लोहा तालुक्यातील शिवणी (जा) येथे 22 वर्षीय तरुणांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव;प्रकृती गंभीर,सात जण अटकेत तर दोघे फरार!

लोहा –
लोहा तालुक्यातील शिवणी (जा) येथे 22 वर्षीय तरुण शेती काम आटोपून सायंकाळी साइकलने घरी येत असतांना रस्त्यात मोटारसायकलने तरुणाच्या सायकलला धडक दिली. त्याचा जाब विचारला असता शाब्दिक बाचाबाचीतून प्रकरण वाढत गेले त्याचे पर्यावसान हाणामारी पर्यंत गेले.हातातील कुऱ्हाडीचा घाव डोक्यात बसल्याने 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 23 रोजी रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडली. जखमी तरुणावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. याप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील फरार झालेला सात जणांना लोहा पोलिसांनी गजाआड केले असून अद्याप दोघे फरार असल्याची माहिती मिळाली आहे.


लोहा तालुक्यातील शिवणी (जा.) येथील संदीप दुधमल हा तरुण दि. 23 रोजी सायंकाळी सायकलवरून घराकडे जात असताना आलेल्या मोटारसायकलची सायकलीस धडक बसली त्यात सदरील युवक काही अंशी जखमी झाला होता. त्याचा जाब विचारला असता आम्हाला जाब विचारणारा तू कोण असे म्हणत आरोपीने गावातील गैरकायद्यांची 8 ते 10 मंडळी जमवून त्यांनी रात्री साडेआठ वाजेसुमारास संदीप दुधमल याच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. यात शामबाई दुधमल, उज्वलाबाई दुधमल, मारोती दुधमल व संदीप दुधमल जखमी झाले.आरोपीने हल्ला करतेवेळी लाकडी काठ्या, गजाळी व कुऱ्हाडीचा मुक्त वापर केला. त्याचवेळी तंटा मिटवण्यासाठी गेलेला गणेश एडके याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसला यात तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. उपस्थितांनी जखमीस तात्काळ लोहा ग्रामीण रुग्णालय व तेथून नांदेड येथे हलविले असता प्रकृती गंभीर बनल्याने त्यास घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे पुढील उपचारार्थ हलविण्यास सांगितले.याप्रकरणी शिवाजी दुधमल यांच्या फिर्यादीवरून प्रल्हाद अप्पाराव जामगे, विश्वनाथ जामगे, काशीनाथ अप्पराव जामगे, अप्पराव विश्वनाथ जामगे, सुदाम (मंगु) यादोजी जामगे, दशरथ यदु जामगे, ज्ञानोबा विश्वनाथ जामगे, यादोजी विश्वनाथ जामगे व बसवेश्वर बोमनाळे आदी नऊ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीयवाचक शिवीगाळ करणे, आदी कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखू सर्वच आरोपी फरार झाले होते .मात्र लोहा पोलिसांनी तपासाची चक्रे अत्यंत जलद गतीने फिरवून सात आरोपींना ताब्यात घेतले असून आप्पाराव विश्वनाथ जामगे व ज्ञानोबा विश्वनाथ जामगे हे दोघे जण अद्याप फरार असल्याची माहिती मिळाली आहे.प्रकरणाचे गांभीर्य ओळळून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व लोह्याचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये आदींनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. शिवणी (जा) येथे सद्यस्थितीला तणावपूर्ण शांतता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *