यशवंत मनोहरांनी नाकारलेल्या पुरस्कारामागील कवित्व

कार्यक्रमस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून प्रसिद्ध कवी डॉ.यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला. या कार्यक्रमात सहभागी होऊन पुरस्कार स्विकारणार असे संमतीपत्र त्यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी त्यांनी पुरस्कार नाकारल्याचा संदेश आयोजकांना पाठविला. यामुळे साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विदर्भ साहित्य संघातर्फे मागील महिन्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. डॉ.मनोहर यांना जीवनव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते मात्र कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये अशी मागणी डॉ.मनोहर यांनी केली होती. परंपरेप्रमाणे साहित्य संघातर्फे सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या डॉ.मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी येऊन पुरस्कार घेण्यासच नकार दिला. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पत्र डॉ.मनोहर यांनी साहित्य संघाला पाठविले.

विदर्भ साहित्य संघाचा सन्मानाचा समजला जाणारा जीवनव्रती पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध कवी आणि आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला. ज्यांनी आयुष्यभर साहित्याची सेवा करून मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र मुद्रा उमटविली अशा विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकाला विदर्भ साहित्य संघातर्फे दर दोन वर्षांनी कै. ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 

रोख पंचवीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी या पुरस्कारासाठी विदर्भ साहित्य संघाने डॉ. यशवंत मनोहर यांची निवड केली. डॉ. यशवंत मनोहर जन्माने काटोल तालुक्यातील येरला गावातील असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्याआधी त्यांनी मराठवाड्यातील पैठण आणि नागपूर येथील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्था (आधीचे मॉरिस कॉलेज) येथे अध्यापन केले. 

केशवसुत आणि मर्ढेकर यांच्या कवितांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आचार्य पदवी प्राप्त केली. मराठी साहित्यविश्वात डॉ. यशवंत मनोहर आंबेडकरी साहित्य प्रवाहातील पहिल्या पिढीचे महत्त्वाचे कवी आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. १९७८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘उत्थानगुंफा’ कवितासंग्रहाने मराठी काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे म्हणून कवी त्यांना लौकिक प्राप्त झाला. 

केवळ आंबेडकरी कवितेतच नव्हे तर मराठी काव्यक्षेत्रात या कवितेने आपली वेगळी शैली आणि अभिव्यक्ती प्रदान करीत मराठीत नव्याने लिहू लागलेल्या आंबेडकरी कवींना वेगळी दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकरांपासून अनेक महनीयांनी या कवितेची पाठराखण केली. उत्थानगुंफासोबतच त्यांचे युगांतर, मूर्तिभंजन, प्रतीक्षायन, जीवनायन, स्वप्नसंहिता यांसारखे सुमारे तेरा कवितासंग्रह आणि कादंबरी, ललितनिबंध, समीक्षा, वैचारिक संपादन अशी विविध स्वरूपातील सुमारे पंचाहत्तरच्या वर पुस्तके प्रकाशित आहेत.

त्यांच्या काही पुस्तकांचा भारतीय कन्नड, हिंदी, गुजराती, इंग्रजी इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. त्याशिवाय त्यांच्या साहित्याची चर्चा करणारी, त्यांची साक्षेपी समीक्षा करणारी किमान दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सदतीस विविधप्रवाही साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

त्यांच्या लेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वाङ्मय पुरस्कारासोबतच महाराष्ट्र फाउंडेशन, सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मारवाडी फाउंडेशन पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, सुगावा पुरस्कार इत्यादी सुमारे सत्तावीस पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सूर्यकुळाशी नाते सांगणारी कविता म्हणून यशवंत मनोहर यांच्या कवितेचा गौरव केला जातो. त्यांच्या एकूण समृध्द वाङ् मय प्रवासाचा आणि मराठी साहित्यविश्वाला दिलेल्या योगदानाचा विचार करून विदर्भ साहित्य संघाने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचे जाहीर केले.

विदर्भ साहित्य संघातर्फे दिला जाणारा कै. माडखोलकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी कविवर्य ग्रेस, महेश एलकुंचवार, म. म. देशपांडे, सुरेश भट, मारुती चितमपल्ली, प्राचार्य राम शेवाळकर, वसंत आबाजी डहाके, आशा बगे आणि डॉ. वि. स. जोग या मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे. दिनांक १४ जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापनदिनी डॉ. यशवंत मनोहर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे विदर्भ साहित्य संघाने कळविले होते.

विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा मानाचा ‘जीवनव्रती’ पुरस्कार प्रसिद्ध कवी व विचारवंत यशवंत मनोहर यांनी ऐन वेळी नाकारला. पुरस्कार वितरण समारंभात सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये. त्याऐवजी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा ताराबाई शिंदे यांची प्रतिमा ठेवावी, अशी विनंती त्यांनी विदर्भ साहित्य संघाला केली होती; परंतु विदर्भ साहित्य संघाने या विनंतीला प्रतिसाद न दिल्याने त्यांनी हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला.

विदर्भ साहित्य संघातर्फे मराठी साहित्यविश्वात आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या विदर्भातील साहित्यिकाला कै. ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या नावाने ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार  प्रसिद्ध विचारवंत व आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर यांना याआधीच जाहीर झाला होता. आज १४ जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार यशवंत मनोहर यांना प्रदान करण्यात येणार होता; परंतु या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणार असल्याचे कळल्यावर त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्याला संदेश पाठवून सरस्वतीची प्रतिमा न ठेवण्याची विनंती केली. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषणसत्ताकाची प्रतीके मी आयुष्यभर नाकारली आहेत. मग, आता या प्रतीकांची प्रतिष्ठा मी का वाढवू, असा सवालही त्यांनी या संदेशात उपस्थित केला; परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ होत आली तरी विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या या संदेशाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ साहित्य संघाला कळवला. त्यांच्या या निर्णयाने साहित्यविश्वात मोठी खळबळ उडाली. इतर सत्कारमूर्तीबरोबर मंचावर यशवंत मनोहर न दिसल्याने त्यांच्याबाबत विचारणा सुरू झाली. खरे कारण कळल्यावर कार्यक्रमस्थळाचा नूरच बदलला. यशवंत मनोहरांच्या नकाराची छाया कार्यक्रमस्थळी स्पष्ट जाणवायला लागली. विदर्भ साहित्य संघाने मात्र याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या संदर्भात मनोहर म्हणतात….मी धर्म मानत नाही, म्हणूनच लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझा रागही करतात; पण म्हणून मी कधीही माझी भूमिका बदलली नाही. भारतात इंग्रज येईपर्यंत सरस्वती पूजलीच जात होती. मग, या देशातील शूद्रातिशूद्र, स्त्रिया का अज्ञानी राहिल्या? माझा सरस्वतीशी काय संबंध? अशा प्रतिमा या शोषणसत्ताकाची प्रतीके आहेत. कार्यक्रम जर साहित्यविषयक असेल तर त्यात कुसुमाग्रज, मुक्तिबोध, इंदिरा संतांची प्रतिमा ठेवायला हवी. माझी हीच भूमिका मी चार दिवसांआधी विदर्भ साहित्य संघाला कळवली होती; परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी हा पुरस्कार नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतला. बाकी या पुरस्काराविषयी माझ्या मनात आदरच आहे. पुरस्काराला विरोध असण्याचे काहीच कारण नाही.

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी यावर मौन सोडले आणि म्हणाले की, सरस्वती आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. ज्या सभागृहात कार्यक्रम झाला त्या सभागृहाचे नावच रंगशारदा आहे. हे शारदेचे मंदिर आहे आणि सरस्वती आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे सरस्वतीची प्रतिमा हटविण्याचा प्रश्नच नाही. यशवंत मनोहर यांना ते पटत नसेल तर त्यांचा मताचा मी आदर करतो. दरवर्षी आम्ही ज्या पद्धतीने कार्यक्रम करतो त्याच पद्धतीने तो यंदाही झाला. हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी यशवंत मनोहर यांनी पुरस्कार स्वीकारण्याचे मान्य केले होते. आता मात्र वैयक्तिक कारणामुळे येऊ शकत नाही, असा त्यांचा निरोप आला.

कार्यक्रमस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून प्रसिद्ध कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला. कार्यक्रमात सहभागी होऊन पुरस्कार स्वीकारणार, असे संमतीपत्र  त्यांनी आधी दिले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी पुरस्कार नाकारत असल्याचा संदेश आयोजकांना पाठविला. 

परंपरेप्रमाणे साहित्य संघातर्फे सरस्वतीची प्रतिमा ठेवली. यामुळे नाराज डॉ. मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी येऊन पुरस्कार घेण्यासच नकार दिला. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल, असं वाटलं होतं.  हा साहित्यिक कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून मी हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पत्र डॉ. मनोहर यांनी साहित्य संघाला पाठविले. तर डॉ. यशवंत मनोहर यांनी त्यांचे तत्त्व जपावे. हा सार्वजनिक सोहळा आहे आणि सरस्वती प्रतिमा ठेवणे ही आमची परंपरा आहे. ती परंपरा कुणामुळे खंडित होणार नसल्याचे संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी म्हटले.

प्रसिद्ध पत्रकार अरुण विश्वंभर लिहितात, ‘यशवंत’ भूमिकेमुळे ‘ते’ साहित्यिक कोड्यात सापडले..! काय गंमत आहे. डॉ. यशवंत मनोहर सरांच्या भूमिकेमुळे भले भले प्रस्थापित साहित्यिक कोड्यात पडलेत. यशवंत मनोहर सरांच्या बाजूने बोलावे तर ‘ते’ काय म्हणतील आणि विरोधात बोलावे तर ‘हे”काय म्हणतील अशी त्यांची अवस्था झालीय. त्यामुळे ‘कोंडीत’ सापडलेल्या त्या भल्या भल्या साहित्यिकांना काय म्हणावे हा या क्षणाचा यक्ष प्रश्न आहे.

खरंतर, मराठी साहित्य वर्तुळात मोजता यायचे नाहीत इतके साहित्यिक आहेत. त्यात प्रस्थापित किती, नवोदित किती हे इथे अजिबात महत्वाचे नाही. यातले भूमिका घेणारे साहित्यिक किती आहेत, हे इथे अधिक महत्वाचे आहे. कारण शांत बसल्याने, राहिल्याने तुम्ही नेमके कोणाच्या बाजुचे आहात, तुमच्या जगण्याचा आणि जीवनाचा ‘सरनामा’ विज्ञानवादी आहे की अंधश्रध्दावादी हे काहीच कळत नाही. त्यामुळे बोलते झाले पाहिजे.

अंधश्रध्देला खतपाणी घालून, धर्माध विचारप्रवाहाला प्रोत्साहन देऊन, सांस्कृतिक गुलामी लादून घेऊन आपण शोषण व्यवस्थेला बळकटी तर देत नाही आहोत ना याचा विचार यशवंत मनोहर सरांच्या या भूमिकेने तमाम साहित्यिकांना कराययला लावला आहे. अर्थातच किती साहित्यिक यापध्दतीने विचार करताहेत आणि भूमिका घेताहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यथावकाश पाहूच. परंतु जे साहित्यिक, विचारवंत, कार्यकर्ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतात आणि मुख्यतः जे ‘कल्चरली करेक्ट’ आहेत असे मात्र डॉ. यशवंत मनोहर यांच्या भूमिकेला समर्थन दिल्याशिवाय राहणार नाहीत.

अरुणा सबाने यांच्या फेसबुक वाॅलवर त्यांनी लिहिले, नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाने यंदाचा जीवनव्रती पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर सरांना घोषित केला होता. तो त्यांना आज सायंकाळच्या समारंभात प्रदान केला जाणार होता. त्या पूर्वी आम्ही सरांचे अभिनंदन केले होते. खूप आनंद झाला होता आमच्या सारख्या परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना.

पण मनोहर सरांनी तो पुरस्कार नाकारल्याचे समजले आणि धक्का बसला. पण त्यांनी साहित्य संघाला जे कळवले ते इतके तार्किक आणि विवेकवादी भूमिकेला धरून आहे त्यांची भूमिका योग्य वाटते. जी तत्त्वे उराशी घेऊन त्यांनी आयुष्यभर साहित्यक्षेत्रात संघर्ष केला, त्या तत्वांशी प्रतारणा कशी करायची असा त्यांना पडलेला प्रश्न योग्यच वाटतो. आम्झी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. साहित्य संस्था ही सार्वजनिक जागा असते, तिथे एका धर्माची प्रतीके असू नयेत ही भूमिका कुणाही लोकशाही व विवेकनिष्ठा मानणाऱ्या व्यक्तीला पटणारी अशीच आहे.

सर आम्ही तुमच्या सोबत आहोत.
सरांनी संस्थेला कळवले ते असे :

“डॉ. ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं,पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.

स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणा-या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतःनाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान ! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही.

म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे
नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मला समजावून घ्यावं. मनोहर म्हैसाळकर म्हणजे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारा माणूस. ते मला निश्चित समजावून घेतील ही खात्री मला आहे. आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही कारण मी मला नाकारलं तर माझ्याशी जगण्यासारखं काहीही नाही. क्षमस्व!

लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने या घटनेचे मनोहरी विश्लेषण करतात. सारं सामसूम असताना, वड कलंडतील असे झंझावात कुठे गेले, असे विचारण्यासारख्या परिस्थितीत आंबेडकरी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी सरस्वती मूर्तीच्या मुद्द्यावर विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार अखेरच्या क्षणी नाकारल्यामुळे तलावावर चार तरंग उमटले.  मकरसंक्रांत हा विदर्भ साहित्य संघाचा स्थापनादिन. यंदा एका दक्षिणपंथी लेखकाचे उत्तरायण सुरू व्हायचे होते, ते झाले नाही.  ‘गांधी का मरत नाही?’ – या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत वानखडे यांनी मात्र याच समारंभात पुरस्कार स्वीकारला, याबाबत आपली भूमिकाही त्यांनी मांडली. पुरस्कार नाकारायचाच होता तर आधी स्वीकारायची संमती कशाला दिली, त्या पुरस्काराच्या निमित्ताने झालेले सत्कार का स्वीकारले, असा प्रतिहल्ला मनोहर यांच्यावर आता सुरू आहे. दुसरीकडे, साहित्य संघाच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच मनोहर ‘संघम् शरणम्’ करीत होते, ते थबकल्याचे समाधान पुरोगामी वर्तुळात आहे.

सरस्वती हे धर्माचे व शोषणव्यवस्थेचे प्रतीक असल्याने आपण तिच्या मूर्तीच्या साक्षीने पुरस्कार स्वीकारू शकत नाही, ही मनोहर यांची भूमिका आहे. सरस्वती नाकारणारे ते पहिले नाहीत. महाराष्ट्रात तर सावित्रीबाई फुले यांच्या कर्तबगारीमुळे ‘सरस्वती की सावित्री’ हा परंपरागत वाद आहे. 

विद्या बाळ विचारायच्या, ‘‘सरस्वतीच्या अस्तित्वाचा पुरावा नाही. सावित्रीच्या मात्र आहे. हिंदू देवीला नमन करून अन्य धर्मीयांच्या मुलांनी का शिकावे?’’ – मनोहरांची भूमिका या व्यवहारी युक्तिवादाच्या पुढची आहे. तिला प्रस्थापित-परिवर्तनवादी संघर्षाचे कंगोरे आहेत. आताशा वैचारिक सरहदी पुसट बनल्या आहेत. चळवळी क्षीण झाल्या आहेत. काही दशकांपूर्वी विद्रोही, परिवर्तनवादी चळवळ, साहित्यिकांचा राजकारणावर अंकुश होता. मधल्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या शकलांसारखीच आंबेडकरी साहित्यिकांमध्ये फूट पडली. कुणी रामदास आठवलेंच्या गाेटात गेले, तर कुणी प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे किंवा अन्य कुणांच्या. प्रवाह सामाजिक, सांस्कृतिक असो की आणखी कोणता, समांतर प्रवाहाच्या प्रवासात एक टप्पा येतोच की समांतर प्रवाहातील अनेकांना मान्यतेचा, प्रतिष्ठेचा मोह खुणावतो. प्रस्थापितांचा मुख्य प्रवाह सामावून घेईल, असे वाटायला लागते. त्यासाठी आयुष्य ज्या प्रवाहात काढले त्याला थोडी बगल देण्याची हिंमत येते. पण, किमान महाराष्ट्राचा इतिहास सांगतो, की असे करणाऱ्यांना पुढे ना मुख्य प्रवाह खऱ्या अर्थाने सन्मान देतो, ना आधीच्या वर्तुळात पूर्वीचे स्थान राहते!

यशवंत मनोहर मोठे साहित्यिक, विचारवंत आहेत. काही दशकांपूर्वी गंगाधर पानतावणे यांच्या समरसता मंचावरील उपस्थितीवेळी त्यांना खडसावून जाब विचारणाऱ्यांमध्ये मनोहर आघाडीवर होते.  ग. त्र्यं. माडखोलकरांशी मैत्रीचे संबंध असल्यानेच गंगाधर पानतावणे यांची वैचारिक निष्ठा पातळ झाली व प्र. ई. सोनकांबळे यांच्यासोबत ते समरसता मंचाच्या व्यासपीठावर गेले, असे म्हणून त्यांना आंबेडकरी समाजापुढे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. तेच मनोहर आता म्हैसाळकरांच्या मैत्रीखातर थेट माडखोलकरांच्याच नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारत असतील, तर ते आंबेडकरी चळवळ, व समाज सहजपणे कसा स्वीकारील? थोड्याशा अपराधीपणासोबतच ही जाणीव अगदी शेवटच्या क्षणी यशवंत मनोहर यांना झाली असावी. पुरस्काराचा स्वीकार व नकार यातील मनोहर यांची चलबिचल या पृष्ठभूमीवर समजून घ्यायला हवी. …किंवा ‘ते सरस्वतीच्या मूर्तीचे काय ते प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी पाहू’, असे विदर्भ साहित्य संघाकडून सांगण्यात आले असावे. कदाचित कोरोना महामारीमुळे हा समारंभ ऑनलाइनच होईल, असा कयास असावा.

अर्थात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाआधी दोन वर्षे स्थापन झालेल्या, दोन वर्षांनंतर शताब्दी साजरी करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाची सांस्कृतिक, वैचारिक बैठक, आतापर्यंतचे अध्यक्ष, साहित्य संमेलने, पुरस्कार वगैरेंबद्दल यशवंत मनोहर यांना नव्याने सांगावे, अशी स्थिती नाही. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी म्हटल्याप्रमाणे, सरस्वतीची मूर्ती किंवा धर्माधिष्ठित असे जे काही असेल तो संघाचा कुळाचार आहे व यशवंत मनोहरांचे तत्त्व सांभाळावे, म्हणून संघ तो साेडणार नाही. थोडक्यात, दोन्ही फळ्यांनी आपापल्या चौकटी पुन्हा घासूनपुसून ठळक बनविल्या आहेत. समांतर नावाचे जे काही असेल ते पंखाखाली घेण्याच्या संघाच्या प्रयत्नांना ठेच लागली आहे.

काल प्रमोद मून यांनी सत्य आणि मिथक यांतील फरक स्पष्ट केला आहे. ब्राम्हणी साहीत्य हे सामान्य मानसाला मिथकाच्या वलयात फसवून गुलाम बनवित आलेले आहे व सामान्याचे शोषण करीत आलेले आहे. बौद्धिक गुलाम झालेले लोक
पैसा मिळवतील श्रिमंत होतील पण स्वाभिमानी होणार नाहीत
म्हणजेच मनाने गुलाम राहतील. कारण त्याच्या बुद्धीवर
मिथकांचा प्रचंड प्रभाव असतो मिथकांना ते आपला आदर्श
मानून आपले आपला पिढ्यांचे आयुष्य खराब करीत असतात.

ब्राम्हण वर्गाला हे माहीत असते की आपण सामान्य मानसाला दिलेली प्रतिके, आदर्श , ईश्वरी प्रतिमा ही सगळी मिथके आहेत. काल्पनिक आहेत पण मिथकाचे रुपात दिलेली इश्वरी संकल्पना आणि प्रतिके हीच ब्राह्मणी वर्गाची हत्यारे
आहेत हीच त्यांची लांगटर्म रणनीती आहे. या मिथकातून बाहेर निघायचे असल्यास त्याला एकच उपाय आहे तो म्हणजे
सत्यशोधने व सत्य स्विकारणे.‌सत्य कितीही भयानक असो वा विरोधात असो, ते आपण स्विकारलेच पाहिजे.

सत्यावर ज्या ज्या देशांच्या सरकारने आणि बुद्धीजिवी नागरीकांनी विश्वास ठेवला. त्या त्या देशात आज शांतता आणि
समृद्धी आलेली आहे पण ज्या देशाचे सरकार आणि ज्या देशातला बुद्धीजीवी वर्ग मिथकावर विश्वास ठेवून वाटचाल
करीत असतो तो देश पुढे गड्ड्यात जातोच व गेलेला आहे आणि मग अशा देशावर कुणीही ऐरा गैरा देश आक्रमण करतो व त्या देशाला गुलाम करतो आणि त्या देशावर राज्य करतो
याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भारतच आहे. भारतावर अशीच अनेक आक्रमणे झालेली आहेत व त्या आक्रमक देशांनी
भारताला अक्षरशा लुटून खाल्ले आहे.

सामान्य मानसाच्या डोक्यात कुटिल लोकांनी
मिथके घुसवून त्याला निष्क्रिय बनवले त्याचा
हा लांगटर्म परिणाम आहे भारतात प्रचंड मिथक परंपरा आहे
या देशातील सामान्य लोकांना या मिथकातून बाहेर काढण्यासाठी प्रथम चार्वाक,गौतम बुद्ध,महाला फुले,पेरीयर रामासामी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत पण अजुनही या महान लोकांच्या विचारांना
पाहिजे तसे यश आलेले नाही.‌कारण या देशातला बुद्धीजीवी वर्ग हा या देशाशी व पर्यायाने सामान्य नागरिकांशी
आजही बेईमान आहे. आणि अतिव दुःखाने म्हणावेसे वाटते की
इथला बुद्धिजीवी वर्ग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ब्राम्हण वर्गच आहे.

बुद्धीजीवी वर्गाची पकड व प्रभाव देशाच्या सर्वसामान नागरिकांवर आणि सरकारवर असतो ज्या देशातला
बुद्धिजीवी वर्ग हा प्रामाणिक असतो त्या देशाला त्याच्या प्रगतीपासून कोणीही रोखू शकत नाही तसेच ज्या देशाचा बुद्धिजीवी वर्ग हा बेईमान असतो त्या देशाला अधोगती पासून कुणी थांबवू शकत नाही.

या देशातला ब्राम्हणी वर्ग रास्वसंघाच्या ठरलेल्या रणनीती नुसार सामान्य जनतेत सतत मिथकाची मांडणी करीत असतो याचा अर्थ असा नाही की त्याला त्या मिथकाचा खोटेपणा माहीत नाही असे नाही पण हे काम त्याच्या जातीला श्रेष्ठत्वाकडे नेते म्हणून तो ते प्रामाणिकपणे करीत असतात.
ब्राम्हणांना त्याच्या ब्राम्हण वगीच्या हितापेक्षा देशहीत कधीच महत्वाचे वाटले नाही.

हे सगळे असले तरी दुःख याचे आहे की फुले आंबेडकरांना आदर्श मानून जेंव्हा काही फुले आंबेडकरवादी बुद्धिजीवी जेंव्हा त्यांनी निर्माण केलेल्या मिथकांना हार घालतात मिथकांना हात जोडतात तेव्हाच आमच्या विचारांचा व चळवळीचा पराभव होतो.बुद्धिजीवी वर्गाची खंबीर भूमिका ही मागासलेल्या समाजाला दिशा व प्रेरणा देत असते म्हणून बुद्धिजीवी वर्गाचीच भूमिका महत्वाची असते दिशादर्शक असते सर्वसामान्य नागरीक तर बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरणच करीत असतात.

सरस्वतीला जाहीर नकार देवून यशवंत मनोहर सरांनी ब्राम्हणी वर्गाला जो धक्का दिला व एकपायंडा पाडला ला बद्दल मनोहर सरांचे हार्दिक अभिनंदन!

यशवंत मनोहर सरांच्या भूमिकेला अनुमोदन देतांना अ.भा.आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे लिहितात,

“मयुरावरी विद्याधरी कळले की नुसते सोंग हे !
माते तुझ्या तेजापुढे नमले सनातन ढोंग हे !
धर्मांधतेचे सर्प जे तू ठेचला त्यांचा फणा !
तुज वंदना .. तुज वंदना
सावित्री घे तुज वंदना…

सन्मित्रांनो .. भावंडांनो ,
आदरणीय प्रा. डॉ. यशवंत मनोहर सरांनी ज्या कारणास्तव वि. सा. संघाचा पुरस्कार नाकारला त्या त्यांच्या भूमिकेचे मी अनुमोदन करतो. सरांविषयीचा आदर आणखी दुणावला !
आंबेडकरी चळवळीचे अंतिम ध्येयउद्दिष्ट केवळ राजकीय सत्तापदे किंवा सामाजिक वा साहित्यक्षेत्रातील प्रतिष्ठेचे सन्मानपुरस्कार प्राप्ती एवढेच आहे काय ?

आपल्याला केवळ आपल्यापुरतं मर्यादित राहायचं नाही ..
‘व्यापक व्हायचं आहे !’ .. ‘अधिक व्यापक व्हायचं आहे !’ .. असं सांगत राजकीय क्षेत्रातील आमच्या धुरीणांनी मागील उण्यापुऱ्या तीन-चार तपांपासून ‘बौद्धजन’ ही आपली ओळख थोडी बाजुला ठेवायला सांगून ‘बहुजन’ .. ‘सर्वजन’ वगैरे व्हायला सांगितलं. या राजकीय तडजोडवादी जुगाडवादी भूमिकेनं आम्ही ‘रिपब्लीकन’ या आमच्या हक्काच्या ‘आयडेन्टिटी’पासूनही केव्हा ‘वंचित’ झालो कळलंच नाही.
‘सर्वजन’ व्हायला गेलो आणि केव्हा ‘अल्पजन’ झालो कळलंच नाही !

आता आहो तेवढे आहो .. आहो तसे आहो ..
आपण आपली निरीश्वरवादी .. अनात्मवादी .. इहवादी .. न्याय-समता-बंधुता या चिरस्थायी मानवी मूल्यांसह संविधान आणि लोकशाहीचे प्रबळ समर्थक अशी ‘आंबेडकरवादी बौद्ध’ ही जगातली सर्वात सुंदर ओळख घेऊन जगुया .. मरूया !
यासाठी कुणी आम्हाला ‘संकुचित’ म्हणून हेटाळणी करून ‘एकटे’ पाडण्याचे मनसुबे करीत असतील तर ती त्यांचीच वैचारिक संकुचितता आहे ! खरं तर वृथाहेटाळणीच्या या जखमाच छाताडावर ‘गोल्डमेडल्स’सारख्या मिरवुया !
उद्याचा काळ सांगेल कोण ‘संकुचित’ आणि कोण ‘व्यापक’ ?

बाकी तथाकथित अर्थाने ‘व्यापक’ .. ‘आणखी व्यापक’ होण्याची भूमिका ज्यांना पटते त्यांनी पुढची आणखी चार-सहा तपे ‘समरसतावाद्यांशी समरस’ होऊन राजकीय .. सामाजिक .. सांस्कृतिक .. साहित्यिक क्षेत्रात यशोश्वर्यसंपन्न व्हावे .. हवी ती सत्तापदं मिळवावीत ..हवे ते मानसन्मान मिळवावे.
आम्ही त्यांना सुयश चिंतितो ! मंगलकामनांसह ! जयभीम !

कवी संजय ओरके यांनी सरांच्या भूमिकेचे समर्थनच केले. प्रतीकांची निर्मिती केली जाते.प्रतीकं काळाच्या ओघात वाहून जाऊ शकतात.प्रतीकं कपोलकल्पीत असू शकतात.प्रतीकांनी इतिहास घडवला,नवनिर्माण केलं किंवा माणसांच्या जगण्यातील क्रांतिकारक परिवर्तनासाठी ते प्रेरक ठरलेत,असा कुठलाच पुरावा तपासून पाहता येत नाही.

प्रेरणा ह्या काळाच्या ओघात नष्ट होत नाही. प्रेरणांना इतिहासात महत्वाचे स्थान असते. प्रेरणा ठिसूळ नसतात. वैश्विक प्रेरणा माणसाच्या आयुष्यात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणतात,सन्मानाचं जगणं बहाल करतात,अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी बळ पुरवतात. प्रेरणा, जन्म-जगणं आणि मरणालाही अर्थ प्रदान करत असतात.

॥ आपल्या अस्मितांचा बळी देवून कोणताच माणूस मोठा होत नसतो. आपल्या आजुबाजुला रोज मांडलिकत्व स्विकारण्याची रांग लागली असतांना डॉ. यशवंत मनोहर सरांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारुन अजुनही माणसं जीवंत आहेत,या गोष्टीला दुजोराच दिलाय.माणसांच्या खरेदी आणि विक्रीच्या काळात कुण्याही धनदांडग्यांनी कुणाचीही बोली लावावी,या परंपरेला नाकारण्याची ही ऊर्जा आंबेडकरी प्रेरणेचच दान आहे. ‘सबकुछ बिकाऊ नहीं होता..’ हा स्वाभिमान उजागर केल्याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो,सर!

आंबेडकरी साहित्याचा हा किल्ला निरंतर अभेद्य ठेवण्यासाठी आणि येणा-या लिहित्या हातांना सम्यक चेतनांची ओळख नव्याने करुन देण्याची गरज होतीच,ती आपल्या या सम्यक कृतीने नक्की होईल यात अजिबात शंका नाही.पुरस्कार स्विकार केल्यानं माणसं मोठी होतात हे ऐकलं होतं; पुरस्कार नाकारल्याने माणसं उत्तुंग होतात आणि हे आपल्या वैश्विक प्रेरणांचं आपणास प्राप्त झालेलं महादान आहे, हे कृतियुक्त प्रबोधन आपण केलं आहे.

बाबासाहेब म्हणतात, “प्रगतीचं मापन करणारी व इतिहास दर्शवणारी दोन प्रभावी अस्त्र आहेत.एक-लेखणी व दुसरी-वाणी. ही दोन्ही अस्त्रे व्यासंगी वृत्तीने जोपसली पाहिजेत.जीवनात साहित्याला विशेष महत्व आहे. तुमचे कर्तव्य,विद्वत्ता व बुद्धिमत्ता सिद्ध करणारी तेच एकमेव साधन आहे,हे लक्षात ठेवा..!”

आपल्या प्रेरणेची ही शिकवण कृतीत उतरवतांना साहित्य संस्कृतीच्या वैश्विक आणि विज्ञानवादी आंबेडकरी चौकटीची नव्याने उजळणी करुन दिल्याबद्दल जयभीम..! आपली ही कृती साहित्य सारथींना कायम मार्गदर्शन करत राहिल. सप्रेम जयभीम..!!

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी तर चौफेर फटकेबाजी केली आहे. तथाकथित कीती मराठी आणि ग्रामीण साहित्यिकांनी डॉ. मनोहरांचे अभिनंदन केले हे मला बघायचेच आहे. स्वतःला पुरोगामी वगैरे म्हणवून घेणारे लोक्स यशवंत मनोहरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत असा माझा समज आहे. डॉ. मनोहरांनी धर्मांधांच्या बुडाला अक्षरशः मिरच्या घालून धूर दिला. सांस्कृतिक लढाई आरपारची असते. चुकीला माफी नाहीच. सर्वच लोक डॉ. मनोहरांचे समर्थन करत आहेत म्हणून काही च्यु# लोक बौद्धिक आव आणून विरोध करत आहेत. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात धार्मिक प्रतिकांचे अवडंबर माजविण्याची परवानगी कदाचित संविधान देत असेल, आंबेडकरवाद तशी परवानगी देत नाही.

धार्मिक प्रतिकांचे उदात्तीकरण करून धर्मनिरपेक्ष होता येत नाही. धर्म, धार्मिकता,धर्मांधता ससंदर्भ नाकारणे हेच आमचे जीवनव्रत. अंधश्रद्धामूलक धार्मिक प्रतिके नाकारलीच पाहीजे.
साफसफाईची गरज आहेच.

यशवंत मनोहर हे आज जुन्या जाणत्या काळातील आणि जिवंत असलेले एकमेव आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत आहेत. ते त्यांच्या शब्दांनी आणि कृतींनी महानच आहेत. त्यांनी स्वत: साठी पुरस्कार नाकारला नाही, तर आमच्यासाठी नाकारला आहे. त्यांच्या आंबेडकरी निष्ठांसाठी नाकारला आहे. ते स्वत:च्याच निष्ठांची हत्या कशी करु शकतात? ते आंबेडकरी साहित्य चळवळीतील लेकरांचे बाप माणूस आहेत. त्यांच्या या कृतीमुळे आंबेडकरी साहित्य कुटुंबात नव्याने जन्माला आलेल्या लेकरांची अस्मिता आणि धारणा आणखीनच मजबूत झाली आहे. यशवंत मनोहर म्हणजे स्वत:च एक जिवंत पुरस्कार आहेत. त्यांनी कोणताही पुरस्कार स्विकारण्याची आवश्यकता नाही.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
१७.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *