फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
शिवारात शेत नाही , गावात हक्काचं घर नाही पण पोटाची खळगी भरण्यासाठी जातिवंत पारंपरिक वारसा पुढे चालू ठेवत स्वत:च्या दु:खाला उरात दाबून जनतेला विविध कलागुणांच्या माध्यमातून जनतेला हसविणे, रडविणे यासह अन्य दवंडी देत कोरोना काळात विविध प्रकारची जनजागृती करणारे नाट्य कलावंतांना कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे एक वर्षापासून भाकरीच्या अभावाने उपवास करण्याची वेळ आली आहे. तब्बल एक वर्षापासून एकही कार्यक्रम झाला नसल्याने तालुक्यातील अनेक तमाशा कलाकारांसह बँडवाले, पारंपरिक हलगी-सूर-सनई वादक , आर्केस्ट्रा, वादक, गायक, निवेदक या कलाकारांसमोर जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
कंधार तालुक्यात ज्ञानोबा वाघमारे, गणपत गायकवाड, कोंडीबा वाडेकर, पुष्पा जाधव, गिता जाधव, बळीराम वाघमारे, गणपत गर्जे, उत्तम शिनगारपुतळे, आशाबाई सुपलकर, नामदेव गायकवाड, सिताराम जोंधळे, उत्तम कांबळे, रामा भांबळे या तमाशा कलाकारांसह ऑर्केस्ट्रा गायक-गायिका, वादक, निवेदक, सनईवाले, बँडवाले, नृतिका , हलगी , सनई , सूर वादक यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एक वर्षांपासून कोरोनामुळे एकही कार्यक्रम झालेला नसल्याने या कलाकारांवर उपासमारीची वेळ आहे.
वर्षभरापासून कार्यक्रम बंद असल्याने अनेक कलाकारांची अवस्था बिकट झाली. वेळप्रसंगी त्यांना उपासमार सहन करावी लागली. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न, चरितार्थाचा प्रश्न, रोजी रोटीचा प्रश्न अशा अनेक अडचणींना तोंड देत, ते कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होतील ? याची वाट पहावी लागत आहे. महाराष्ट्राची कला जोपासणाऱ्या या कलाकारांची दखल कुणीच घेतली नाही. ही शोकांतिकाच म्हणाव लागेल ! यावर्षी नुकतेच कुठे कार्यक्रम सुरू झाले होते. त्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे कार्यक्रमावर पुन्हा निर्बंध लावण्यात आले. ठरवलेले कार्यक्रम रद्द करावे लागले. वर्षभरापासून कार्यक्रम बंद असल्याने एक रुपयाची आवक नाही. कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होतील याची शास्वती नाही ! त्यामळे स्थानिक कलाकारांच्या रोजीरोटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यात्रा, उरूस, सणोत्सव असो की जयंतीचे कार्यक्रम असो लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तमाशाचा फड लावला जातो. कलाकार आपले दुःख विसरून रसिकांचे मनोरंजन करत असतो. अर्थात त्याची बिदागी (पगार) ही त्यांला मिळते. त्यातून तो कलावंत आपले दु:ख उरात दाबून रसिकांसमोर आपली कला सादर करतो व रसिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तो समाधानी होतो.
कंधार शहरासह तालुक्यातील ऑर्केस्ट्रा गायक, वादक, निवेदक, सनईवाले, बँडवाले, तमाशा कलावंत यांची अवस्था सध्या बिकट आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात कार्यक्रमाची रेलचेल असते. यामध्ये शिवजयंती, भिम जयंती, यात्रा-जत्रा, उरूस, विवाह सोहळे अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. कलाकार आपल्या वर्षभराच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी या काळात रात्रीचा दिवस करून कार्यक्रम करत असतात. वर्षातून सात महिने तमाशा कलाकारांना काम मिळत असते. यातून लाख रुपये मिळकत होते. यामधून वर्षभराच्या मिठ मिरचीचा, मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या आरोग्याचा खर्च भागविला जातो. परंतु मागील वर्षापासून या कलाकारांना लॉकडाउनमुळे एक दमडीही कमावता आली नाही. या कलावंतांची संघटनात्मक बांधणी नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडले जात नाहीत. त्यांना भविष्याची चिंता भेडसावत आहे. सद्यस्थितीत या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अशा कलावंताच्या पोटाचा व कुटुंबाचा विचार करून त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी शासनाने श्रावण बाळ योजना किंवा अन्य योजनेतून मानधन देण्याची व्यवस्था केली तर नक्कीच ही पारंपरिक वाद्य परंपरा भविष्यात ही कायम पुढे चालू राहील अशा भावना कलावंत व कलाप्रेमी यांच्यातून व्यक्त केली जात आहे.