नांदेड – गंगाधर ढवळे मित्रांनो मला एक वचन द्या…माझ्या मरणावर भव्य कविसंमेलन होऊ द्या! असे मृत्यूतही सौंदर्य शोधणारा कवी, अक्षरोदय साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कालवश दीपक सपकाळे यांचा स्मृतिदिन नांदेड येथे साजरा झाला. यानिमित्ताने दीपस्मृती हा काव्यवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अक्षरोदय साहित्य मंडळाच्या कोषाध्यक्षा कवयित्री उषाताई ठाकूर, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, युगसाक्षी लाईव्हचे संपादक तथा सप्तरंगीचे कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, कवी गायक आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, प्रदिप ठाकूर यांची उपस्थिती होती. येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण नगरात ठाकूर स्टुडिओत दीपक सपकाळे स्मृतीदिनानिमित्त दीपस्मृती या कार्यक्रमात दीपक यांच्या कार्याचा आढावा व काव्यवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलताना अनुरत्न वाघमारे म्हणाले की, दीपक हे अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दृढनिश्चयी होते. जुन्या आणि नवोदितांना सोबत घेऊन त्यांनी अक्षरोदय साहित्य मंडळाची स्थापना केली होती. तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मंडळाला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले होते. उषाताई ठाकूर म्हणाल्या की, माझ्यासारख्या अशिक्षित कवयित्रीला मंच उपलब्ध करुन देऊन साहित्यप्रवाहात आणले. माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी कवी म्हणून पुढे आणले होते, असेही त्या म्हणाल्या. प्रस्थापितांच्या सततच्या नाकारलेपणातून नवोदितांसाठी दीपक सपकाळे यांनी अक्षरोदय या नव्या साहित्य चळवळीची स्थापना केली होती. शंभराहून अधिक कविसंमेलनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले. इथल्या साहित्य वर्तुळात नवकवींना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे, असे प्रतिपादन साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सपकाळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांकडून स्मृतींना उजाळा देण्यात आला. दीपक सपकाळे लिखित दीपवितरण, प्रयत्नांचे शिखर, पहिला स्पर्श, तुझी आठवण या कवितासंग्रहातील निवडक कवितांचे वाचन संपन्न झाले. कवी नागोराव डोंगरे , पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य/वागरे, अनुराधा हवेलीकर, बी. ए. शिंदे, जीवन मांजरमकर, सिंधुताई दहिफळे, माया तळणकर, गजानन देवकर, सुनील जाधव, राजेश पाटील, मारोती काळबांडे, अजित अटकोरे, त्रिशला संदनशिव, विशालराज नांदेडकर, अॅड. आनंद तिगोटे, लक्ष्मण हिरे, प्रमोदसिंह ठाकूर, ज्योती गायकवाड, डॉ. हेमंत कार्ले यांनी आॅनलाईन आदरांजली वाहिली |