लहानपणापासूनच जिजाऊंनी लहानग्या शिवबाच्या मनात स्वराज्याची संकल्पना पेरली. तलवार पकडणे, घोड्यावर बसणे, गडकोट किल्ले पायदळी तुडविणे यांचे शिक्षणच दिले. याद्वारे बाल शिवाजीत प्रचंड आत्मविश्‍वास जन्माला घालण्याची जिजाऊंची योजना होती. मनात पारतंत्र्याची चीड निर्माण करतानाच राजनितीही शिकविली. स्वराज्य निर्माण करण्याची शिवाजीची धारणा केवळ जिजाऊंच्या योग्य संस्कारामुळेच होती हे मान्यच करावे लागेल. कारण शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वावर प्रभाव टाकणारी त्यांची पहिली गुरु म्हणजे खुद्द आईसाहेब जिजामाताच होत्या. त्यांच्यात स्वाभीमान, महत्त्वाकांक्षा, प्रजाहित दक्षता, न्यायप्रियता आदी गुण मातोश्रीनींच ठासून भरलेले होते. त्या जातपात मानीत नव्हत्या. शिवाजीचे सारे सवंगडी हे हलक्याच जातीचे होते. शिवाजीने बरीच हालकी पोरे जमविली या वाक्यावरुन हे स्पष्ट होते. अस्पृश्य समाजाच्या कर्तृत्ववान योद्ध्यांच्या हातात प्रथमच तलवार दिली गेली. ते स्वराज्यासाठी लढू लागले. तसेच अस्पृश्य जातीतील महार, मांग, चांभार, रामोशी, मेहत्तर या जातींनाही त्यांच्या गुणवत्तेनुसार स्वराज्य उभारणीच्या कामात सामावून घेण्यात आले. मराठ्यांचे सैन्य मुख्यतः कुणबी, सुतार, वाणी आदी हीन जातींनी बनलेले होते. शिवरायांच्या या राजकीय धोरणामुळे जातीभेदावर आघात झालेला होता. जिजाऊंनी हा मुत्सद्दीपणा शिवाजीत मोठ्या कौशल्याने भरलेला होता.

इतिहासाच्या पुस्तकाने रामायण, महाभारताच्या गोष्टी जिजाऊंनी सांगितल्या असे शिकवले पण शिवाजीने त्यानुसार काहीच केले नाही. धर्मावर पहिलाच वार अफजल खानाच्या भेटीत केला होता. शिवाजी स्त्रीवादी विचारांचा राजा होता. ज्या काळात स्त्री ही केवळ एक उपभोग्य वस्तु आहे असे समजून अनेक राजांनी आणि सम्राटांनी जनानखाने तयार केलेले होते. स्त्रियांचा गुलाम म्हणून सर्रास वापर चालत होता. यापैकी काहीच शिवाजीने केले नाही. उलट स्त्रियांचा सन्मान केला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे उदाहरण सर्वश्रृत आहे. स्त्रियांकडे डोळा उचलून हीन पाहण्याची सक्त ताकीद मराठा सैनिकांना देण्यात आलेली होती. कोणत्याही स्त्रीला जर उपद्रव दिला, अब्रू घेतली तर अत्यंत कडक शिक्षा करण्यात येत असे. शिवाजीचे स्त्री विषयक उदारमतवादी दृष्टीकोन जिजाऊकडूनच घेतले होते. शिवाजींनाही आठ राण्या होत्या. ही बाब त्या काळात फारशी गंभीर समजली जात नव्हती. पण विरोध मोडून काढणे आणि नातेसंबंध जोडून घेणे या कारणासाठीची ती योजना होती. स्वराज्य स्थापना आणि स्वराज्य वृद्धीच्या काळात स्वकीयांचा बंदोबस्त करण्यापेक्षा सहभाग असणे गरजेचे होते. जे विरोधक आहेत त्यांना तर स्वराज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याची किमया शिवाजीमार्फत जिजाऊंनी लिलया साधली होती.

स्वराज्यावर अनेक संकटे आली. पण सर्वात मोठे संकट अफजलखानाच्या मोहीमेचे होते. शिवाजीला ठार मारण्याचा विडाच त्याने उचलला होता. हा प्रसंग असो की, आग्रा भेटीला जाण्याचा प्रसंग असो त्यांचा सल्ला असा होता- सिऊबा बुद्धीने काम करणे, अफजल खानास मारोनी संभाजीचे ऊसने घेणे. सिऊबा जाणे, राजकारण फत्ते करुन येणे. अफजलखानाला ठार मारल्यानंतर प्रतापगडाच्या एका बुरजाखाली त्याला दफन करण्यात आले. जिजाऊंच्या या वागण्यावरुन मानवतेचा सन्मान करण्याची वृत्ती दिसून येते. ही वृत्तीही शिवाजीने जिजाऊंकडून घेतलेली दिसते. त्यानंतर सिद्दी जौहरच्या रुपाने स्वराज्यावर आणखी एक मोठे संकट आले होते. त्याच्या वेढ्यात शिवाजी महाराज चार महिन्यांपेक्षा अधिक काळ अडकून पडले होते. अशावेळी वेढा फोडण्यासाठी प्रत्यक्षपणे रणांगणात जाऊन तलवार चालविण्याची त्यांच्यात वीरश्री संचारली होती. ही वीरश्री आणि करारीपणा सगळ्यांनाच दिसला. तसेच स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्‍या अनेक मावळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यांचे नीतीधैर्य खचून जाऊ नये म्हणून त्या सतत प्रोत्साहीत करीत राहिल्या.

शहाजीच्या मृत्यूनंतर त्या सती गेल्या नाहीत. हा त्याकाळी धर्माला दुसरा हादरा होता. स्वराज्य हे जिजाऊंच्या स्फुर्तीवरुन आणि प्रेरणेमुळेच उभे आहे हे शिवाजीला चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे त्या काळात धर्मरुढी, परंपरांना न जुमानता सती न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. नेतोजी पालकरने धर्म बदलला होता. पण एकदा धर्म बदलल्यानंतर पुन्हा स्वधर्मात यायला बंदी होती. त्यालाही न जुमानता नेतोजी पालकरांचे शुद्धीकरण करुन परत स्वधर्मात घेतले होते. यामागे जिजाऊंचाच निर्णय होता. त्या धाडस, सहनशीलता, कल्पकता, समाजभान, परोपकारी वृत्ती ह्या गुणांचा समुच्चय होत्या. धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्‍वास त्यांच्या अंगी होते. त्या अत्यंत न्यायप्रिय होत्या. दादोजी कोंडदेव आणि खुद्द शिवाजीने दिलेले न्याय निवाडे जिजाऊंनी ऐनवेळी फिरवले होते. जिजाऊ ह्या खरोखरच आदर्शमाता होत्या. योग्य संस्कार देण्याचे आणि आपल्या मुलांना घडविण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असते. याच आईने शिवाजी दुसर्‍याच्या पोटी जन्माला यावा ही भूमिका घेऊ नये. पण हा शिवाजी जन्माला येण्यापूर्वी जिजाऊ जन्माला आली पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय म्हणून या युगनिर्मितीचा वारसा सांगणार्‍यांनी त्यांच्या अंगी असलेला एकतरी गुण अंगीकारायला हवा. आपल्याच जातीची अस्मिता टोकदार बनविण्यापेक्षा जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एका नव्या युगाचा भारत घडवू या! अशा धुरंधर युगनिर्मात्या राष्ट्रमातेस मानाचा मुजरा!!

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१२.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *