समता आणि समानता…
अंजू आणि मंजू दोघी सख्ख्या बहिणी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या घरच्या शेतामध्ये आई-वडिलासोबत कापूस वेचण्यासाठी गेल्या. आई-वडिलासोबत दिवसभर कापूस वेचून सायंकाळी आपापल्या कापसाचं प्रत्येकांनी गाठोड बांधलं. सायंकाळी सर्वजन घरी आल्यावर बाबाने सर्वांच्या गाठोड्याचं वजन केले असता आईच्या कापसाच्या गाठोड्याचं वजन ८५ किलोग्रॅम भरलं. स्वतःच्या गाठोड्याचं वजन केलं असता ते ६७ किलोग्रॅम भरलं. अंजूच्या गाठोड्याचं वजन ५४ किलोग्रॅम व मंजूच्या गाठोड्याचं वजन ३५ किलोग्रॅम असं भरलं. दोघी बहिणींनी दिवसभर कापूस वेचण्यासाठी शेतकामात मदत केल्यामुळे त्यांच्या आई-बाबाला खूप आनंद झाला. वर्गकार्यात, घरकामात व शेतकामात दोघीही त्यांच प्रामाणिक योगदान देत असल्यामुळे बाबाने दोघींनाही एकाच किंमतीचा व एक सारख्या रंगाचा ड्रेस बाजारातून खरेदी केला. शाळेतून दोघी घरी आल्यावर बाबाने त्यांना ड्रेस दाखविला असता मंजूला खूप आनंद झाला व ती धावतच बाबाला आनंदाने बिलगली.
अंजूला मात्र मंजूपेक्षा कमी आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव स्पष्ट जाणवत होते. बाबाने कारण विचारले असता अंजू म्हणाली, मी मंजूपेक्षा जास्त कापूस वेचला. तिच्यापेक्षा मी जास्त काम करते, मग मला तिच्या पेक्षा जास्त किंमतीचा ड्रेस हवा होता. बाबाने अंजूला विश्वासात व जवळ घेऊन प्रश्न केले. – तू मंजूपेक्षा जास्त कापूस वेचण्याचं कारण काय? तू तिच्यापेक्षा जास्त काम करण्याचं कारण काय? त्यावर अंजू म्हणाली, मी तिच्यापेक्षा वयाने मोठी आहे. माझी शारीरिक क्षमता तिच्यापेक्षा जास्त आहे. माझी कार्यक्षमता तिच्यापेक्षा अधिक आहे. माझी काम करण्याची गती तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मी तिच्यापेक्षा अधिक चपळ आहे. छान बेटा, तुला हे माहीत असूनही तू नाराज हे काही मला आवडले नाही. याचा अर्थ तिच्या वयोमानानुसार, तिच्या शारीरिक क्षमतेनुसार, तिच्या कार्यक्षमतेनुसार, तिच्या काम करण्याच्या गतीनुसार तिच्या जागी ती योग्य व बरोबर आहे. म्हणजे तिने वेचलेल्या कापसाचे मूल्य, ती काम करण्याचे मूल्य मला तू वेचलेल्या कापसाएवढेच, तू करत असलेल्या कामाएवढेच आहे.
म्हणजेच दोघींचेही मूल्य माझ्यासाठी सारखे, समानच आहे. अंजू बेटा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपापल्या क्षमतेनुसार, गतीनुसार प्रत्येकाचं कार्य उत्कृष्टचं असते. प्रत्येकाची काम करण्याची क्षमता, गती कमी अधिक असते. व्यक्तीपरत्वे नैसर्गिक भिन्नता असते. त्यामुळे प्रत्येकजन त्यांच काम हे त्यांच्या क्षमतेच्या, गतीच्या, कौशल्याच्या पातळीनुसार पूर्णत्वास नेतचं असतात. त्यामुळे कधीही कोणालाही कमी लेखू नये. शेवटी अंजूला तिची चूक लक्षात आली. तिने मंजूला जवळ घेतले व दोघीही नवीन ड्रेस सह बाबाला आनंदाने बिलगल्या.
गोष्ट निर्मिती व लेखन~ संतोष मो. मनवरजि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा.