धर्म ही अफूची गोळी नव्हे !
ज्ञानेश वाकुडकर•••
मार्क्स यांनी ज्या कोणत्या संदर्भात अफूची गोळी म्हटलं असेल ते असो, पण धर्म खरंच अफूची गोळी आहे का ? माणसाला धर्माची गुंगी येते, याबद्दल वाद नाही. पण गुंगी येणारी धर्म हीच एकमेव गोष्ट आहे का ? माणसाला गुंगी तर अनेक गोष्टींची येते !-समूह करून राहणं, ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ती पशु, पक्षी, किडे, मुंग्या या सर्वामध्ये आपल्याला दिसते. फार काय हवा, सुगंध, रंग देखील एकमेकांच्या जवळ आलेत की त्यांची गती आणि प्रभाव बदलतो. फुल आणि फुलपाखरू जवळ आले की नवे सृजन होते. एक वासरू उड्या मारायला लागले, की दुसरेही उड्या मारायला लागते. एक कावळा ओरडायला लागला, की बाकीचेही ओरडायला लागतात. एक बंदर उड्या मारायला लागले, की इतरही या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात. एक कोंबडी पळायला लागली की बाकीच्याही पळायला लागतात. एक कोल्हा ओरडायला लागला की बाकीच्यांचीही कोल्हेकुई सुरू होते. -समूह आपल्याला सुरक्षेची भावना देतो. त्यातून जसे फायदे होतात तसेच तोटेही होतात. सामान्यपणे जो समूह जास्त समंजस तितकाच तो निरुपद्रवी ठरतो. स्वतःसाठी किंवा इतरासाठीही आनंददायी ठरतो. माणूसही त्याला अपवाद नाही.
सशाचा स्वतःचा एक धर्म आहे. हरिणांचा एक धर्म आहे. लांडग्यांचा, कोल्ह्यांचाही स्वभावधर्म वेगळा वेगळा आहे. ते आपापल्या धर्माप्रमाणे वागत असतात.-ह्या सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा हुशार आहे. व्यवहारी आहे. चतुर आहे. दूरदर्शी आहे. तसाच अती महत्वाकांक्षी आहे. त्यामुळे कारस्थानी सुद्धा आहे. परोपकारी आहे, तसाच स्वार्थी सुद्धा आहे ! आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं ही प्रवृत्ती आपल्याला पशुपक्ष्यामध्ये सुद्धा दिसते. त्यांचेही आपले आपले प्रदेश असतात, आपला आपला विस्तार असतो. तसंच माणसाचंही आहे. माणूस हा सर्वात जास्त बुद्धिमान असल्यामुळे अर्थातच इतरांच्या साम्राज्यावर अतिक्रमण करण्याची त्याची लालसा सुद्धा वेळोवेळी उफाळून येणं स्वाभाविक आहे. पण तिला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न काही विवेकवादी, मानवतावादी लोक नेहमीच करत आलेत. ज्यांचं आचरण समाजाला सोज्वळ, प्रेमळ, परोपकारी, त्यागी, सेवाभावी दिसलं त्यांच्या बद्दल समाजात आपोआपच विश्वास, आदर, प्रेम, श्रद्धा निर्माण झाली. लोक डोळे मिटून त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागले. त्यातूनच पुढं अश्या चाहत्यांचे समूह तयार झाले. त्याचे पंथ तयार झाले. पंथाचे धर्म तयार झाले. कळत नकळत टप्प्या टप्प्यावर अशा प्रत्येक समूहाची एक अलिखित आचारसंहिता तयार झाली. तोच खरं तर त्या त्या धर्माचा उगम म्हणायला हवा. त्यानंतर येणाऱ्या कुणा दूरदर्शी महामानवानं त्याला शिस्त दिली, नियम तयार केलेत आणि धर्म म्हणून त्यांची वेगळी ओळख दिली.
धर्माच्या अशा विधिवत घोषणेच्या आधीही आचारसंहिता मोघम स्वरूपात समाजात अस्तित्वात होतीच ! तिचं आचरण म्हणजे एक विश्वास देणारी, बळ देणारी, आश्वासक ठरत गेली. अशा लोकांचा सन्मान वाढत गेला. त्यातूनच मग भक्ती, नंतर आंधळी भक्ती आणि त्याचे फायदे तोटे आपोआपच आलेत. समूह वाढला, महत्वाकांक्षा वाढली, स्पर्धा वाढली. -अर्थात ही सारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि ती सर्वच क्षेत्रात आहे. लहान बहिणभाऊ देखील चॉकलेट, खेळणी, पुस्तक यासाठी आपसात भांडत असतात की नाही ? त्यांना कुणी अफूची गोळी दिलेली असते का ?-हे खरं आहे, की धर्माच्या नावावर काही लोक उन्माद करतात. दंगली घडवून आणतात. जाळपोळ करतात. पण तोच प्रकार देश आणि देशभक्तीच्या नावावर सुद्धा घडत असतो. तोच प्रकार भाषेच्या, प्रांताच्या, सिमावादाच्या निमित्ताने देखील घडत असतो. युनियनबाजी ही अफूची गोळी नाही का ? पक्षीय अभिनिवेश ही अफूची गोळी नाही का ? त्यात काय कमी मारामाऱ्या होतात ? त्यात काय कमी लोकांचे बळी जातात ? आग तर कुठंही लागत असते. शहरातही लागते, खेड्यातही लागते. पण जंगलात त्याचा वणवा व्हायला वेळ लागत नाही, कारण तिकडे कुणाचेच नियंत्रण नसते. गावागावात घराला घर लागून असलं तरी आग तुलनात्मक दृष्ट्या लौकर नियंत्रणात आणली जाते. कारण तिकडे शेजारधर्म पाळला जातो. एकमेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. -समजा हिटलर, लादेन किंवा भारतातले त्यांचे अगदी अलीकडचे मावसभाऊ यांचे धर्म कोणतेही नसते किंवा धर्म ही बाब अस्तित्वातच नसती तर काय हे लोक साधू संत झाले असते का ? धर्म अस्तित्वात येण्याच्या आधी काय सारे सभ्य होते का ? टोळी युद्ध, मारामाऱ्या, निरपराध जीवांच्या कत्तली, लुटालुट होत नव्हती का ? मग तेव्हा त्यांच्याकडे कोणती अफु होती ?-उलट एकंदरीत परिस्थिती पाहिली तर मानवतेची सेवा करण्याचं काम करण्यात धर्माचं योगदान फार मोठं आहे ! अनेक धर्मात अनेक संत होऊन गेलेत. त्यांनी वेळप्रसंगी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन समाजासाठी जीव धोक्यात घातला. कित्येकांचे छळ झाले. अनेकांच्या हत्या झाल्या. मात्र आजही समाज त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जगत असतो. वैयक्तिक जीवनातील नीतिमत्ता आणि व्यवहार हे कायद्यापेक्षा सामाजिक नितीप्रमाणे चालत असतात.
तेव्हा, आपण धर्माच्या नावावर दहशत पसरवत असलेल्या मुठभर लोकांचा विचार करायचा की अखंड विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या संतांचा ? काही शिक्षक चुकीचे वागत असतील म्हणून शिक्षकी पेशालाच संपवून टाकायचं का ? काही डॉक्टर पेशंटला लुटतात हे खरं आहे, पण म्हणून डॉक्टरी व्यवसाय बंद करून टाकायचा की बिघडलेल्या लोकांना माणुसकीच्या रस्त्यावर परत आणण्याचा प्रयत्न करायचा ? काही राजकारणी बदमाश आहेत, म्हणून सरसकट लोकशाहीच संपवून टाकायची का ? काही वकील चुकीचे असतील, काही न्यायमूर्ती देखील विकावू असतील म्हणून सारी न्यायव्यवस्था मोडून टाकायची का ? गंगा गढूळ झाली म्हणून गंगा बुजवून टाकायची का ?-धर्माच्या बाबतीतही आपल्याला सकारात्मक विचार करावा लागेल. विकृतीचा विरोध करावा लागेल. घाण दूर करावी लागेल. समता, मानवतेचा स्वीकार करावा लागेल. आणि विशेष म्हणजे, त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल ! -स्वतःपासून सुरूवात.. म्हणजेच समतावादी हिंदू धर्म !
तूर्तास एवढंच..!-( ..अपूर्ण.. ‘समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत’ या आगामी पुस्तकातून..)
-ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान