. मी जि .प . हायस्कूल मध्ये लागलो १९८६ ला . तो काळ जिल्हयातील बहुधा सर्व जि .प .हायस्कूलचा सुवर्ण काळ होता . प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भव्य डौलदार , सुंदर व भव्य इमारती उभारल्या जात होत्या . जवळपास प्रत्येक शाळेच्या समोर भव्य पटांगण होते . त्या पटांगणावर फुलपाखरांण प्रमाणे शाळेतील पोरं पोरी भिरभिरत रहात . विविध खेळ खेळत असत . शाळेचं मैदान मुलांमुलीनी कसं गजबजून गेलेलं असायचं . सर्व शिक्षक पालकांच हे चित्र पाहून मन उल्हासीत व्हायचं . शाळेतील शारिरीक शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ शिकवायचे . मी रुजू झालेल्या शाळेत जगतराव भिका पाटील नावाचे शारिरीक शिक्षक होते .
पहिलवानासारखं भक्कम शरिराचे होते . पण फारच शिस्तप्रिय होते . त्यांच्या वागण्या बोलण्यात दिलदारपणा ही ठासून भरलेलं होतं. वेगवेगळे खेळ शिकविण्यात ते तरबेज होते . मुलांशी फारच प्रेमाने ते वागायचे . मनमिळवू स्वभावाचे पाटील सर हे तालुका साक्री जिल्हा धुळे येथील रहिवाशी होते .पाटील सरांकडून मी लेझीम शिकलो . लेझीम शिकविण्यात पाटील सर हदगाव तालुक्यात एक नंबरचं होते . त्यांचा तोडीचा दुसरा शिक्षक नव्हताच असे मला वाटते . त्यांनी लेझीम शिकविलेले काही मुलं २६ जानेवारी दिल्लीच्या परेड मध्येही सहभागी झाले होते .
लेझीम मध्ये बरेच मुले मुली तरबेज झालेली होती . या लेझीम खेळात संगिता आवचार ही प्रविण बनलेली होती . बहुधा तिची ही निवड दिल्ली परेडसाठी झाली होती पण काही खाजगी आडचणी मुळे ती जावू शकली नाही . संगिता बरोबर अंजली कदम , रोहणी भोजनकर ,अंजली पदमाकर , प्रतिभा माकोडे , प्रतिभा कल्याणकर , सुरेखा पडगीलवार , ज्योती संगेवार अशा किती तरी मुली होत्या . आवचार सरांना ही लेझीमची आवड होती . ते पाटील सरांना या खेळात मदत करत . आवचार सर गणितातील वेगवेगळ्या आकृत्या व रचनांचा उपयोग ते लेझीम शिकविताना करून घेत . लेझीम खेळताना सुंदर आकार बनवत . अमोल रोकडे ,सुदर्शन कापेरावेनोल्लू ,माधव जाधव , अमित बलदवा , हिरामन लकडे , शिवाजी वानखेडे , राजेश सिंगनवाड ,संदिप हनवते , नंदू हनवते,मारोती सूर्यवंशी , श्रीहरी पवार अशी अनेक विद्यार्थी खेळात सहभागी होत . पण यात एक विशेष विद्यार्थी होतं विलास शिवराम जाधव . तो खेळ खेळायचा ही व त्या खेळाचं नियोजन ही करायचा
दोनवर्षा पूर्वी सुदर्शन व त्याचे वर्ग मित्र ,अमोल व त्याचे वर्ग मित्र , संगिता व तिचे वर्ग मित्र यांनी स्नेह मिलनाचा कार्यकम घेतला . तेव्हाही मला विलासची आठवण झाली . त्याचा तो सालस चेहरा त्याचे हासणे बोलणे हे सगळं आठवलं . संगिता व आवचार सरांसोबत मी त्याच्या विषयी चर्चाही केलो . पण त्याचा पत्ता लागाला नाही . पण माझी आवचार सरांची व संगिताची जेंव्हाजेंव्हा भेट होते तेंव्हातेंव्हा विलासची आठवण निघायची व निघते . पण एकेदिवशी विलासचा फोटो तेही गळ्यात फुलांचा हार टाकलेला मी वॉटसअॅप ग्रुपवर पाहिलो . त्याचा नंबर माझा पुतण्या रघुनाथ राठोड कडून घेतलो व त्याला फोन लावलो .
आरे वा फोन लागला . विलासने फोन उचलला . मी विलासला गुगली टाकलो . त्याची मला थोडक्यात फिरकी घ्यायची होती म्हणून मी त्याला म्हणालो , ” साहेब नमस्कार तुम्ही विलास सरपंच साहेब बोलता का हो?” समोरून आवाज आला , ” हो मी विलास बोलतोय .आपण कोण ? त्याच्या बोलण्यात ही रुबाब होतं . बोललात निडरपणा होतं” . त्याचं बोलणं ऐकूण मलाही खुप आनंद झाला होता . ज्याचा शोध मी आजपर्यंत घेत होतो ते आज मला सापडलं होतं . मी आनंदाने पण फिरकी घेत म्हणालो ,” सरपंच साहेब मी राठोड बोलतोय ओळखलं का?.” हे ऐकूण तो थोडसा गोंधळला होता . गडबडला होता . कोण?कोण?राठोड असं तो म्हणणार होता , तेवढ्यात मीच म्हणालो , “अरे विलास मी एम.आर.राठोड बोलतोय तुझा इंग्रजी विषयाचा गुरुजी जि.प. हायस्कूल हदगाव.विलास तुझं अभिनंदन तू सरपंच झालास व माझे शब्द खरे ठरविलास त्या बदल तुझं अभिनंदन ! “
“आरे बापरे ऽऽ माझे राठोडसर सरऽ ऽ सर ऽ ऽ .” आता विलास पूर्णपणे गोंधळू गेला होता . तो जेमतेम एकदोन वाक्यचं बोलला.पुढे काय बोलावे हे त्याला कळत नव्हते.तो इतका भावनाविवश झाला होता की त्या भावनेच्या भरात त्या महापूरात तो चक्क वाहून चालला होता .त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता . तो बोलण्याचा प्रयत्न करत होता . त्याच्या त्या भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी विलास ढसाढसा रडत होतं . फक्त सर ऽ सरऽ असं म्हणत होता . क्षणभरासाठी मी ही गोंधळून गेलो होतो .
भावनाविवश झालो होतो . जुणे दिवस आठवत होतो . विलासच्या सर्व आठवणी आठवत होतो . मग त्या गोंधळलेल्या भावनात मी म्हणालो , ” अरे विलास काय झालं रे रडायला ? मला सांग ना बाळा ” यावर तो येवढचं बोलला , ” सर ऽऽ मला एवढं आनंद झाला आहे की मी आता तुम्हाला एकही शब्द बोलू शकत नाही पुन्हा थोड्या वेळाने लावतो . ” असे म्हणून हुंदके देत विलासनं फोन बंद केलं . मीही त्यावेळी निःशब्द झालो होतो .
खरं तर मी जिप हायस्कूल सोडून सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले ;पण मला बहुसंख्य मुलं मुली आजहीआठवतात . त्यांचा चेहरा मनचक्षू समोर उभे रहातात . त्यातल्या त्त्यात विशेष करून ज्या विद्यार्थांची आठवण येते त्यात विलासचाही समावेश आहे .विलास हा बहुधा उमरखेड तालुक्याचा . उमरखेड तालुक्यातील एक छोटसं गाव टाकळी .तेथील तो रहीवाशी . दिसायाला गावंढळ . गोरा रंग . थोडसं नकटं नाक . पसरट चेहर्यावर ते नाक शोभून दिसायचा . टपोरे बोलके डोळे . भुरकट पण मळकट वाणाचे केसं . ते केसही कपाळावर अस्तव्यस्त पसरलेले असायचे . केसाला कधीच भांग पाडलेलं नसायचं . तो बहुधा गरिब घरचा असावा . अंगात साधरणच पण मळकट शर्ट व खाकी रंगाची जाडजूड हापचड्डी परिधान केलेला असायचा . हा खेड्यातील एका गरीब घरातील मुलगा ;पण भलतचं धीट होतं . डोळ्यात भलतचं आत्मविश्वास . याच्याकडे शाळेत असताना भीती हा शब्द नव्हताच .याला भीती शब्दच माहित नसावा असे मला वाटे .
विलास अभ्यासात फारसा हुशार नव्हता याचा अर्थ तो “ढ” ही नव्हता . वर्गात तीन चार नंबरचा विद्यार्थी . खेडूत असून ही शहरातील मुलांसोबत पक्का मिसळून रहणारा . बेधडक बोलणारा बिनधास्त वावरणारा व वागणारा .विलास शिक्षकांसोबत ही बिनधास्त बोलायचा . आडीआडचणी विचारायचा .शिक्षकां सोबत बोलतांना त्याच्या बोलण्यात आज्ञाधारकपणा असायचा . शिस्त असायची . नम्रता असायची . खेड्यातील सोज्वळपणा आपुलकी ठासून भरलेलं होती.
विलास अभ्यासात तीन चार नंबरवर असेलही पण इतर शालेय कार्यक्रमात मात्र विलास सर्वात आग्रेसर असायचा . शालेय कार्यक्रमात विलासची बरोबरी करणारी फारफार तर दोनतीन मुले मुली असतील . कार्यकम जयंतीचा असो की सांस्कृतिक कार्यक्रमाचा असो ;विलास सर्वाच्या पुढे असायचा . त्या कार्यक्रमाचे नियोजन तो करायाचा . विलासचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तो कोणत्याही विषयावर तयारी नकरता , कोणाचीही मदत नघेता भरभरुण बोलायचा . बोलताना तो अडळखत नसे . आगदी एखादा राजकारणी बोलतो तसा तो हवभाव करून बोलयचा . बोलताना वेळकाळ याचंही भान त्याला राहयचं नाही .
मी विलासला नेहमी म्हणायचो , ” विलास तू खूपच धीट आहेस . स्टेज करेज ही तुझ्या कडे आहे . पुढे चालून तू लहान मोठा नेता होणारच . किमान गावचं सरपंचपद तरी तू भुषविणारचं .”हे ऐकूण तो फक्त हसायचा व नम्रपणे म्हणायचा , ” नाही हो सर मी गरीब घरचा ते कसे शक्य आहे .” आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मा . अतकूरकर सर व अवचार सरही माझ्या बोलण्याला पाठिंबा द्यायचे व म्हणायचे ,” खरंच विलास नक्कीच तू गावाचं सरपंच पद का होईना पण निश्चितच भुषवशील.”
त्यावेळी हे शब्द मी व माझे सहकारी सहज बोलून गेलो होतो . पण विलास खरचं आज राजकारण करत गावाच्या राजकारणात उतरला आहे. केवळ नावापूर्ताचं उतरलं नाही तर विजयश्री खेचून आणली व आज तो त्याच्या गावचा प्रथम नागरिक झालेला आहे . सरपंच झालेला आहे . विलास सरपंच झाल्या बदल तुझं हार्दिक अभिनंदन . तुझ्या हातून गावाची निर्भेळ सेवा घडो . अभिनंदन !! विलास अभिनंदन !!!
राठोड मोतीराम रुपसिंग
” गोमती सावली ” काळेश्वरनगर , विष्णुपूरी, नांदेड – ६
९९२२६५२४o७ .