दोन-अडीच वर्षांपासून चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची काम पूर्ण करण्याची कालमर्यादा आणि अंदाजित खर्चाची रक्कम असलेला फलक रस्त्यावर कुठेच दिसेना.
फुलवळ ; (धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथून जात असलेल्या नांदेड ते जळकोट या राष्ट्रीय तर लोहा ते मुखेड या राज्य महामार्गावर फुलवळ येथे पुलाचे काम चालू असतानाच गेल्या फेब्रुवारी महिन्यात तो पूल अचानक कोलमोडला होता. सुदैवाने त्यावरून वाहतूक चालू होण्याआधीच ही दुर्घटना घडली म्हणून अनर्थ टळला अन्यथा विपरीत परिणाम झाला असता. त्याच कोलमोडलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली खरी परंतु याच महामार्गगावर नेमके बसस्थानकाच्या ठिकाणीच रस्त्याचे काम अर्धवट करून सदर ठेकेदार पसार झाल्याने या रस्त्याच्या कामाला कधी मुहूर्त लागेल असा सवाल ग्रामस्थ व प्रवाशातून व्यक्त केला जात आहे.
गावावरून दोन प्रमुख रस्ते जात आहेत तेंव्हा नक्कीच गावकऱ्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते . एवढेच नाही तर याच होत असलेल्या प्रमुख रस्त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीला ही चांगले दिवस येतील आणि गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल , त्याबरोबरच छोटे मोठे व्यवसाय पण उभारता येतील आणि त्यातूनही थोडेफार उत्पनाचे स्त्रोत हाती लागेल या आशेवर आपापले भविष्य रंगवले आहे. परंतु ना रस्त्याचे काम लवकर पूर्ण होतेय नाही येथील औद्योगिक वासहतीकडे कोणी जातीने लक्ष घालतेय . त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षेवर पाणी फेरते आहे.
गेली दोन-अडीच वर्षांपूर्वी सदर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली खरी पण आजपर्यंतही काम अपूर्णच असून या कामाची नेमकी मुद्दत तरी आणखी किती दिवस शिल्लक आहे हेही कळायला मार्ग नाही. एवढे मोठे कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे काम चालू असताना सदर कामाचे डिटेल दर्शवणारे फलक नांदेड पासून ते फुलवळ पर्यंत कुठेच पहायला मिळत नाहीत. त्यामुळे सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी किंवा अंदाजित खर्चाची रक्कम किती आहे याचा थांगपत्ताच लागायला तयार नाही. वरून या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी कोणी अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी कधी फिरकलेलाही पहायला मिळत नाही. त्यामुळे कोणाचाकोणाला मेळच बसत नाही आणि याचा नाहक त्रास ग्रामस्थ व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
कदाचित सदर कामाचा ठेकेदार आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यात नक्कीच काही मिलीभगत तर चालू नसेल ना ? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही. कारण रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन दोन-अडीच वर्षे पूर्ण होऊनही अनेक ठिकाणी आजघडीला रस्त्याचे काम अर्धवटच असून ठिकठिकाणी खड्डे , साईड पट्या चे अर्धवट काम तसेच सोडून ठेकेदार नेमके कुठे पसार झाला याचा अंदाज ही लागत नाही आणि कोणता संबंधित अधिकारी याकडे लक्ष ही घालत नाही.
फुलवळ येथील बसस्थानक शेजारी मुख्य रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिल्यामुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी होत असून वाहन धारक व प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर या अर्धवट कामामुळे रस्स्यावर धुळीचे साम्राज्य दाटून येत असल्याने गावकरी व प्रवाशांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. खोदून ठेवलेल्या रस्यामुळे आणि मोबाईल टॉवर चे केबल टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यामुळे त्या रस्त्यावर नालाच पडला असल्याने आणि अद्यापही दुरुस्त केले नसल्याने त्यावरून वाहनांना ये-जा करण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
सदर गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत ना ठेकेदार लक्ष देत आहेत , एवढेच काय तर संबंधित अधिकारी ही लक्ष घालायला तयार आहेत. या सर्वाचा नाहक त्रास गावकरी , प्रवाशी व वाहनधारक यांना सोसावा लागत असल्याने आमच्या व्यथ्यांना कोणी तरी वाली आहे का नाही ? असेच म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे .