कामेश्वरची कौतुकास्पद कामगिरी : भाग -२

२०१३ मध्ये बिबट्याशी लढा देण्याचे उत्कृष्ट धाडस दाखविल्याबद्दल महाराष्ट्रातील मास्टर संजय नवसू सुतार आणि महाराष्ट्राचे मास्टर अक्षय जयराम रोजगार यांना बापू गायधनी पुरस्कार देण्यात आला. १९३० मध्ये नाशिक, सरकारवाडा येथे लागलेल्या आगीमध्ये बापू गायधनी यांनी स्वतःच्या जीवाची पर्व न करता अनेक लोकांचे आणि गायींचेही जीव वाचविले. हे काम करताना त्यांनी आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही.

मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई मंदिरासमोर भाविकांसाठी तयार केलेल्या घाटात भागवत घोगले हा मुलगा पाय घसरुन पडला. मंदिरात आलेल्या निलेशने पाण्यात उडी मारून त्याला वाचवले. ३० ऑगस्ट २०१४ ला ही घटना घडली. या धाडसी कामगिरीबद्दल निलेशला २६ जानेवारी २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

घरात अठरा विश्व दारिद्र्य.. दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मुक्ताईनगरातील कोथळी येथील रेवाराम भील परिवार अतिशय हालाखीच्या स्थितीत जीवन जगत असताना त्यांचा मुलगा निलेश याने दाखविलेल्या शौर्य व धाडसाची दखल घेत केंद्रीय प्रशासनाने त्याला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. मुलाच्या कर्तृत्वामुळे त्याच्या कुटूंबियांना देश पातळीवर ओळख मिळाली.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे ऋषिपंचमीच्या दिवशी ओंकार उगले रा.बुलढाणा हे कुटूंबियांसह कोथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आले होते. तेथे पूर्णा नदीचे बॅक वॉटर मंदिराच्या समोरच्या बाजूस सोडून घाट तयार करण्यात आला आहे. भागवत उगले, (वय-11) हा बालक घाटावर हातपाय धुण्यासाठी गेला होता. मात्र तो पाय घसरून पाण्यात पडला. ही घटना लक्षात येताच मंदिरात दर्शनासाठी आलेल्या कोथळी जिल्हा परिषद शाळेचा इ. चौथी चा विद्यार्थी निलेश याने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता पाण्यात सूर मारला आणि त्या बालकास सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. त्याच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक झाले. निलेशला दोन लहान भाऊ असून आई-वडील मोलमजूरी करून चरितार्थ चालवितात. मुक्ताईनगर पंचायत समितीने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी निलेश चा सत्कार केला तर, 8 सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन यांच्या हस्ते देखील त्याचा सत्कार झाला आहे.

निलेश हा अत्यंत गरीब कुटूंबातील असून त्याच्याकडे पोहण्याचे कौशल्य आहे. आपल्या या कौशल्याचा वापर करत त्याने धाडसाने आपल्या जिवाचा विचार न करता निष्पाप बालकाचा जीव वाचवला. या शौर्यामुळे निलेश भील याची यंदाच्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदा महाराष्ट्रातून चार बालकांची निवड करण्यात आली असून त्यात निलेश चा समावेश आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार त्याला देण्यात येणार आहे. कर्तृत्ववान शौर्य, धाडस दाखवलेल्या 18 वर्षाच्या आतील मुले-मुलींना हा पुरस्कार मिळतो. निलेशला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाल्याने मुक्ताईनगरचे नांव राष्ट्रीय पातळीवर निश्चितच पोहचले.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार (२०१५) जाहीर झाला. यावेळी देशातील २५ बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे जाहीर झाले तेव्हा यामध्ये महाराष्ट्रातील निशाचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ जानेवारी रोजी या शूर बालकांना गौरविण्यात आले.

१४ जानेवारी २०१५ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास निशा पाटील आपल्या मैत्रिणीकडे आली असता शेजारच्या घरातून धूर निघत असल्याचे तिने पाहिले. घराला आग लागली आणि घरात लहान मुलगी असल्याचे कळताच निशाने त्या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी घरात उडी घेतली. घराच्या छताला आग लागलेली, पडद्यांनीही पेट घेतल्याने ज्या पाळण्यात लहानगी झोपली होती तो पाळणाही जळून तुटला होता. पाळण्यातली लहानगी पूर्वी देशमुख जिवाच्या आकांताने रडत होती. हे चित्र पाहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता निशाने पूर्वीला आगीतून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार भारतातील १६ वर्षाखालील सुमारे २५ शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारीला दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त मुले प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात.

२ ऑक्टोबर १९५७ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर चाललेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू पाहत होते. त्यावेळी शॉर्टसर्किटमुळे अचानक शामियान्याला आग लागली. तेव्हा हरिश्चंद्र मेहरा या तेथे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या केवळ १४ वर्षांच्या मुलाने स्वतःकडच्या चाकूने शामियान्याचा दोर कापून लोकांना बाहेर पडायला वाट करून दिली.त्याचे प्रसंगावधान आणि धाडसी वृत्ती पाहून नेहरूंना खूप कौतुक वाटले आणि देशातील अशा शूर, धाडसी मुलांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली.पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता हरिश्चंद्र मेहरा हाच या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला.

आपल्या अपहरणकर्त्यांशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या गीता आणि संजय चोपडा या भावंडांच्या स्मरणार्थ शूर मुलगा आणि मुलगी यांना अनुक्रमे संजय आणि गीता चोपडा पुरस्कार देण्यात येतात. नाशिक येथे लागलेल्या आगीत अडकलेली दोन लहान मुले आणि गोठ्यात अडकलेल्या गायी यांना वाचवताना जखमी झालेल्या आणि त्यामुळे पुढे मृत्युमुखी पडलेल्या बापू गायधनी यांच्या स्मरणार्थ ‘बापू गायधनी पुरस्कार’ देण्यात येतो. पुरस्कारप्राप्त मुलांच्या नावांची घोषणा १४ नोव्हेंबरला बालदिनाच्या दिवशी केली जाते. काही राज्य सरकारे सुद्धा या मुलांना आर्थिक मदत करतात. इंदिरा गांधी शिष्यवृती योजनेंतर्गत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आईसीसीडब्‍ल्‍यू आर्थिक मदत करते. इतर मुलांना पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. भारत सरकारने पुरस्कारप्राप्त मुलांसाठी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच पॉलीटेक्निक महाविद्यालयांमध्ये काही जागा आरक्षित ठेवल्या आहेत. या पुरस्कारांसाठी मुलांची निवड एक समिती करते. या समितीत विविध मंत्रालये/ विभाग यांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संघटना आणि भारतीय बाल कल्याण परिषदेचे वरिष्ठ सदस्य यांचा समावेश असतो.

शौर्याचा अत्युच्च आदर्श निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील चार मुलांसह २५ बालकांना २४ जानेवारी १०१६ रोजी राजधानीत होणाऱ्या शानदार समारंभात राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यापैकी प्रतिष्ठेचा भारत पुरस्कार आपल्या चार मित्रांना वाचवते वेळी प्राणांची आहुती देणाऱ्या गौरव कवडुजी सहस्रबुद्धे याला मरणोत्तर जाहीर झाला आहे. तीन मुलींनीदेखील या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
दहावीत शिकणाऱ्या नागपूरच्या गौरवने हिंगणा रोडवरील टाकळी सीम भागातील अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मुलांना स्वत:च्या जिवाची बाजी लावून वाचवले होते. ही घटना ३ जून २०१४ रोजी घडली होती. सुरुवातीला तीन मुलांना गौरवने वाचवले. परंतु चौथ्या मित्राला पाण्यातून सुखरूप बाहेर काढत असताना गौरवला प्राणाची आहुती द्यावी लागली होती. गौरवमुळे चार जणांना जीवदान मिळाले. या साहसी कर्तृत्वासाठी गौरवला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’ घोषित झाला आहे. गौरवची आई रेखा सहस्रबुद्धे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

गौरवसह मोहित महेंद्र दळवी, नीलेश रेवाराम भिल, वैभव रमेश घांगरे या महाराष्ट्रीय मुलांना शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. प्रतिष्ठेचा गीता चोप्रा पुरस्कार तेलंगणाच्या शिवमपेट रुचिताला जाहीर करण्यात आला आहे. या आठ वर्षांच्या चिमुरडीने ट्रेनला धडकलेल्या शाळेच्या गाडीतील दोघांचे जीव वाचविले. तर संजय चोप्रा पुरस्कार १६ वर्षीय अर्जुन सिंग याला देण्यात येईल. वाघाशी दोन हात करीत आईला वाचविताना त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. बापू गायधनी पुरस्कार मिझोरामच्या रामदिनतारा, गुजरातच्या राकेशभाई शानाभाई पटेल आणि केरळच्या आरोमल एस. एम. या किशोरांना देण्यात येईल. रामदिनतारा याने विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या दोघा जणांना वाचविले. राकेशभाईने विहिरीत पडलेल्या एका मुलाचे, तर आरोमलने बुडणाऱ्या दोघा स्त्रियांचे प्राण वाचविले.

इतर पुरस्कारार्थीमध्ये कशिश धनानी (गुजरात), मॉरिस येंगखोम व चोंगथाम कुबेर मैतेयी (मणिपूर), अँजेलिका तिनसाँग (मेघालय), साईकृष्ण अखिल किलांबी (तेलंगणा), जोईना चक्रवर्ती व सर्वानंद साहा (छत्तीसगढ), दिशांत मेहंदीरत्ता (हरयाणा), बीथोव्हन, नितीन फिलीप मॅथ्यू, अभिजीत के. व्ही. आनंदू दिलीप व मोहंमद शामनाद (केरळ) व अविनाश मिश्रा (ओडिशा) यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या भीमसेन आणि शिवांश सिंग यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.

१६ किंवा १८ वर्षाखालील मुलामुलींना “सर्व शक्यतांविरुद्ध शौर्यकारक कामे” करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पारितोषिके दिली जातात. एकूण पाच पारितोषिकांपैकी एक आहे – बापू गायधनी पुरस्कार. बापू गायधनी पुरस्कार, हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार १९८० पासून १८ वर्षांखालील मुलांना देण्यात येतो जे सर्व प्रकारच्या शक्त्याविरुद्ध जाऊन अत्यंत अशक्य आणि विलक्षण काम करतात.

२०१८ साली पुरस्कारार्थी खालील प्रमाणे मुलांना पुरस्कार देण्यात आला.

१. नेत्रावती महंतेश चव्हाण : (१४ वर्षे – मरणोत्तर) बागलकोट, कर्नाटक : बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवताना एका मुलाला वाचवण्यात यशस्वी.दुसऱ्या मुलाला वाचवताना नेत्रावतीचा मृत्यू

२. करणबीर सिंग : गगुवाल, अमृतसर,पंजाब : नाल्यात शाळेची बस पडल्यामुळे बुडणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचवले.
एफ.लालछंदामा (१८ वर्षे – मरणोत्तर): नदीत बुडणाऱ्या मित्रांना वाचवताना प्राण गमावले.

३. ममता दलाई : (६ वर्षे) : ओरिसा: मगरीच्या विळख्यातून मैत्रिणीची सुटका केली.

४. सेबास्टीयन व्हीन्सेंट : अलेप्पी, केरळ : रेल्वेच्या रूळावर पडलेल्या मित्राला वाचवले.

५. लक्ष्मी यादव : (१६ वर्षे) : लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन लोकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.

६. समृद्धी सुशील शर्मा : (१७ वर्षे): गुजरात : घरात चाकू घेऊन शिरलेल्या माणसाशी सामना केला.

७. झोनंतलुआंगा : मिझोराम : अस्वलाच्या हल्ल्यातून वडिलांची सुटका केली

८. पंकज सेमवाल : (१६ वर्षे) : टेहरी गढवाल, उत्तराखंड : बिबट्याच्या हल्ल्यातून आईला वाचवले.

९. नाझिया: आग्रा, उत्तर प्रदेश : आग्रा येथील सदरभट्टी भागातील दुकानदारांना त्रास देणाऱ्या लोकांना पोलिसांच्या हवाली केले.

१०. नदाफ एजाझ अब्दुल रौफ: पार्डी(मक्ता), तालुका: अर्धापूर, जिल्हा: नांदेड,महाराष्ट्र : नदीत बुडणाऱ्या दोन महिलांना वाचवले.

११. लौक्राकपाम राजेश्वरी चानू : (१५ वर्षे) : मणिपूर

१२. पंकज कुमार महंत : (१५ वर्षे) :ओरिसा

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२४.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *