जीवघेण्या खड्याने बंद केला शाळा , दवाखान्याचा रस्ता..
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे राष्ट्रीय महामार्ग च्या शेजारी खोदून ठेवलेल्या जीवघेण्या खड्यामुळे आरोग्य उपकेंद्र , जि. प. शाळा , श्री बसवेश्वर विद्यालय शाळा , ग्राम पंचायत कार्यालय , पशु वैद्यकीय दवाखाना या सर्व शासकीय कार्यल्याबरोबरच लोकवस्तीतील जनमानसाला रहदारीचा रस्ता कित्येक दिवसांपासून बंदच असून आज ता. २९ सप्टेंबर रोजी कंधारेवाडी येथील एका महिलेला प्रसूतीसाठी फुलवळ येथील आरोग्य उपकेंद्रात घेऊन जात असताना सदरच्या खड्यामुळे वाहन तिथपर्यंत जात नसल्याने त्या महिलेची वाटेतच प्रसूती झाली आणि तेथून तिला स्ट्रेचरवर घेऊन जावे लागले .
तेंव्हा सदरचा खड्डा कधी कोणाच्या जीवावर बेतेल हे सांगता येत नाही तरीपण याकडे ना ग्राम पंचायत लक्ष घालतेय ना ज्यांनी ज्या कामासाठी तो खड्डा खोदला ते याकडे गांभीर्याने लक्ष घालत आहेत.
येथील बसस्टँड शेजारी राष्ट्रीय महामार्ग लगत शाळा व दवाखान्याला जाणाऱ्या मुख्य रस्तावर जवळपास आठ ते दहा फूटाचा खोल खड्डा खोदण्यात आला आहे. तो यासाठी की राष्ट्रीय महामार्ग येथून जात असल्याने एअरटेल आणि जिओ , बीएसएनएल मोबाईल टॉवर ला जाणारे वायर हे पहिले रस्ता खोडूनच टाकलेले होते आणि आता तरी ते रस्त्यात येऊ नयेत म्हणून त्यासाठी बाजूने खोदकाम करून ते वायर टाकण्यात आले. परंतु राष्ट्रीय महामार्ग चे त्या ठिकाणचे काम पूर्ण होताच तो खोदलेला खड्डा न बुजवता तसाच सोडून देण्यात आला. त्यातच ग्राम पंचायत अंतर्गत पाणी पुरवठा साठी पाईपलाईन टाकताना पुन्हा तेथे खोदकाम करण्यात आले. परंतु तो खड्डा बुजवण्याकडे कोणीही लक्ष घालत नाही. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या खड्डयाला धबधब्याचे स्वरूप आले आणि पुन्हा तो खड्डा आकाराने मोठा झाला.
आजघडीला त्याच जीवघेण्या खड्डयामुळे सदर चा रस्ता पुर्णपणे बंदच असून आज कंधारेवाडी येथील आशा संभाजी श्रीमंगले वय २३ वर्ष , यांच्या पोटात त्रास होत असल्याने त्यांना प्रसूतीसाठी फुलवळ येथील आरोग्य उपकेंद्रात घेऊन जात असताना सदरचा रस्ता बंद असल्याने तेथून वाहन जात नाही म्हणून दुसऱ्या रस्त्याने जात असताना काल झालेल्या पावसामुळे तोही रस्ता बंदच झाला आणि सदर महिलेची प्रसूती ही रस्त्यातच झाली . त्यानंतर त्या महिलेला व बाळाला स्ट्रेचरवर येथील उपकेंद्रात पोहचवण्यात आले . त्यानंतर येथील आरोग्य सेविका लतिका मुसळे यांनी उपचार केले असून आई व बाळाची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले.
येत्या चार ऑक्टोबर पासून शाळांची घंटी वाजणार आहे तेंव्हा विद्यार्थ्यांना पण शाळेत जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असून सदर चा रस्ता असाच किती दिवस बंद राहणार ? असाच प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
याकडे कोणीही लक्ष घालत नसल्याने दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना , पशुवैद्यकीय दवाखान्यात जाणाऱ्या जनावरांना तसेच शाळेतील विद्यार्थी व त्या वस्तीतील लोकांना तो रस्ता अडगळीचा बनला असून तो खड्डा कधी कोणाच्या जीवावर बेतेल हे येणारा काळच ठरवेल पण अशा या गंभीर बाबीकडे कोणीच कसे लक्ष घालत नसावे यासाठी गावकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे.