नांदेड – राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अनेकांना लागण होत असल्याचे दिसून येत आहे. हजारो रुग्ण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. तर अतिगंभीर रुग्णांनाच रुग्णालयात दाखल केले जात आहे. यातून मृत्यूचा आकडाही वाढत आहे. ही सततची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आॅनलाईन काव्यपौर्णिमा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खबरदारीचा उपाय हीच कोरोनाची शृंखला तोडून टाकू शकते. जनतेने मास्क, शारिरिक अंतर आणि सॅनिटाईझर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करावा असे आवाहन कवी महाशयांनी केले. गूगल मीटवर घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री शेख अनिसा , ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने फाल्गून पौर्णिमेनिमित्त आॅनलाईन पद्धतीने काव्यपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. काव्यपौर्णिमा मालेतील एकोणचाळीसाव्या काव्यपौर्णिमेचे आॅनलाईन उद्घाटन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे आॅनलाईन पद्धतीनेच करण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात कवींनी सहभाग नोंदवून कोरोनाविषयक आॅनलाईन जनजागृती केली. याद्वारे सर्वत्र पोहचविण्याचा मनोदय व्यक्त केला. काव्यपौर्णिमेत प्रारंभी कवी शरदचंद्र हयातनगरकर यांनी आता आपण कोरोनाचे श्राद्धं घालावयास पाहिजे अशी भूमिका घेतली तर शेख अनिसा यांनी होळी आणि रंगधूळ यांच्या संगमातून कोरोनाला जाळून नवयुगाचा रंगोत्सव खेळूया अशी भावना व्यक्त केली.