
शिवास्त्र :
दिशा करिअरची ..
करिअर मार्गदर्शन मेळाव्यातील बहुतांश पालकांचा कॉमन प्रश्न,माझ्या पाल्याने कोणत्या शाखेत जावे.? – मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्री.? कोणत्या युनिव्हर्सिटीत प्रवेश घेणे चांगले राहील.? कृपया मार्गदर्शन करावे.
१) करिअर म्हणजे काय हे मूलभूत समजून घ्यावे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सिए, इ. होणे म्हणजे करिअर का.? समजा तो डॉक्टर झाला पण प्रॅक्टिस चाललीच नाही किंवा इंजिनिअर झाला पण मनासारखी नोकरीच नाही लागली तर.? बाजारात जणू विकायला असलेली पदवी घेणे म्हणजे करिअर करणे का.? करिअर म्हणजे एक बुध्दीमान व कौशल्यवान व्यक्ती बनून आपल्या आवडी व मार्केट मधील गरजांचा अंदाज घेऊन आपली सर्वोत्तम क्षमता सिध्द करणे होय. माझ्या शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं.? हे समजून घेणे जमायला पाहिजे.
२) पैसा हा तर महत्वाचा आहेच पण ते साध्य नाही, साधन आहे. तुमचा मुलगा जेव्हा त्याची सर्वोच्च क्षमता सिध्द करेल तेव्हा तो त्याच्या क्षेत्रातला मास्टर असेल व पैसा त्याच्या मागे येईल, त्याला पैश्यांच्या मागे धावण्याची गरज नाही. आपण जेवढे पैश्याच्या मागे धावतो तेवढे पैसे लांब पळतात हा ९९% लोकांचा स्वानुभव आहे.
३) गर्दीचा भाग होऊ नका, आज दरवर्षी लाखो पदवीधर होतात व फक्त लाखभर युवकांना नोकरी मिळते, ती सुध्दा १० – १५ हजाराची. प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटल टाकत नाही, नोकरी करणाऱ्या डॉक्टरवर टार्गेटची तलवार असते. किती डॉक्टर कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्याइतपत पैसे कमवू शकतात.?
४) युनिव्हर्सिटी की युनिव्हर्स.? – कृत्रिम पुस्तकांचा टीवल्या-बावल्याचा खेळ म्हणजे युनिव्हर्सिटी का.? पदवीधर ५-१० हजाराच्या नोकरीची भीक मागत का फिरताना दिसावे.? एवढे इंजिनिअर आहेत मग प्लॅम्बर, सुतार, इलेकंट्रीशिअन, गवंडी हे सगळे बाहेरून का आणावे लागतात, कारण आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरला फ्युज तरी लावता येतो का.? डिग्री घेतली की लगेच एसी केबिन कशाला पाहिजे.? युनिव्हर्स म्हणजे घर व शाळा या बाहेरची दुनिया (प्रॅक्टिकल, मार्केट, बाजार, समाज, इत्यादी, इत्यादी) उद्या ह्याच जगात त्याला लढायचे व जिंकायचे आहे त्यामुळे त्याला १२ वी नंतर युनिव्हर्स मध्ये काही काळ वावरू द्या.
५) नेमके काय करावे.? त्याची आवड, क्षमता, संधी व तुमची पैसे खर्च करण्याची तयारी याचा विचार करून स्किल-ओरिएंटेड असे कोर्स करावेत, सेल्फ एज्युकेशनला महत्व द्यावे, पदवीपेक्षा घेतलेले शिक्षण त्याला स्वयंनिर्भर करेल हे महत्वाचे, जसे उंचावरून फेकलेले मांजर चार पायावरच बरोबर उभे राहते तसे मुलाला सक्षम बनवायला हवे, कारण उद्याच्या जगात डॉक्टर होवो इंजिनिअर होवो किंवा अजून काही होवो, कुणाचे काय होईल हे आज सांगता येत नाही, कोणत्याही स्थितीला सामोरे जाणारे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व हवे. तो खेळाडू, हॉटेलिएर, डिझायनर , ऍडमेकर, लेखक, शेतकरी, पेंटर, व्यापारी, एक्सपोर्टर, इ.इ.इ. हजारो पर्यायापैकी का नाही होऊ शकत.? इंजिनिअरींग, मेडिकल, फार्मसीलाच टिळा लावलाय का.?
६) शिक्षण घेण्यावर किती खर्च करावा.? याचे व्यवहारी तारतम्य हवे, शिक्षणाच्या अड्डयावर जुगार खेळू नका, पदव्याऐवजी ज्ञान घेण्यावर भर हवा. १० लाख पदवीवर खर्चून त्याच्या व्याजाएवढ्या पगाराची नोकरी लागू नये हा तर स्वतःच डोळे बांधून खेळलेला जुगार नव्हे का.? ज्या जुगारात पैसे व मुलांचे आयुष्य सुध्दा हरते.
आपल्या पाल्याचे जीवन यशस्वी करण्यासाठी त्याच्या अभ्यासाच्या सवयीमध्ये योग्य ते बदल करा. १) कमीतकमी पाठांतर, समजून घेण्यावर अधिक भर द्यायला सांगा. २) प्रत्येक घटकाचे आकलन होईल याची काळजी घ्या. ३) वाचन केलेल्या घटकांचे विश्लेषण करण्याची सवय लावा. ४) गाईड ऐवजी पुस्तके वाचून स्वतःच्या भाषेत प्रश्नांची उत्तरे तयार करायला सांगा. ५) प्रत्येक धडा समजून घेऊन सारांश लक्षात ठेवता आला तर अतिउत्तम.
काळजी घ्या. सध्याचे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या विकासाला पूरक असण्याऐवजी मारक तर ठरत नाही ना.? आपल्या पाल्याची प्रगती गुणावर न ठरवता गुणवत्तेवर ठरवा आणि मग पुढील शिक्षणासाठीची त्याची योग्यता तपासून दिशा ठरवावी. करिअरच्या दिशेचा गांभीर्याने विचार करावा, सल्ला योग्य व्यक्तीचा घ्यावा…

इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर,
नांदेड मास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट,
नवी दिल्ली shivajiraje.patil@jnli.org.in